उत्तर कोरियाला मिळणार महिला हुकूमशहा, किमची उत्तराधिकारी मुलगी परंपरा मोडण्यास सज्ज
उत्तर कोरियाला लवकरच महिला हुकूमशहा मिळण्याची शक्यता आहे. किम जोंग उन यांची बहीण नाही, तर त्यांची मुलगीच उत्तराधिकारी असेल, असा दावा रिपोर्टमध्ये केला जात आहे. किम जोंग उन आपली मुलगी किम जू ए हिला उत्तराधिकारी म्हणून घोषित करण्याच्या तयारीत आहेत.

उत्तराधिकारी मुलगीच होणार
धोरणात्मक बाबींमध्येही किम जू ए हिला विशेष अधिकार दिले जात आहेत, असा दक्षिण कोरियन गुप्तचर यंत्रणांचा दावा आहे. आगामी वर्कर्स पार्टीच्या अधिवेशनात याबाबत मोठी घोषणा होण्याची शक्यता आहे. किमच्या प्रकृतीबद्दल यापूर्वी अनेक रिपोर्ट्स आले होते. त्यावेळी किमची बहीण किम यो जोंग सत्तेवर येईल, अशा बातम्या आंतरराष्ट्रीय स्तरावर होत्या. पण सध्याचे संकेत हे दावे फेटाळत आहेत. किम आपल्या बहिणीला नाही, तर मुलीला उत्तराधिकारी मानत असल्याचे राजकीय तज्ज्ञांचे मत आहे.
बहिणीला डावलल्याचे संकेत
किम जोंग उनची बहीण किम यो जोंग ही त्याच्या सर्वात विश्वासू सहकाऱ्यांपैकी एक आहे. ती किमपेक्षाही जास्त क्रूर असल्याच्या बातम्या यापूर्वी आल्या होत्या. पण आता कार्यक्रमांमध्ये किमसोबत त्याच्या मुलीची उपस्थिती, बहिणीच्या उत्तराधिकारी होण्याच्या शक्यतांना कमी करत आहे.
वय आणि इतर माहिती अजूनही अस्पष्ट
गेल्या सप्टेंबरमध्ये किम जोंग उन आपल्या पहिल्या बहुराष्ट्रीय शिखर परिषदेसाठी चीनमध्ये आपल्या चिलखती ट्रेनमधून पोहोचल्यापासून, राजकीय विश्लेषकांचे लक्ष किमची मुलगी किम जू ए हिने वेधून घेतले आहे. किमने आपल्या कुटुंबाबद्दलची माहिती नेहमीच गुप्त ठेवली आहे. त्यामुळे किम जू ए हिच्या अचूक वयाबद्दलची माहिती अजूनही अस्पष्ट आहे. किम जोंग उन आणि त्याची पत्नी री सोल जू यांना तीन मुले आहेत आणि जू ए ही दुसरी मुलगी आहे, असे मानले जाते. पण मुलांची नेमकी संख्या किंवा क्रम निश्चित नाही. लग्नानंतर बऱ्याच काळाने त्याने आपल्या पत्नीला सार्वजनिक ठिकाणी आणले होते.
अधिकृतपणे समोर आलेली किमची एकुलती एक मुलगी
देशाच्या नेतृत्वाने अधिकृतपणे ओळख दिलेली किमची एकुलती एक मुलगी जू ए आहे. इतर कोणत्याही मुलाला आतापर्यंत सार्वजनिक ठिकाणी पाहिलेले नाही. 2013 मध्ये उत्तर कोरियाला भेट देणारा बास्केटबॉलपटू डेनिस रॉडमन याच्यामुळे पहिल्यांदाच अशा मुलीच्या अस्तित्वाची बातमी समोर आली. त्याने 'द गार्डियन' वृत्तपत्राला सांगितले होते की, त्याने त्यांची मुलगी जू ए हिला उचलून घेतले होते. त्यानंतर नोव्हेंबर 2022 मध्ये एका आंतरखंडीय बॅलिस्टिक क्षेपणास्त्र प्रक्षेपणावेळी वडिलांसोबत दिसण्यापर्यंत जू ए बद्दल कोणतीही माहिती नव्हती.
