ICICI बँकेने 1 ऑगस्ट 2025 पासून नवीन बचत खात्यांसाठी किमान सरासरी मासिक शिल्लक (MAMB) वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. मेट्रो/शहरी भागांसाठी MAMB ₹50,000 पर्यंत वाढवण्यात आली आहे. याचा परिणाम नवीन खाते उघडणाऱ्या ग्राहकांवर होईल.

मुंबई : ICICI बँकेने आपल्या बचत खात्यांशी संबंधित नियमांमध्ये मोठा बदल करण्याचा निर्णय घेतला असून, 1 ऑगस्ट 2025 पासून किंवा त्यानंतर उघडली जाणारी सर्व नवीन बचत खाती या नियमांच्या कक्षेत येणार आहेत. नवीन नियमांनुसार, सरासरी मासिक किमान शिल्लक (Minimum Average Monthly Balance - MAMB) मोठ्या प्रमाणात वाढवण्यात आली आहे. या निर्णयाचा थेट परिणाम बँकेच्या नव्या ग्राहकांवर होणार आहे.

नवीन MAMB किती?

बँकेच्या नव्या धोरणानुसार विविध भागांतील किमान शिल्लक रक्कम खालीलप्रमाणे ठरवण्यात आली आहे.

शाखेचा प्रकारजुनी MAMBनवीन MAMB (1 ऑगस्टपासून)
मेट्रो/शहरी₹10,000₹50,000
अर्ध-शहरी₹5,000₹25,000
ग्रामीण₹5,000

₹10,000

शिल्लक न ठेवल्यास दंड किती लागेल?

जर खातेदारांनी ठरलेली MAMB पाळली नाही, तर बँक कमाल ₹500 पर्यंतचा दंड किंवा शिल्लक कमतरतेच्या 6% इतका शुल्क, यापैकी जे कमी असेल ते आकारू शकते.

रोख व्यवहारांवरील बदल

दर महिन्याला फक्त 3 मोफत व्यवहार, शाखांमध्ये किंवा कॅश रिसायकलर मशीनद्वारे.

चौथ्या व्यवहारापासून प्रत्येकवेळी ₹150 शुल्क.

1 लाख रुपयांपर्यंत रोख जमा/काढण्यावर शुल्क नाही.

1 लाखाच्या वर गेल्यास, प्रत्येक ₹1,000 मागे ₹3.5 किंवा ₹150 (जे जास्त असेल) शुल्क आकारले जाईल.

तृतीय पक्ष रोख व्यवहारांसाठी ₹25,000 ची मर्यादा प्रत्येक व्यवहारासाठी लागू राहील.

ऑफिस वेळेबाहेरील व्यवहारांवर अतिरिक्त शुल्क

सायंकाळी 4.30 नंतर किंवा सुट्टीच्या दिवशी, जर कॅश रिसायकलर मशीनद्वारे एकूण जमा रक्कम महिन्यात ₹10,000 च्या वर गेली, तर प्रत्येक व्यवहारावर ₹50 अतिरिक्त शुल्क आकारले जाईल. हे शुल्क नियमित व्यवहार शुल्कांव्यतिरिक्त असेल.

गैर-ICICI एटीएमवरील व्यवहार मर्यादित

मेट्रो शहरांतील (मुंबई, दिल्ली, कोलकाता, चेन्नई, बेंगळुरू, हैदराबाद) इतर बँकांच्या एटीएमवर

दर महिन्याला 3 मोफत व्यवहार (वित्तीय व अवित्तीय मिळून).

त्यानंतर

वित्तीय व्यवहारासाठी ₹23

अवित्तीय व्यवहारासाठी ₹8.5

या निर्णयामागचा हेतू काय?

NDTV Profit शी बोलताना एका वरिष्ठ बँक अधिकाऱ्याने सांगितले की, हा निर्णय प्रिमियम ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी घेण्यात आला आहे. म्हणजेच, जास्त शिल्लक ठेवणाऱ्या आणि नियमित व्यवहार करणाऱ्या ग्राहकांवर लक्ष केंद्रीत केले जात आहे.

इतर बँकांची भूमिका काय आहे?

जिथे इतर बँका, विशेषतः SBI, किमान शिल्लक संकल्पना हटवत ग्राहकांसाठी सोपे नियम आणत आहेत, तिथे ICICI चा हा निर्णय काही ग्राहकांसाठी आर्थिकदृष्ट्या अडचणीचा ठरू शकतो.

तुमच्या खात्यावर याचा काय परिणाम होईल?

जर तुमचं खाते 1 ऑगस्ट 2025 नंतर उघडले गेले असेल, तर हे सर्व नियम तुमच्यावर लागू होतील.

विद्यमान ग्राहकांवर सध्या याचा प्रभाव नाही, परंतु भविष्यात यामध्ये बदल होऊ शकतो.