Mhada lottery 2025 : म्हाडाच्या कोकण मंडळातर्फे ठाणे, वसई, सिंधुदुर्ग आणि बदलापूर येथे ५२८५ परवडणाऱ्या घरांची आणि ७७ भूखंडांची सोडत जाहीर झाली आहे. १४ जुलै २०२५ पासून अर्ज सुरू होणार असून, ३ सप्टेंबर २०२५ रोजी सोडत जाहीर होणार आहे.

मुंबई : म्हाडाच्या कोकण गृहनिर्माण व क्षेत्रविकास मंडळातर्फे घराच्या शोधात असलेल्या नागरिकांसाठी सुवर्णसंधी! ठाणे, वसई, सिंधुदुर्ग आणि बदलापूर येथे 5,285 परवडणाऱ्या घरांची व 77 भूखंडांची संगणकीय सोडत जाहीर करण्यात आली आहे. ही संधी मध्यमवर्गीय व सामान्य कुटुंबांसाठी खऱ्या अर्थाने घराचे स्वप्न साकार करणारी ठरणार आहे.

महत्त्वाच्या तारखा

नोंदणी व अर्ज सुरू: सोमवार, 14 जुलै 2025, दुपारी 1 वाजता

शेवटची मुदत (अर्ज): 13 ऑगस्ट 2025, रात्री 11.59

अनामत रकमेची अंतिम तारीख: 14 ऑगस्ट 2025, रात्री 11.59

प्रारूप यादी: 21 ऑगस्ट 2025, संध्याकाळी 6 वाजता

हरकतींची अंतिम तारीख: 25 ऑगस्ट 2025, संध्याकाळी 6 वाजता

अंतिम पात्र यादी: 1 सप्टेंबर 2025, संध्याकाळी 6 वाजता

सोडत जाहीर: 3 सप्टेंबर 2025, सकाळी 10 वाजता – डॉ. काशीनाथ घाणेकर नाट्यगृह, ठाणे

घरांची विभागणी

20% सर्वसमावेशक योजना: 565 सदनिका

15% एकात्मिक शहर योजना: 3,002 सदनिका

म्हाडा गृहनिर्माण योजना (विखुरलेल्या सदनिका): 1,677 सदनिका

परवडणाऱ्या घरांची योजना: 41 सदनिका

भूखंड (सिंधुदुर्ग, बदलापूर): 77 भूखंड

अर्ज प्रक्रिया पूर्णपणे ऑनलाईन

‘IHLMS 2.0’ संगणकीय प्रणालीद्वारे ही सोडत प्रक्रिया राबवली जाणार आहे. अर्जदार Android किंवा iOS मोबाइलवरही ही प्रणाली वापरून अर्ज करू शकतात. अर्ज प्रक्रिया व मार्गदर्शनासाठी https://housing.mhada.gov.in या संकेतस्थळावर आवश्यक माहिती, व्हिडीओज, हेल्पफाइल्स उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत.

नागरिकांसाठी महत्त्वाचा सल्ला

कोकण मंडळाच्या मुख्य अधिकारी रेवती गायकर यांनी स्पष्ट केले आहे की ही संपूर्ण प्रक्रिया पारदर्शक व ऑनलाईन आहे. कोणत्याही दलाल, एजंट, मध्यस्थाच्या अमिषाला बळी पडू नये. म्हाडाने कोणालाही अधिकृत प्रतिनिधी नेमलेले नाहीत. शंका असल्यास 022-69468100 या हेल्पलाईनवर संपर्क साधावा.