फ्लिपकार्ट प्लस सदस्यांसाठी एक खुशखबर आहे. आता त्यांना नेटफ्लिक्सचा मोबाईल प्लॅन पूर्णपणे मोफत मिळणार आहे.
ऑनलाइन शॉपिंग करणाऱ्या फ्लिपकार्ट प्लस सदस्यांसाठी आता मनोरंजनाचीही सोय झाली आहे. दर महिन्याला ठराविक रकमेची खरेदी करणाऱ्या ग्राहकांना आता नेटफ्लिक्सचा (Netflix) मोबाईल प्लॅन पूर्णपणे मोफत मिळणार आहे. ही ऑफर १ ऑगस्ट लागू झाली आहे. फ्लिपकार्ट आणि नेटफ्लिक्स यांच्यात झालेल्या नव्या पार्टनरशिपमुळे ऑनलाइन शॉपिंग करणाऱ्यांसाठी ही आनंदाची बातमी आहे. आजपासून, पात्र प्लस सदस्यांना कोणताही अतिरिक्त चार्ज न देता ३० दिवसांचे नेटफ्लिक्स मोबाईल सबस्क्रिप्शन ॲक्टिव्हेट करता येणार आहे.
मोफत नेटफ्लिक्स सबस्क्रिप्शन कसं मिळवायचं?
हा फायदा मिळवण्यासाठी फ्लिपकार्ट प्लस सदस्यांना काही अटी पूर्ण कराव्या लागतील. एका कॅलेंडर महिन्यात किमान ४ ऑर्डर पूर्ण केलेल्या असाव्यात. प्रत्येक ऑर्डरची किंमत किमान २९९ रुपये असणे आवश्यक आहे. यासाठी फ्लिपकार्ट, फ्लिपकार्ट ग्रोसरी (Grocery) आणि फ्लिपकार्ट मिनिट्स (Minutes - Quick Commerce) यावरील खरेदी ग्राह्य धरली जाईल. चौथी ऑर्डर यशस्वीरित्या पूर्ण झाल्यावर, ग्राहकांना थेट फ्लिपकार्ट ॲपमधून ३० दिवसांचा नेटफ्लिक्स मोबाईल प्लॅन क्लेम करता येईल. पुढच्या महिन्यातही ही सुविधा मिळवण्यासाठी याच अटी पूर्ण कराव्या लागतील.
तुम्ही फ्लिपकार्ट प्लस सदस्य नसाल तर?
जे सध्या फ्लिपकार्ट प्लस सदस्य नाहीत, ते सुद्धा सहजपणे सदस्य बनू शकतात. १२ महिन्यांच्या कालावधीत १५ ऑर्डर पूर्ण करणाऱ्या कोणत्याही ग्राहकाला फ्लिपकार्ट प्लस सदस्यत्व मोफत मिळते. यासाठी कोणतीही वेगळी मेंबरशिप फी भरावी लागत नाही.
नेटफ्लिक्सच्या मोबाईल प्लॅनद्वारे ग्राहक स्मार्टफोन किंवा टॅब्लेटवर सर्व भारतीय आणि आंतरराष्ट्रीय चित्रपट, वेब सिरीज आणि इतर मनोरंजक कार्यक्रम पाहू शकतात.


