इन्स्टाग्रामवरील 'एन्ड-टू-एन्ड एन्क्रिप्शन' चॅट फीचर ८ मे २०२६ नंतर बंद होणार आहे, असं मेटाने अधिकृतपणे जाहीर केलंय. हे फीचर फार कमी लोक वापरत असल्याने हा निर्णय घेतल्याचं कंपनीचं म्हणणं आहे. पण यामुळे युझर्सचे मेसेज मेटाला वाचता येतील, अशी भीती व्यक्त केली जात आहे.
आजकाल अनेक जण दिवसभर इन्स्टाग्राम वापरतात. पण आता मेटाने एक अशी घोषणा केली आहे, ज्यामुळे युझर्सचं टेन्शन वाढलं आहे. कंपनीने अधिकृतपणे सांगितलंय की, ८ मे २०२६ नंतर इन्स्टाग्राममधील 'एन्ड-टू-एन्ड एन्क्रिप्शन' चॅट फीचर बंद करण्यात येणार आहे. याचा अर्थ, इन्स्टाग्रामच्या डायरेक्ट मेसेजेसना (DM) मिळणारी ही खास सुरक्षा आता मिळणार नाही. कंपनीने आपल्या सपोर्ट पेजवर ही माहिती दिली आहे. ज्या युझर्सचे चॅट्स या फीचरअंतर्गत सुरक्षित आहेत, त्यांना कंपनीकडून आगाऊ सूचना मिळेल आणि त्यांना आपला चॅट डेटा डाउनलोड करण्याची संधीही दिली जाईल.
एन्ड-टू-एन्ड एन्क्रिप्शन म्हणजे नेमकं काय?
आता तुमच्या मनात प्रश्न आला असेल की, हे एन्ड-टू-एन्ड एन्क्रिप्शन म्हणजे काय? सोप्या भाषेत सांगायचं तर, ही एक अशी सुरक्षा पद्धत आहे, ज्यामुळे मेसेज पाठवणारा आणि तो स्वीकारणारा, या दोघांशिवाय तिसरी कोणतीही व्यक्ती तो मेसेज वाचू शकत नाही. अगदी इन्स्टाग्राम चालवणारी कंपनी 'मेटा' सुद्धा तुमचे मेसेज पाहू शकत नाही. हे तंत्रज्ञान मेसेज पाठवताना त्याला एका कोडमध्ये बदलतं आणि तो फक्त मेसेज मिळवणाऱ्याच्या डिव्हाइसवरच पुन्हा मूळ मेसेजमध्ये रूपांतरित होतो. हॅकर्स आणि इतरांपासून मेसेज पूर्णपणे सुरक्षित ठेवणारं हेच फीचर आता बंद होणार आहे.
सिग्नल (Signal) आणि व्हॉट्सॲप (WhatsApp) सारखे अनेक ॲप्स युझर्सचं संभाषण पूर्णपणे खासगी ठेवण्यासाठी याच तंत्रज्ञानाचा वापर करतात. व्हॉट्सॲपमध्ये तर हे एन्क्रिप्शन 'डिफॉल्ट' म्हणजेच आपोआप लागू असतं. पण इन्स्टाग्रामवर मात्र युझर्सना हे फीचर स्वतः निवडावं लागत होतं.
इन्स्टाग्रामने २०२३ मध्ये आपल्या मेसेजिंग सिस्टीममध्ये एन्ड-टू-एन्ड एन्क्रिप्शनची सुविधा आणली होती. मेटाच्या म्हणण्यानुसार, खूप कमी लोक हे फीचर वापरत होते, त्यामुळेच कंपनीने ते बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. युझर्सना त्यांचे एन्क्रिप्टेड चॅट्स आणि मीडिया फाइल्स डाउनलोड करता याव्यात, यासाठी कंपनी आगाऊ सूचना पाठवत आहे. वापर कमी असल्याचं कारण अधिकृतपणे दिलं जात असलं तरी, एन्क्रिप्शन काढून टाकल्यामुळे प्लॅटफॉर्मला मेसेजिंग डेटा तपासणं सोपं जाईल, अशी चर्चा सुरू झाली आहे.
तुमचे मेसेज आता मेटा तपासणार
एन्क्रिप्शन काढून टाकल्यामुळे, युझर्सचे मेसेज मेटाच्या सर्व्हरमधून जाताना कंपनीला ते तपासता येतील. बेकायदेशीर गोष्टींना आळा घालण्यासाठी याचा उपयोग होईल, असा दुसरा दावा मेटा करत आहे. या निर्णयामागे इन्स्टाग्रामला एक 'सोशल मीडिया प्लॅटफॉर्म' आणि व्हॉट्सॲपला एक 'प्रायव्हेट मेसेजिंग प्लॅटफॉर्म' म्हणून स्थापित करण्याचा मेटाचा उद्देश असल्याचंही बोललं जातंय.


