वयाच्या 30 व्या वर्षी योग्य नियोजन केल्यास 60 व्या वर्षी 5 कोटी रुपयांचा फंड जमवणं पूर्णपणे शक्य आहे. सिस्टिमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅन (SIP) द्वारे हे ध्येय गाठता येतं. पगारवाढीनुसार गुंतवणूक वाढवणं फायद्याचं ठरतं.

मुंबई : तुमचं वय ३० आहे आणि तुम्हाला कोणी सांगितलं की तुम्ही रिटायरमेंटपर्यंत ५ कोटी रुपये जमवू शकता, तर कदाचित तुम्हाला हे एक अशक्य स्वप्न वाटेल. पण योग्य आर्थिक नियोजनाने हे स्वप्न खरं होऊ शकतं. तुमच्या रिटायरमेंटचं वय आणि गुंतवणुकीवर मिळणारा अंदाजित परतावा यावर तुम्हाला दर महिन्याला किती पैसे बाजूला काढावे लागतील, हे अवलंबून आहे.

म्युच्युअल फंडमध्ये दर महिन्याला ठराविक रक्कम गुंतवण्याच्या पद्धतीला सिस्टिमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅन (SIP) म्हणतात. 'असोसिएशन ऑफ म्युच्युअल फंड्स इन इंडिया' (AMFI) च्या मते, SIP मुळे गुंतवणुकीची सवय लागते आणि 'रुपी-कॉस्ट अॅव्हरेजिंग'चा फायदा मिळतो. पण एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे की म्युच्युअल फंडमधील गुंतवणूक शेअर बाजारातील जोखमीच्या अधीन असते, त्यामुळे यात निश्चित परताव्याची किंवा सुरक्षिततेची कोणतीही गॅरंटी नसते.

वयाच्या ६० व्या वर्षी रिटायर व्हायचं असेल तर?

समजा, तुमचं वय आता ३० वर्षं आहे आणि वयाच्या ६० व्या वर्षी तुमच्याकडे ५ कोटी रुपये असावेत, असं तुमचं ध्येय आहे. याचा अर्थ, तुमच्याकडे गुंतवणुकीसाठी पूर्ण ३० वर्षं (३६० महिने) आहेत. जर तुमच्या गुंतवणुकीवर वार्षिक १० टक्के परतावा मिळेल असं गृहीत धरलं, तर तुम्हाला दरमहा सुमारे २१,९०० रुपये गुंतवावे लागतील. हाच परतावा जर १२ टक्के मिळाला, तर तुमची मासिक गुंतवणूक कमी होऊन १४,२०० रुपयांवर येईल.

पण हे फक्त एक उदाहरण आहे, हे लक्षात घ्या. सेबी (SEBI) नेहमीच गुंतवणूकदारांना सावध करते की म्युच्युअल फंडाची कामगिरी बाजारातील चढ-उतारांवर अवलंबून असते आणि भूतकाळातील चांगल्या कामगिरीची भविष्यात पुनरावृत्ती होईलच असं नाही.

५ वर्षांनी बदलणारं गणित

आता विचार करा की तुम्ही ६० ऐवजी ६५ व्या वर्षी रिटायर व्हायचं ठरवलं तर? इथे तुमच्या गुंतवणुकीला वाढण्यासाठी ५ वर्षं जास्त मिळतात. या ३५ वर्षांच्या काळात ५ कोटींचं लक्ष्य गाठण्यासाठी, १० टक्के परताव्याच्या दराने तुम्हाला दरमहा फक्त १३,१०० रुपये गुंतवावे लागतील. आणि जर १२ टक्के परतावा मिळाला, तर ही रक्कम आणखी कमी होऊन फक्त ७,७०० रुपये होईल. यावरून लवकरात लवकर गुंतवणूक सुरू करण्याचं महत्त्व स्पष्ट होतं. गुंतवणुकीचा कालावधी जितका जास्त, तितकी मासिक रक्कम कमी लागते.

१२ टक्के परतावा नेहमीच मिळेल असं नाही

रिटायरमेंट कॅल्क्युलेटर वापरताना फक्त शेवटच्या मोठ्या आकड्यावर लक्ष केंद्रित करणं धोकादायक ठरू शकतं. १२ टक्के परताव्याची अपेक्षा केल्यास मासिक गुंतवणुकीची रक्कम कमी दिसते, पण शेअर बाजारातून मिळणारा परतावा कधीही स्थिर नसतो. AMFI आणि SEBI दोन्ही स्पष्ट करतात की म्युच्युअल फंडातील परताव्याची कोणतीही गॅरंटी नसते. त्यामुळे अवास्तव अपेक्षा ठेवण्याऐवजी, वेगवेगळ्या परताव्याच्या दरांनुसार आपल्या भविष्याचं नियोजन करणं शहाणपणाचं ठरतं.

पगार वाढेल तशी गुंतवणूकही वाढवा

पूर्ण ३० वर्षं एकसारखीच रक्कम गुंतवण्यापेक्षा एक सोपा आणि अधिक व्यवहार्य मार्ग आहे. तुमच्या पगारात दरवर्षी जशी वाढ होते, तशीच SIP ची रक्कमही वाढवत न्या. तुम्ही दरवर्षी ५ किंवा १० टक्क्यांनी गुंतवणूक वाढवू शकता. याला 'स्टेप-अप SIP' म्हणतात. यामुळे सुरुवातीलाच मोठी रक्कम गुंतवण्याचं ओझं येत नाही आणि वाढत्या महागाईत तुमची गुंतवणूक मागे पडत नाही.

EPF आणि NPS ला विसरू नका

तुमच्या रिटायरमेंटचा सगळा भार एकट्या SIP वर टाकण्याची गरज नाही. तुम्ही नोकरदार असाल तर तुमच्या एम्प्लॉई प्रॉव्हिडंट फंड (EPF) आणि नॅशनल पेन्शन सिस्टीम (NPS) मध्येही चांगली रक्कम जमा होत असते. याशिवाय तुमची पीपीएफ (PPF) सारखी इतर गुंतवणूकही असू शकते. या सर्व योजनांमधून किती रक्कम जमा होईल याचा अंदाज घ्या आणि त्यानंतर उरलेल्या रकमेसाठी SIP द्वारे किती गुंतवणूक करायची हे ठरवा. यामुळे तुमचं नियोजन आणखी सोपं होईल.