गेल्या काही दिवसात आरोग्याचे विविध प्रश्न समोर आले आहेत. यातच आता स्तनाच्या कर्करोगाचा धोका वाढत आहे. आयसीएमआरच्या अहवालात महत्त्वाची माहिती समोर आली आहे.

गेल्या काही दिवसात आरोग्याचे विविध प्रश्न समोर आले आहेत. यातच आता स्तनाच्या कर्करोगाचा धोका वाढत आहे. ICMR च्या अहवालात महत्त्वाची माहिती समोर आली आहे. याचबाबत आज जाणून घेणार आहोत.

मांसाहारी आहार, अपुरी झोप आणि लठ्ठपणा यामुळे स्तनाच्या कर्करोगाचा धोका वाढतो, असे ICMR च्या अभ्यासात म्हटले आहे. हा धोका दरवर्षी सुमारे 5.6 टक्क्यांनी वाढेल आणि यामुळे दरवर्षी 0.05 दशलक्ष नवीन प्रकरणे समोर येतील, असेही ICMR च्या अभ्यासात नमूद केले आहे.

हार्मोन्समधील बदल आणि आनुवंशिकता हे देखील भारतीय महिलांमध्ये स्तनाच्या कर्करोगाच्या धोक्यावर परिणाम करणारे प्रमुख घटक आहेत, असे बंगळूरस्थित ICMR च्या नॅशनल सेंटर फॉर डिसीज इन्फॉर्मेटिक्स अँड रिसर्चने केलेल्या अभ्यासात स्पष्ट झाले आहे.

2022 मध्ये, जगभरातील 2.3 दशलक्ष महिलांना स्तनाच्या कर्करोगाचे निदान झाले. यामुळे सुमारे 6,70,000 मृत्यू झाले, असे संशोधकांचे म्हणणे आहे. हा अभ्यास 22 डिसेंबर 2024 पर्यंत प्रकाशित झालेल्या भारतीय महिलांमधील स्तनाच्या कर्करोगाच्या जोखमीच्या घटकांचे मूल्यांकन करणाऱ्या भारतीय अभ्यासांचा आढावा होता.

यामध्ये लग्नाचे वय, गर्भधारणा, पहिल्या आणि शेवटच्या प्रसूतीवेळीचे वय, स्तनपान आणि मुलांची संख्या यासह प्रजनन आणि हार्मोनल घटकांचीही तपासणी करण्यात आली. लग्नाचे वय जसजसे वाढते, तसतसा स्तनाच्या कर्करोगाचा धोकाही हळूहळू वाढतो, असे अभ्यासात आढळून आले. याशिवाय, ज्या महिलांनी दोनपेक्षा जास्त गर्भपात केले आहेत, त्यांना गर्भपात न केलेल्या महिलांच्या तुलनेत 1.68 पट जास्त धोका असल्याचेही अभ्यासात म्हटले आहे.

जीवनशैलीतील घटक स्तनाच्या कर्करोगाच्या धोक्यात महत्त्वाची भूमिका बजावतात. मांसाहार केल्याने धोका वाढू शकतो. याशिवाय, इस्ट्रोजेन उत्पादनाशी संबंधित सॅचुरेटेड फॅट आणि प्रक्रिया केलेले मांस जास्त प्रमाणात खाल्ल्यानेही स्तनाचा कर्करोग होऊ शकतो, असे अभ्यासात म्हटले आहे. झोपेची गुणवत्ता कमी असण्याचा संबंधही धोका वाढण्याशी असल्याचे संशोधकांचे म्हणणे आहे.

स्तनाचा कर्करोग हा महिलांमध्ये आढळणाऱ्या सर्वात सामान्य कर्करोगांपैकी एक आहे. भारतात, विशेषतः शहरी भागात स्तनाच्या कर्करोगाची प्रकरणे वाढत आहेत. मद्यपान आणि धूम्रपान यामुळे स्तनाच्या कर्करोगाचा धोका वाढतो, असे काही अभ्यासांमध्ये दिसून आले आहे. अगदी कमी प्रमाणात मद्यपान केल्यानेही स्तनाच्या कर्करोगाचा धोका वाढतो, असे आढळून आले आहे.