किम जोंग उनची 'आदरणीय' मुलगी
फेब्रुवारी 2023 पर्यंत, जू ए टपाल तिकिटांवर दिसू लागली आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मेजवानीत सहभागी झाली. उत्तर कोरियामध्ये जू ए हिला 'किम जोंग उनची आदरणीय मुलगी' असे संबोधले जाते. उत्तर कोरियामध्ये फक्त सर्वात प्रतिष्ठित व्यक्तींनाच 'आदरणीय' हे विशेषण दिले जाते. किम जोंग उनलाही भावी नेता म्हणून निश्चित केल्यानंतरच 'आदरणीय कॉम्रेड' म्हटले जाऊ लागले.
दक्षिण कोरियन गुप्तचर संस्थेचा खुलासा
याच काळात दक्षिण कोरियन गुप्तचर संस्थेने या मुलीबद्दल अधिक माहिती उघड केली. जू ए हिला घोडेस्वारी, स्कीइंग आणि पोहण्याची आवड आहे आणि ती प्योंगयांगमध्ये घरीच शिकते, असे या संस्थेने म्हटले होते. जू ए सुमारे 10 वर्षांची असल्याचा अंदाजही दक्षिण कोरियन गुप्तचर संस्थेनेच वर्तवला होता.
अजूनही बदल होण्याची शक्यता
जानेवारी 2024 पर्यंत, किम जोंग उनची उत्तराधिकारी होण्याची सर्वाधिक शक्यता जू ए हिचीच आहे, असा निष्कर्ष दक्षिण कोरियन गुप्तचर संस्थेने काढला. तरीही, किमचे वय कमी असल्याने भविष्यात बदल होऊ शकतात, असेही त्यांनी नमूद केले.
सैनिकी सलामी स्वीकारताना जू ए
लष्करी परेड आणि क्षेपणास्त्र प्रक्षेपणावेळी किमसोबत दिसणारी जू ए, आता वरिष्ठ लष्करी अधिकाऱ्यांकडून सैनिकी सलामीही स्वीकारत आहे.
60 वर्षांची परंपरा मोडणार किम
सप्टेंबर २०२५ मध्ये जू ए पहिल्यांदा उत्तर कोरियाबाहेर दिसली. 1948 पासून उत्तर कोरियावर राज्य करणारे किम कुटुंब, आपण एका पवित्र रक्ताच्या वंशाचे आहोत आणि फक्त आपल्यालाच देश चालवण्याचा अधिकार आहे, असे नागरिकांना सांगतात. पण पुरुषप्रधान आणि आतापर्यंत एकही महिला शासक नसलेल्या उत्तर कोरियात, आपल्या मुलीला आधीच लोकांसमोर आणून किम लोकांचा पूर्वग्रह बदलण्याचा प्रयत्न करत असल्याचे राजकीय तज्ज्ञांचे मत आहे.
किम यो जोंग किमपेक्षाही क्रूर
किम आपल्या बहिणीला नाही, तर मुलीला उत्तराधिकारी मानत असल्याचे राजकीय तज्ज्ञांचे मत आहे. किम जोंग उनची बहीण किम यो जोंग ही त्याच्या सर्वात विश्वासू सहकाऱ्यांपैकी एक आहे. ती किमपेक्षाही जास्त क्रूर असल्याच्या बातम्या यापूर्वी आल्या होत्या. पण आता कार्यक्रमांमध्ये किमसोबत त्याच्या मुलीची उपस्थिती, बहिणीच्या उत्तराधिकारी होण्याच्या शक्यतांना कमी करत आहे.

