EPFO ने आर्थिक वर्ष 2025-26 साठी व्याज सदस्यांच्या EPF खात्यात जमा करण्यास सुरुवात केली आहे. सदर प्रक्रिया टप्प्याटप्प्याने सुरू आहे. पण काही सदस्यांना त्याचा अद्याप एसएमएस आलेला नाही.

मुंबई : कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेने (EPFO) आर्थिक वर्ष 2025-26 साठी पीएफच्या खात्यांमध्ये व्याज जमा करण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. केंद्र सरकारने EPF ठेवींवर 8.25 टक्के व्याजदराला मंजुरी दिली होती. या निर्णयामुळे देशभरातील कोट्यवधी ईपीएफओ सदस्यांचा फायदा होणार आहे.

ईपीएफकडून अनेक सदस्यांच्या खात्यात व्याजाची रक्कम जमा झाली आहे. याबाबत सदस्यांना एसएमएसद्वारे माहितीही मिळाली आहे. मात्र, काही सदस्यांच्या खात्यात अद्याप व्याजाची आलेले दिसत नाहीये. याशिवाय काहींना ईपीएफकडून कोणताही मेसेज मिळालेला नसल्याने अनेक खातेदारांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे.

सर्व खात्यांमध्ये एकाच वेळी जमा होत नाही व्याज

ईपीएफकडून व्याज जमा करण्याची प्रक्रिया टप्प्याटप्प्याने पूर्ण केली जात आहे. सर्व सदस्यांच्या खात्यांमध्ये एकाच दिवशी व्याजाची रक्कम जमा केली जात नाहीये. अनेक खाती असल्याने ही प्रक्रिया बॅचनुसार (Batch-wise) पूर्ण केली जात आहे. त्यामुळे काही सदस्यांच्या खात्यात व्याज जमा होण्यास थोडा वेळ लागू शकतो. तसेच व्याज जमा झाल्यानंतर त्याची माहिती एसएमएसद्वारे (SMS) मिळण्यासाठीही काही दिवसांचा कालावधीही लागू शकतो.

SMS आला नाही म्हणून टेन्शन घेऊ नका

अनेक सदस्यांनी व्याज जमा झाल्याचा मेसेज अद्याप मिळाला नसल्याची तक्रार केली आहे. खरंतर, ईपीएफओकडून सर्व खात्यांचे अपडेट क्रमाक्रमाने केले जात आहे. तज्ज्ञांच्या मते, सदस्यांना यासाठी काही दिवस थांबावे लागू शकते. अनेकदा खात्यातील माहिती अपडेट होण्यास आणि एसएमएस अलर्ट मिळण्यास थोडा वेळ लागू शकतो. 

व्याजाची रक्कम दिसत नसेल तर या गोष्टी तपासा

तज्ज्ञांच्या मते, सदस्यांनी सर्वप्रथम आपल्या ईपीएफ खात्याची माहिती तपासणे आवश्यक आहे. यामध्ये ईपीएफ पासबुक, युएएन अॅक्टिव्हेट (UAN Activation), केवायसी (KYC) माहिती अपडेट आहे का आणि एम्प्लॉयरकडून (Employer) नियमित पैसे जमा होत आहे का, याची खात्री करावी. ही सर्व माहिती असली तरीही खात्यात व्याजाची नोंद दिसत नसेल, तर सदस्य ईपीएफोकडे ऑनलाइन तक्रार करू शकतात.

संपूर्ण वर्षाचे व्याज एकाच वेळी जमा केले जाते

ईपीएफओकडून प्रत्येक आर्थिक वर्षाचे व्याज सदस्यांच्या खात्यात जमा केले जाते. यंदा ही प्रक्रिया मागील वर्षांच्या तुलनेत लवकर सुरू करण्यात आली आहे. ज्या सदस्यांच्या खात्यात अद्याप व्याज जमा झालेले नाही, त्यांनी घाई न करता काही दिवस वाट पाहावी असे सांगण्यात आले आहे. त्यानंतरही व्याजाची रक्कम खात्यात दिसत नसल्यास ईपीएफओच्या अधिकृत वेबसाइटवर तक्रार करू शकता.