गुरु ग्रहाच्या आकाराबद्दलच्या आतापर्यंतच्या कल्पना बदलणार आहेत. नासाच्या जुनो अंतराळ मोहिमेतील रेडिओ डेटा वापरून केलेल्या अभ्यासातून हा नवीन निष्कर्ष समोर आला आहे.
आपल्या सूर्यमालेतील सर्वात मोठा ग्रह गुरु आहे, असा शास्त्रज्ञांचा अनेक दशकांपासून विश्वास आहे. पण आता एका नवीन शोधानुसार, गुरु ग्रह आपल्या कल्पनेपेक्षा थोडा लहान आणि अधिक चपटा आहे. नासाच्या जुनो अंतराळ मोहिमेतील रेडिओ डेटा वापरून केलेल्या अभ्यासातून हा निष्कर्ष काढण्यात आला आहे. नुकत्याच 'नेचर ॲस्ट्रॉनॉमी' जर्नलमध्ये प्रकाशित झालेल्या या अभ्यासामुळे गुरुच्या अंतर्गत रचनेबद्दलचे वैज्ञानिक मॉडेल अधिक अचूक बनविण्यात मदत होईल, असे संशोधकांचे म्हणणे आहे. 'रेडिओ ऑकल्टेशन' नावाच्या तंत्रज्ञानाचा वापर करून हा नवीन शोध लावण्यात आला आहे, ज्यामुळे शास्त्रज्ञांना गुरुच्या दाट आणि ढगाळ वातावरणाच्या आत अभ्यास करता येतो.
गुरु ग्रह आपल्या कल्पनेपेक्षा लहान
या अभ्यासामुळे आतापर्यंतची पाठ्यपुस्तके अद्ययावत करावी लागतील, असे या अभ्यासाचे सह-लेखक आणि इस्रायलच्या वाइझमन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्समधील ग्रह वैज्ञानिक योहाय कास्पी यांनी सांगितले. त्याच वेळी, गुरुचा आकार बदललेला नाही, परंतु त्याला मोजण्याची आपली पद्धत अधिक अचूक झाली आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले. आतापर्यंत गुरुचा आकार आणि स्वरूप सुमारे ५० वर्षांपूर्वीच्या पायोनियर १०, ११ आणि व्हॉयेजर १, २ मोहिमांमधील रेडिओ मापनांवर आधारित होते.
मात्र, २०१६ मध्ये गुरुवर पोहोचलेल्या जुनो मोहिमेने गेल्या दोन वर्षांत अधिक तपशीलवार रेडिओ डेटा गोळा केला आहे. यामुळे संशोधकांना सुमारे ४०० मीटरच्या अचूकतेने गुरुचे मोजमाप करणे शक्य झाले. जुनोकडून पृथ्वीवर येणारे रेडिओ सिग्नल गुरुच्या वातावरणातून जाताना कसे वाकतात, याचे निरीक्षण करून हे नवीन मोजमाप शक्य झाले. यामुळे ग्रहाच्या आकारावर जोरदार वाऱ्यांमुळे होणारे छोटे बदलही मोजता आले.
जुनो मोहिमेतून मिळालेली निर्णायक माहिती
नवीन मोजमापांनुसार, गुरुच्या ध्रुवांपासून केंद्रापर्यंतची त्रिज्या पूर्वीच्या अंदाजापेक्षा १२ किलोमीटरने कमी आहे. पूर्वी ही त्रिज्या ६६,८५४ किलोमीटर होती, तर आता ती फक्त ६६,८४२ किलोमीटर आहे. विषुववृत्तीय त्रिज्यादेखील सुमारे चार किलोमीटरने कमी असल्याचे आढळून आले. हे काही किलोमीटर खूप महत्त्वाचे आहेत, असे अभ्यासाचे सह-लेखक एली गलांती यांनी स्पष्ट केले. यामुळे गुरुच्या अंतर्गत रचनेबद्दलचे मॉडेल अधिक सुसंगत बनतात, असेही ते म्हणाले. त्याचबरोबर, हा नवीन शोध केवळ गुरुसाठीच नाही, तर सूर्यमालेबाहेरील सर्व वायू ग्रहांच्या अभ्यासासाठीही मार्गदर्शक ठरेल, असे संशोधकांचे म्हणणे आहे. ग्रहांची निर्मिती आणि उत्क्रांती समजून घेण्यासाठी हा शोध एक महत्त्वाचा टप्पा आहे.


