Epfo Employee Relief 2025 : कर्मचारी आता घराच्या डाउन पेमेंटसाठी PF खात्यातून 90% पैसे काढू शकतात. हा नियम तीन वर्षांपेक्षा जुन्या PF खात्यांसाठी लागू आहे. EPFO ने कर्मचाऱ्यांना नियोजनपूर्वक निर्णय घेण्याचा सल्ला दिला आहे.

मुंबई : EPFO (कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटना) ने नोकरदार वर्गासाठी एक अत्यंत महत्त्वाचा आणि दिलासादायक निर्णय घेतला आहे. PF फंड (भविष्य निर्वाह निधी) काढण्याच्या नियमांमध्ये महत्त्वपूर्ण बदल करत, आता आपल्या स्वत:च्या घराचे स्वप्न पाहणाऱ्या लाखो कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे.

या नव्या नियमानुसार, जे कर्मचारी स्वतःचं घर खरेदी करण्याची योजना आखत आहेत, ते आता घराच्या डाऊन पेमेंटसाठी आपल्या PF खात्यातून थेट पैसे काढू शकतात. यामुळे जिथे घर घेण्याचं स्वप्न आर्थिक कारणांमुळे अडथळ्यात येत होतं, तिथे आता या निर्णयामुळे आशेचा किरण दिसत आहे.

काय आहे नवा नियम?

EPFO च्या नव्या नियमांनुसार, जर एखाद्या कर्मचाऱ्याचं PF अकाउंट तीन वर्षांपेक्षा जुनं असेल, तर तो त्याच्या खात्यातील 90% रक्कम घर खरेदीसाठी काढू शकतो. हे पाऊल घर खरेदी प्रक्रियेला गती देणारं ठरणार आहे. विशेषतः त्यांच्यासाठी ज्यांच्याकडे डाऊन पेमेंटसाठी तातडीने रक्कम उपलब्ध नाही.

EPFO चा सल्ला, नियोजनपूर्वक निर्णय घ्या

EPFO ने यासोबत एक महत्त्वाचा सल्ला देखील दिला आहे. रिटायरमेंट फंडला दुय्यम स्थान देऊ नका. घर खरेदी करताना उत्साहात निर्णय न घेता योग्य नियोजन करूनच रक्कम काढावी.

रिअल इस्टेट क्षेत्रालाही दिलासा

हा निर्णय फक्त नोकरदार वर्गापुरताच मर्यादित नाही, तर रिअल इस्टेट क्षेत्रालाही याचा मोठा फायदा होणार आहे. घर खरेदीसाठी वाढती मागणी, व्यवहारात गती आणि घर विक्रीत वाढ यामुळे संपूर्ण बाजारालाच बळकटी मिळू शकते.

थोडक्यात फायदे

घर खरेदीसाठी PF मधून डाऊन पेमेंट करता येणार

तीन वर्षांपेक्षा जुने PF खाते असल्यास 90% रक्कमपर्यंत पैसे काढता येणार

कर्मचाऱ्यांचे घराचे स्वप्न पूर्ण होण्यास मदत

रिअल इस्टेट मार्केटला बळ