धमन्यांमध्ये प्लाक जमा होतात आणि हृदयाला होणारा रक्तपुरवठा खंडित होतो. त्यामुळे हृदयविकाराचा धोका निर्माण होताे.पण आपले हृदय निरोगी ठेवायचे असेल तर ही पाच आरोग्यदायी पेये रक्तदाब आणि LDL कोलेस्ट्रॉल कमी करण्यास मदत करू शकतात.

हदय निरोगी ठेवण्यासाठी जीवनशैलीतील बदलांव्यतिरिक्त काही नैसगिक पेये देखील मदत करू शकतात. यामुळे हृदविकाराचा धोका कमी होऊ शकतो. जगभरातील मृत्यूंमागे हृदयविकार हे एक प्रमुख कारण होय. धमन्यांमध्ये प्लाक जमा झाल्यामुळे हृदयविकार (बहुतेकदा) होतो. वजन कमी करणे, निरोगी आहार आणि रक्तदाब नियंत्रणात ठेवणे गरजेचे असते. सोबत पाच पेयांविषयी माहिती दिली आहे, जी हृदय निरोगी ठेवण्यास मदत करू शकतात.

ग्रीन टी

ग्रीन टीमध्ये कॅटेचिन्स असतात, जे अँटीऑक्सिडंट म्हणून काम करतात. हे LDL कोलेस्ट्रॉलची पातळी आणि ऑक्सिडेटिव्ह तणाव कमी करतात, ज्यामुळे धमन्यांमध्ये प्लाक तयार होतो. दररोज दोन ते तीन कप ग्रीन टी प्यायल्याने एंडोथेलियल कार्य सुधारते. नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ हेल्थनुसार, ग्रीन टीच्या सेवनाने कोरोनरी आर्टरी डिसीज होण्यापासून बचाव होतो.

डाळिंब

डाळिंब हे हृदयाच्या आरोग्यासाठी एक उत्तम फळ आहे. संशोधनानुसार, डाळिंबाच्या रसात असलेले प्युनिकॅलाजिन्स आणि अँथोसायनिन्स हे अँटीऑक्सिडंट्स ऑक्सिडेटिव्ह नुकसानीपासून संरक्षण करतात. दररोज एक कप डाळिंबाचा रस प्यायल्याने कॅरोटिड आर्टरीमधील प्लाकची वाढ रोखता येते आणि रक्ताभिसरण सुधारते. डाळिंबाचे नियमित सेवन केल्यास कालांतराने हृदयविकाराचा धोका कमी होऊ शकतो.

बीट

बीट हृदयासाठी खूप चांगले आहे. यामुळे रक्तवाहिन्यांना आराम मिळतो आणि रक्ताभिसरण सुधारते. हे प्लाक जमा होण्यास प्रतिबंध करण्यास मदत करते. दररोज बीटाचा रस प्यायल्याने रक्तवाहिन्यांचे आरोग्य सुधारते आणि कोलेस्ट्रॉल मेटाबॉलिझमलाही मदत मिळते, हे सिद्ध झाले आहे.

हळदीचे दूध

हळदीमध्ये आढळणारे कर्क्युमिन हे बायोॲक्टिव्ह कंपाऊंड आहे, ज्यात दाहक-विरोधी गुणधर्म असतात. हे आर्टरी प्लाक स्थिर ठेवण्यास आणि नुकसानीपासून संरक्षण करण्यास मदत करते. हळदीच्या दुधात काळी मिरी मिसळल्यास मानवी शरीरात कर्क्युमिनचे शोषण वाढते. या पेयाचे नियमित सेवन केल्याने ऑक्सिडेटिव्ह तणाव कमी होण्यास मदत होते.

जास्वंदीचा चहा

जास्वंदीच्या चहामध्ये अँटीऑक्सिडंट्स असतात, जे रक्तदाब आणि LDL कोलेस्ट्रॉल कमी करण्यास मदत करतात. संशोधनानुसार, दररोज जास्वंदीचा चहा प्यायल्याने धमन्यांची लवचिकता वाढते आणि प्लाक तयार होणे कमी होते, जे हृदयाच्या आरोग्यासाठी फायदेशीर आहे. जास्वंदीच्या चहामध्ये असलेले अँथोसायनिन्स नैसर्गिकरित्या नायट्रिक ऑक्साईडचे उत्पादन वाढवण्यास मदत करतात.