मध्य प्रदेशात, वीरांगना दुर्गावती व्याघ्र प्रकल्पातून जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्ग-45 च्या एका भागाची वन्यजीवांच्या सुरक्षेसाठी पुनर्रचना करण्यात आली आहे. . या उपायांमुळे प्राणी-वाहन अपघात टाळून विकास आणि पर्यावरण संरक्षणात संतुलन साधले जात आहे.
मध्य प्रदेश सरकारने वन्यजीव संरक्षणाच्या दिशेने एक मोठे पाऊल उचलले आहे. भारतातील प्रमुख वनक्षेत्रांपैकी एक असलेल्या वीरांगना दुर्गावती व्याघ्र प्रकल्पातून जाणाऱ्या भोपाळ-जबलपूर राष्ट्रीय महामार्गाच्या (NH-45) काही भागाची पुनर्रचना केली आहे, जेणेकरून प्राण्यांना रस्ता ओलांडणे सुरक्षित होईल. तसे या उपायामुळे अपघात टाळले जाणार आहे. तसेच पर्यावरण संरक्षणात संतुलनही राखले जाणार आहे.
रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाच्या अंतर्गत येणाऱ्या भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने (NHAI) महामार्गाच्या दोन किलोमीटरच्या पट्ट्यावर एक विशेष 'टेबल-टॉप रेड मार्किंग' तयार केले आहे. देशातील हा अशा प्रकारचा पहिलाच प्रयोग आहे.
हे थोडेसे उंच असलेले लाल थर्मोप्लास्टिक मार्किंग चालकांना वन्यजीव संवेदनशील क्षेत्रात प्रवेश करत असल्याची दृष्य आणि स्पर्शाद्वारे सूचना देतात. पारंपरिक स्पीड ब्रेकर्सच्या विपरीत, ही लाल रंगाची खरबरीत पृष्ठभाग वाहनांना अचानक ब्रेक न लावता नैसर्गिकरित्या वेग कमी करण्यास प्रवृत्त करते, ज्यामुळे वाघ, हरीण, कोल्हे आणि सांबर यांसारख्या प्राण्यांसोबत होणाऱ्या अपघातांचा धोका कमी होतो.
या लाल मार्किंग व्यतिरिक्त, प्राण्यांच्या येण्या-जाण्याच्या मार्गांचा अभ्यास करून सुमारे 25 वन्यजीव अंडरपास (भुयारी मार्ग) तयार करण्यात आले आहेत. यामुळे प्राणी रहदारीतून न जाता रस्त्याच्या खालून सुरक्षितपणे पलीकडे जाऊ शकतात. महामार्गाच्या दोन्ही बाजूंना चेन-लिंक कुंपण लावल्याने प्राणी या मार्गांकडे वळतात आणि कुठेही रस्ता ओलांडणे टाळले जाते, ज्यामुळे होणारे अपघात टळतात.
हा प्रकल्प जबलपूरपासून सुमारे 60 किलोमीटर अंतरावर असलेल्या हिरण आणि सिंदूर दरम्यानच्या NH-45 च्या 11.9 किलोमीटरच्या पट्ट्यात पसरलेला आहे. हा भाग जैवविविधतेने समृद्ध असून येथे प्राण्यांचा नेहमी वावर असतो. वन्यजीव संवर्धन तज्ञ या उपक्रमाला पायाभूत सुविधांचा विकास आणि पर्यावरण संरक्षण यांच्यातील एक व्यावहारिक संतुलन म्हणून पाहतात. यातून दिसून येते की, विचारपूर्वक केलेल्या रचनेमुळे वाहतुकीत अडथळा न आणता नैसर्गिक अधिवासांचे संरक्षण कसे करता येते.
सुरुवातीच्या संकेतांनुसार, हरीण ते मोठ्या शिकारी प्राण्यांपर्यंत सर्व प्राणी या अंडरपासचा प्रभावीपणे वापर करत आहेत, तर लाल पट्ट्यांवर चालक अधिक सतर्क होत आहेत. हे मॉडेल भविष्यात भारतभरातील वन्यजीव-स्नेही रस्त्यांच्या डिझाइनसाठी एक आदर्श ठरू शकते, ज्यामुळे प्राणी-वाहन अपघात कमी होण्यास आणि नैसर्गिक कॉरिडॉरमधून जाणाऱ्या महामार्गांमुळे होणारे पर्यावरणाचे नुकसान टाळण्यास मदत होईल.


