आयफोन 18 प्रो आणि प्रो मॅक्स वापरताना फेस आयडीमुळे फोन हँग आणि रिबूट होत असल्याच्या तक्रारी युजर्स करत आहेत. इन्फ्रारेड कॅमेरा स्क्रीनच्या खाली हलवल्यामुळे हा प्रॉब्लेम येतोय की हा सॉफ्टवेअरचा बग आहे, हे अद्याप स्पष्ट झालेलं नाही.
मुंबई : आयफोन 18 प्रो आणि आयफोन 18 प्रो मॅक्स वापरणाऱ्यांसाठी एक नवं टेन्शन समोर आलंय. काही युजर्सनी तक्रार केली आहे की, फेस आयडी वापरताना फोन अचानक हँग होतो आणि नंतर आपोआप रिबूट होऊन लॉक स्क्रीनवर जातो. हा प्रॉब्लेम सगळ्याच युजर्सना येत नसला, तरी फेस आयडीशी संबंधित अनेक अडचणी सध्या समोर येत आहेत.
फेस आयडी वापरताना फोन होतोय हँग
रिपोर्ट्सनुसार, युजर्स जेव्हा ॲप उघडण्यासाठी फेस आयडी वापरतात, तेव्हा प्रामुख्याने ही अडचण येत आहे. फेस आयडीने ओळख पटवण्याचा प्रयत्न करताना आयफोन काहीच रिस्पॉन्स देत नाही आणि थोड्या वेळाने आपोआप रिबूट होतो. रिबूट झाल्यानंतर फोन पुन्हा लॉक स्क्रीनवर अडकतो, असं युजर्सचं म्हणणं आहे. मॅकरुमर्सच्या (MacRumors) रिपोर्टनुसार, रेडिटवरील (Reddit) एका युजरने हा अनुभव शेअर केलाय. बिझनेस टुडेच्या वृत्तानुसार, 9टू5मॅकने (9to5Mac) ही पोस्ट सर्वांच्या निदर्शनास आणून दिली.
'फेस आयडी उपलब्ध नाही' असा मेसेज
मॅकरुमर्सच्या फोरमवरही युजर्सनी अशाच प्रकारच्या तक्रारी मांडल्या आहेत. काही आयफोन 18 प्रो युजर्सनी सांगितलंय की, फेस आयडी सेट करताना त्यांना 'फेस आयडी उपलब्ध नाही' (Face ID is not available) असा मेसेज येतोय. याशिवाय, युजर स्क्रीनकडे बघतोय की नाही हे तपासणारं 'अटेन्शन रिक्वायर्ड' (Require Attention) हे फीचरही नीट काम करत नसल्याची काहींची तक्रार आहे.
ॲपलने फेस आयडी सिस्टीममध्ये केलाय बदल
ॲपलने आयफोन 18 प्रो मॉडेल्समध्ये फेस आयडीच्या हार्डवेअरमध्ये काही बदल केल्याची माहिती समोर आली आहे. डायनॅमिक आयलंडचा आकार कमी करण्यासाठी कंपनीने इन्फ्रारेड कॅमेरा स्क्रीनच्या खाली, डाव्या बाजूला वरच्या कोपऱ्यात हलवला आहे. आता या हार्डवेअरमधील बदलामुळेच फेस आयडीचे प्रॉब्लेम्स येत आहेत का, हे अद्याप स्पष्ट झालेलं नाही. काही तज्ज्ञांच्या मते, हा सॉफ्टवेअरमधील बगसुद्धा असू शकतो.
आयओएस 27 अपडेटमध्ये मिळणार का उपाय?
मॅकरुमर्सने असा अंदाज वर्तवला आहे की, भविष्यात येणाऱ्या आयओएस 27 (iOS 27) अपडेटच्या माध्यमातून ॲपल फेस आयडीच्या या अडचणी दूर करेल. सध्या तरी मोजक्याच युजर्सकडून या तक्रारी आल्या आहेत. त्यामुळे आयफोन 18 प्रो आणि आयफोन 18 प्रो मॅक्स मॉडेल्समधील हा प्रॉब्लेम नेमका किती मोठा आहे, याचा अंदाज आलेला नाही. हा बिघाड सरसकट सगळ्याच युजर्सना प्रभावित करतोय, असा कोणताही पुरावा सध्या तरी समोर आलेला नाही.

