Health Tips: जेवणानंतर रक्तातील साखरेची पातळी स्थिर ठेवण्यास बार्लीचे पाणी मदत करते, असे विविध अभ्यासातून सिद्ध झाले आहे. मात्र हे पाणी कधी प्यायचे, किती प्यायचे, कसे प्यायचे हेही तितकेच महत्त्वाचे असते. यामुळे शरीरातील विषारी घटक बाहेर टाकले जातात
Health Tips: मराठीमध्ये बार्लीला जव किंवा सातू असे म्हणतात. हे एक पौष्टिक तृणधान्य असून साधारणपणे गव्हासारखेच दिसत असले तरी चवीला मात्र खूपच वेगळे असते. बार्लीचा वापर सूप, सॅलड, ब्रेड तसेच माल्ट आणि बिअर बनवण्यासाठी केला जातो. बार्लीमध्ये भरपूर प्रमाणात जीवनसत्त्वे आणि फायबर असते. याशिवाय त्यात असणाऱ्या खनिजांमुळे हे धान्य पचनासाठी आणि शरीराला थंडावा देण्यासाठी उपयुक्त ठरते. याशिवाय याचे पाणीही औषधी आहे. या पाण्याचे फायदे कोणते जाणून घेऊ.
बार्लीचे पाणी हे जगाच्या विविध भागांमध्ये वापरले जाणारे एक पारंपरिक पेय आहे. अनेक आजारांवर हे एक प्रभावी पेय आहे. बार्लीचे पाणी प्यायल्याने अनेक आजार दूर राहण्यास मदत होते. यामध्ये बीटा-ग्लुकन नावाचे विरघळणारे फायबर असते, जे पचनक्रिया मंदावते आणि जास्त भूक लागण्यापासून रोखते. याशिवाय, बार्लीच्या पाण्यातील उच्च फायबरमुळे जास्त खाणे टाळले जाते.
जेवणानंतर रक्तातील साखरेची पातळी स्थिर ठेवण्यास बार्लीचे पाणी मदत करते, असे विविध अभ्यासातून सिद्ध झाले आहे. गोड पदार्थ खाल्ल्यानंतर रक्तातील साखरेची पातळी अचानक वाढते, ती नियंत्रित करण्यासाठी बार्लीचे पाणी प्यायल्यास मदत होते.
अभ्यासानुसार, बार्लीचे पाणी रक्तातील साखरेची पातळी प्रभावीपणे कमी करते. नुकत्याच झालेल्या एका अभ्यासात असे दिसून आले आहे की, मधुमेहाचा धोका असलेल्या महिलांनी चार आठवडे बार्लीचे सेवन केल्यावर त्यांच्या रक्तातील साखरेची पातळी कमी झाल्याचे लक्षात आले. दुसऱ्या एका अभ्यासात, टाइप 2 मधुमेह असलेल्या लोकांमध्येही बार्लीचे सेवन केल्यानंतर रक्तातील साखरेची पातळी कमी झाल्याचे आढळले.
बार्लीच्या पाण्यातील अँटीऑक्सिडंट गुणधर्म शरीरातील विषारी पदार्थ आणि अशुद्धी बाहेर टाकण्यास मदत करतात. हे एक पौष्टिक आणि हायड्रेटिंग पेय आहे, जे शरीराची पीएच पातळी राखण्यास आणि किडनी व यकृताच्या शुद्धीकरणास प्रोत्साहन देण्यास मदत करते.
बार्लीच्या पाण्यातील फायबरमुळे आतड्यातील चांगल्या बॅक्टेरियांची वाढ होते. बार्लीचे पाणी शरीरातील आणि आतड्यातील विषारी पदार्थ मूत्रमार्गाद्वारे बाहेर टाकते.
बार्लीचे पाणी उकळून त्यात लिंबाचा रस घालून प्यायल्याने कोलेस्ट्रॉल नियंत्रणात राहते आणि हृदयाचे आरोग्य सुधारण्यास मदत होते. शरीराला हायड्रेट ठेवण्यासाठी आणि डिहायड्रेशन टाळण्यासाठी बार्लीचे पाणी उपयुक्त आहे. बार्लीचे पाणी किडनीचे कार्य सुधारते.


