EPF 2026 अंतर्गत पीएफ काढण्याच्या नियमांमध्ये मोठे बदल करण्यात आले आहेत. नोकरी सोडल्यानंतर पूर्ण पीएफ सेटलमेंटसाठी आता वर्षभर वाट पाहावी लागण्याची शक्यता आहे.
मुंबई : कर्मचारी भविष्य निधी संघटनेच्या (EPFO) सदस्यांसाठी महत्त्वाची बातमी आहे. केंद्र सरकारने जाहीर केलेल्या EPF 2026 योजनेनंतर भविष्य निर्वाह निधी (PF) काढण्याच्या नियमांमध्ये अनेक महत्त्वाचे बदल करण्यात आले आहेत. खासकरुन नोकरी सोडल्यानंतर अंतिम पीएफ सेटलमेंट, अॅडव्हान्स रक्कम काढण्याचे नियम आणि किमान शिल्लक राखण्याबाबत नवीन नियम लागू करण्यात आले आहेत.

ईपीएफओकडून सोशल मीडियावरील प्लॅटफॉर्म X वर एक पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये ईपीएफओने म्हटले आहे की, पीएफमधून तुम्ही किती वेळा अॅडव्हान्स रक्कम काढू शकता.
नोकरी सोडल्यानंतर लगेच पूर्ण पीएफ मिळणार?
नव्या नियमांनुसार, तुम्ही नोकरी सोडल्यानंतर पूर्ण पीएफ काढू शकत नाही. यासाठी तुम्हाला 12 महिने म्हणजे जवळजवळ वर्षभर वाट पहावी लागणार आहे. याआधी बेरोजगार झालेल्या कर्मचाऱ्यांना दोन महिन्यानंतर पूर्ण पीएफ काढता येत होता. पण बदलेल्या नियमांनुसार, अंतिम सेटलमेंटसाठी वाट पाहावी लागणार आहे.
25 टक्के रक्कम शिल्लक ठेवणे बंधनकारक
ईपीएफ 2026 च्या नव्या नियमांअंतर्गत सदस्यांना Eligible Member Balance मधील 100 टक्क्यांपर्यंत अॅडव्हान्स रक्कम काढण्याची सुविधा देण्यात आली आहे. मात्र त्याचवेळी खात्यात एकूण जमा योगदानापैकी किमान 25 टक्के शिल्लक कायम ठेवणे अनिवार्य असणार आहे. यामुळे पूर्ण पैसे एकाच वेळी काढता येणार नाहीयेत.
कोणत्या कारणांसाठी आणि किती वेळा पीएफ अॅडव्हान्स मिळणार?
1. आजारपणासाठी
स्वतःच्या किंवा कुटुंबातील व्यक्तींच्या वैद्यकीय उपचारांसाठी पीएफ अॅडव्हान्स काढू शकता. या कारणासाठी अॅडव्हान्स काढण्यावर निश्चित मर्यादा नाही. पण पात्रतेनुसार आणि आवश्यकतेनुसार अनेक वेळा अर्ज करता येईल.
2. शिक्षणासाठी
स्वतःच्या किंवा मुलांच्या उच्च शिक्षणासाठी पीएफ अॅडव्हान्स काढण्याची सुविधा दिली आहे. यामध्ये जास्तीत जास्त 10 वेळा सुविधेचा लाभ घेता येईल.
3. लग्नासाठी
स्वतःचे, मुलांचे किंवा कुटुंबीयांच्या विवाहासाठी पीएफमधून अॅडव्हान्स घेता येईल. संपूर्ण सेवाकाळात एकूण 5 वेळा लग्नासाठी पीएफ अॅडव्हान्स काढण्याची परवानगी असेल.
4. घर खरेदी, प्लॉट, बांधकाम किंवा गृहकर्जासाठी
घर, फ्लॅट किंवा प्लॉट खरेदी, घराचे बांधकाम किंवा दुरुस्ती तसेच गृहकर्जाची परतफेड करण्यासाठी पीएफ अॅडव्हान्स काढू शकता. मात्र यामध्ये पात्रतेच्या अटी तपासून पाहिल्या जातील.
5. विशेष किंवा आपत्कालीन परिस्थितीत
सेंट्रल बोर्ड ऑफ ट्रस्टी (CBT) यांच्यानुसार विशेष किंवा आपत्कालीन परिस्थितीत एका आर्थिक वर्षात किमान 2 वेळेस पीएफ अॅडव्हान्स काढण्याची परवानगी असेल.
12 महिन्यांच्या सदस्यत्वानंतर 75 टक्क्यांपर्यंत रक्कम
नवीन नियमांनुसार, ईपीए सदस्यत्वाला 12 महिने पूर्ण झाल्यानंतर कर्मचारी आपल्या एकूण पीएफ शिल्लकीपैकी 75 टक्क्यांपर्यंत रक्कम काढू शकतात. मात्र, प्रत्यक्षात किती रक्कम मिळेल हे संबंधित सदस्याची पात्रता, खात्यातील शिल्लक आणि ईपीएफ 2026 च्या योजनेतील अटींवर अवलंबून असेल.


