सप्टेंबरमध्ये एकूण युपीआय (UPI) व्यवहारांमध्ये थोडी घट झाली असली, तरी रोजच्या व्यवहारांनी पहिल्यांदाच ८० कोटींचा टप्पा ओलांडला आहे. सणासुदीच्या काळात मोठ्या रकमांची देवाणघेवाण वाढल्याने हा विक्रम झाला. पण १५ ऑक्टोबरपासून काही युपीआय व्यवहारांवर शुल्क लागणार असल्याने व्यापाऱ्यांमध्ये थोडी चिंता आहे.

ऑगस्टच्या तुलनेत सप्टेंबरमध्ये युपीआय व्यवहारांमध्ये थोडी घट पाहायला मिळाली. पण याच महिन्यात एका दिवसात होणाऱ्या युपीआय व्यवहारांची संख्या पहिल्यांदाच ८० कोटींच्या पार गेली आहे. नॅशनल पेमेंट्स कॉर्पोरेशन ऑफ इंडियाने (NPCI) नुकत्याच जाहीर केलेल्या आकडेवारीतून ही माहिती समोर आली आहे. १५ ऑक्टोबरपासून काही निवडक युपीआय व्यवहारांवर शुल्क आकारले जाणार आहे, या पार्श्वभूमीवर हा नवा रिपोर्ट आला आहे.

आकडेवारी काय सांगते?

सप्टेंबरमधील एकूण युपीआय व्यवहारांची संख्या १.८ टक्क्यांनी कमी होऊन २४०७ कोटींवर आली आहे. ऑगस्टमध्ये हा आकडा २४५१ कोटी होता. पैशांच्या देवाणघेवाणीचा विचार केला, तर त्यातही १.५ टक्क्यांची घट झाली आहे. हा आकडा २९.८२ लाख कोटी रुपयांवरून २९.३७ लाख कोटी रुपयांवर आला आहे. असं असलं तरी, रोजच्या सरासरीचा विचार केल्यास भारतीयांनी एका दिवसात ९७,९१३ कोटी रुपयांचे तब्बल ८०.२ कोटी युपीआय व्यवहार केले आहेत. हा आतापर्यंतचा सर्वात मोठा उच्चांक आहे.

सणासुदीचा काळ

सणासुदीचा हंगाम सुरू झाल्यामुळेच ही वाढ पाहायला मिळाली. एप्रिल ते ऑगस्ट या काळात रोजचे व्यवहार साधारण ९६,००० कोटी रुपयांच्या आसपास होते. त्यावेळी छोट्या रकमांचे व्यवहार जास्त होत होते. पण सप्टेंबरच्या मध्यावर गणेश चतुर्थीसारखे सण आल्यामुळे लोकांनी युपीआयच्या माध्यमातून मोठ्या रकमा पाठवायला सुरुवात केली.

युपीआयवर आता शुल्क लागणार का?

गेल्या सहा वर्षांपासून युपीआय सेवा पूर्णपणे मोफत होती. पण १५ ऑक्टोबरपासून पी२पी (P2P) युपीआय व्यवहारांवर एनपीसीआय (NPCI) शुल्क लावणार आहे. यामुळे व्यापाऱ्यांमध्ये सध्या चिंतेचं वातावरण आहे.