ई-पॅन कार्ड डाउनलोड करण्याच्या सूचनांसह येणारे ईमेल हे आर्थिक फसवणूक आणि सायबर फसवणुकीचा भाग असू शकतात. आयकर विभाग वैयक्तिक माहिती किंवा आर्थिक खात्यांची माहिती मागण्यासाठी ईमेल पाठवत नाही.

तुम्हालाही कदाचित ई-पॅन कार्ड डाउनलोड करा असा निर्देश असलेला ईमेल आला असेल. ऑनलाइन ई-पॅन कार्ड डाउनलोड करण्यासाठी 'स्टेप-बाय-स्टेप मार्गदर्शक' असे म्हणत हा मेल येतो. पण या ईमेलचा उद्देश वेगळाच आहे. सविस्तर जाणून घेऊया.

ई-पॅन कार्ड डाउनलोड करा अशा आशयाने येणारे ईमेल हे आर्थिक फसवणूक आणि सायबर फसवणुकीचा भाग आहेत. ई-पॅन कार्ड डाउनलोड करा अशी माहिती असलेले ईमेल हे आयकर विभागाने पाठवलेले नाहीत. त्यामुळे अशा बनावट ईमेलना प्रतिसाद देताना लोकांनी सावधगिरी बाळगली पाहिजे, असे प्रेस इन्फॉर्मेशन ब्युरोच्या फॅक्ट चेक विभागाने म्हटले आहे. तुमची आर्थिक आणि बँक खात्याची माहिती मागणाऱ्या कोणत्याही ईमेल, कॉल, एसएमएस किंवा लिंकला प्रतिसाद देऊ नका याची विशेष काळजी घ्या.

आयकर विभागाचे स्पष्टीकरण आणि सूचना

आयकर विभाग वैयक्तिक माहिती मागणारे ईमेल पाठवत नाही हे खरे आहे. तसेच पिन नंबर, पासवर्ड, क्रेडिट कार्ड किंवा इतर आर्थिक खात्यांची माहिती मागण्यासाठी आयकर विभाग ईमेलद्वारे नागरिकांशी संपर्क साधत नाही. त्यामुळे आयकर विभागाकडून आल्याचा दावा करणाऱ्या ईमेलना प्रतिसाद देऊ नये, असे आयकर विभागानेच कळवले आहे. अशा ईमेल संदेशांसोबत येणाऱ्या संशयास्पद लिंक आणि फाइल्सवर कधीही क्लिक करू नका. बँक खाते, क्रेडिट कार्डची माहिती देऊ नका.

आयकर विभागाच्या नावाने तुम्हाला जर एखादा ईमेल संदेश आला असेल किंवा आयकर विभागाचा असल्याचा दावा करणारी वेबसाइट तुमच्या निदर्शनास आली असेल. अशा प्रकारे ईमेलची तक्रार केल्यानंतर तो संदेश डिलीट करू शकता.