'एम३एम हुरुन इंडिया रिच लिस्ट २०२६' जाहीर झाली आहे. यात मुकेश अंबानींना पछाडत गौतम अदानी भारताचे नंबर १ श्रीमंत व्यक्ती बनले आहेत. देशात १,००० कोटी रुपयांपेक्षा जास्त संपत्ती असलेल्यांची संख्या आता १,८१० वर पोहोचली आहे.
नवी दिल्ली : देशातील सर्वात श्रीमंत व्यक्तींची यादी असलेली 'एम३एम हुरुन इंडिया रिच लिस्ट २०२६' (M3M Hurun India Rich List 2026) अधिकृतपणे जाहीर झाली आहे. यावेळच्या यादीत अदानी ग्रुपचे अध्यक्ष गौतम अदानी आणि त्यांच्या कुटुंबाने रिलायन्सच्या मुकेश अंबानींना मागे टाकले आहे. अदानी आता पुन्हा एकदा भारतातील नंबर १ श्रीमंत व्यक्ती बनले आहेत. विशेष म्हणजे, देशातील एकूण अब्जाधीशांची (Billionaires) संख्या आता विक्रमी ३९१ वर पोहोचली आहे.
अदानी नंबर १, अंबानींना फटका
गौतम अदानी यांच्या एकूण संपत्तीत १३ टक्क्यांनी वाढ झाली असून ती तब्बल ९.२३ लाख कोटी रुपयांवर पोहोचली आहे. दुसरीकडे, रिलायन्स इंडस्ट्रीजचे अध्यक्ष मुकेश अंबानी यांच्या संपत्तीत १० टक्क्यांची घट झाली आहे. त्यांची संपत्ती आता ८.६३ लाख कोटी रुपये इतकी आहे. यामुळे या दोन्ही दिग्गज उद्योगपतींच्या संपत्तीमध्ये आता सुमारे ५९,४०० कोटी रुपयांचे अंतर निर्माण झाले आहे.
तिसऱ्या आणि चौथ्या क्रमांकावर कोण?
पोलाद व्यावसायिक लक्ष्मी निवास मित्तल आणि त्यांच्या कुटुंबाच्या संपत्तीत जवळपास दुप्पट वाढ झाली आहे. ३.३९ लाख कोटी रुपयांच्या संपत्तीसह त्यांनी यादीत थेट तिसऱ्या क्रमांकावर झेप घेतली आहे. तर, जगप्रसिद्ध कोविशील्ड लस बनवणाऱ्या सीरम इन्स्टिट्यूटचे सायरस पूनावाला यांनी यादीत आपले चौथे स्थान कायम राखले आहे.
१,००० कोटींहून अधिक संपत्ती असलेले १,८१० जण
हुरुनच्या अहवालानुसार, भारतात किमान १,००० कोटी रुपयांपेक्षा जास्त संपत्ती असलेल्या श्रीमंतांची संख्या आता १,८१० वर गेली आहे. या सर्वांची एकूण संपत्ती १८७.५ लाख कोटी रुपये (सुमारे १.९६ ट्रिलियन अमेरिकन डॉलर) इतकी झाली आहे. ही रक्कम भारताच्या एकूण आर्थिक उत्पादनाच्या (GDP) जवळपास निम्म्याइतकी असल्याचे या अहवालात म्हटले आहे.
