तुम्ही आयुष्यात पहिल्यांदाच हेलिकॉप्टरने प्रवास करणार असाल, तर उत्साहासोबतच सुरक्षेची काळजी घेणंही खूप महत्त्वाचं आहे.

मुंबई : आपण सहसा प्रवासासाठी विमान, ट्रेन किंवा बस वापरतो. पण काही खास परिस्थितीत हेलिकॉप्टरने प्रवास करण्याची वेळ येऊ शकते. पर्यटन स्थळांवरची 'हेलिकॉप्टर राईड' असो, दुर्गम भागात जायचं असो, आपत्कालीन परिस्थितीत बचावकार्य करायचं असो किंवा उपचारांसाठी जायचं असो, आयुष्यात कधी ना कधी हेलिकॉप्टरमध्ये बसण्याची संधी मिळू शकते. पहिल्यांदा हेलिकॉप्टरमध्ये बसताना उत्साहासोबतच काही गोष्टींची काळजी घेणंही आवश्यक आहे. विमानापेक्षा हेलिकॉप्टरची कार्यपद्धती वेगळी असल्यामुळे, सुरक्षेच्या नियमांचं काटेकोरपणे पालन करणं सर्वात महत्त्वाचं आहे.

हेलिकॉप्टरजवळ जाताना ही काळजी घ्या

हेलिकॉप्टर थांबलेलं असलं तरी त्याच्या पंख्यांची (रोटर ब्लेड्स) हालचाल आणि जोरदार वाऱ्यामुळे धोका निर्माण होऊ शकतो. त्यामुळे पायलट किंवा ग्राउंड स्टाफच्या परवानगीशिवाय हेलिकॉप्टरजवळ जाऊ नका. विशेषतः मागच्या बाजूने कधीही जाऊ नका. कर्मचारी जी सुरक्षित वाट दाखवतील, त्याच मार्गाने हेलिकॉप्टरमध्ये चढा आणि उतरा.

तुमच्या वस्तू सांभाळा

टोपी, स्कार्फ, कागद अशा हलक्या वस्तू हेलिकॉप्टरच्या जोरदार वाऱ्याने उडून जाऊ शकतात. यामुळे इतरांना इजा होण्याची शक्यता असते. त्यामुळे तुमच्या हातातील वस्तू सुरक्षित ठेवा आणि बॅग व्यवस्थित सांभाळा.

चढताना आणि उतरताना घाई नको

हेलिकॉप्टरकडे धावत जाऊ नका किंवा घाईघाईने उतरू नका. नेहमी मान खाली वाकवून, कर्मचाऱ्यांनी दाखवलेल्या मार्गानेच चाला. विशेषतः डोंगराळ किंवा मोकळ्या जागेत उतरताना जास्त सतर्क राहा.

प्रवासादरम्यान हे लक्षात ठेवा

सीट बेल्ट व्यवस्थित लावा. प्रवास सुरू होण्यापूर्वी दिल्या जाणाऱ्या सुरक्षेच्या सूचना लक्षपूर्वक ऐका. फोटो किंवा व्हिडिओ काढण्याच्या नादात कर्मचाऱ्यांनी दिलेल्या सूचना मोडू नका.

हेलिकॉप्टरचा प्रवास हा अनेकांसाठी एक दुर्मिळ आणि रोमांचक अनुभव असतो. पण या उत्साहापेक्षा सुरक्षेला प्राधान्य दिल्यास, आकाशातील हा प्रवास अधिक सुरक्षित, सुंदर आणि अविस्मरणीय अनुभव ठरू शकतो.