एका तरुणाने सोशल मीडियावर एक पोस्ट केली आणि देशभरात मोठी चर्चा सुरू झाली. त्याने लिहिलं, 'यावर्षी मी भरलेला इन्कम टॅक्स माझ्या पहिल्या नोकरीच्या पगारापेक्षाही जास्त आहे' या पोस्टमुळे प्रामाणिकपणे टॅक्स भरणाऱ्या मध्यमवर्गाच्या समस्या, कराचा बोजा आणि सुविधांचा अभाव हा मुद्दा पुन्हा चर्चेत आला आहे.
मुंबई : सोशल मीडियावर सध्या एका कर्मचाऱ्याची पोस्ट तुफान व्हायरल होत आहे. 'यावर्षी मी भरलेला इन्कम टॅक्स (Income Tax) माझ्या करिअरच्या पहिल्या वर्षाच्या एकूण पगारापेक्षा (Fresher CTC) जास्त आहे!' असं या व्यक्तीने आपल्या पोस्टमध्ये म्हटलं आहे. या एका वाक्याने भारतात प्रामाणिकपणे टॅक्स भरणाऱ्या मध्यमवर्गीय (Middle Class) लोकांच्या मनातली खदखद पुन्हा एकदा समोर आणली आहे.
'आर्यांश' (Aaryansh) नावाच्या एका युजरने 'X' या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर आपला इन्कम टॅक्स रिटर्न (ITR) भरल्यानंतर ही पोस्ट केली. या पोस्टमधून त्याने फक्त आपली अडचणच नाही, तर टॅक्स भरूनही चांगल्या सुविधा का मिळत नाहीत, हा सवाल सरकारला विचारला आहे.
करदात्याची व्यथा आणि नाराजी
आर्यांशने आपल्या पोस्टमध्ये टॅक्स भरणाऱ्या नागरिकांना मिळणाऱ्या सुविधांवर गंभीर प्रश्न उपस्थित केले आहेत.
तो म्हणतो, 'मी माझ्या कमाईचा मोठा हिस्सा टॅक्स म्हणून देतो, पण तरीही मला माझ्याच पीएफचे (PF - Provident Fund) पैसे काढण्यासाठी संघर्ष करावा लागतो. सरकारी शाळांची (Government Schools) अवस्था आपल्याला माहीतच आहे, त्यामुळे मुलांना तिथे पाठवू शकत नाही. चांगल्या आणि मोफत उपचारांसाठी सरकारी रुग्णालयांवर (Government Hospitals) अवलंबून राहता येत नाही. चांगल्या रस्त्यांवर गाडी चालवण्यासाठी टॅक्स भरूनही वरून टोल फी (Toll Fee) द्यावी लागते. सगळीकडे प्रदूषण इतकं आहे की स्वतःच्या पैशांनी एअर प्युरिफायर (Air Purifier) आणि वॉटर प्युरिफायर (Water Purifier) विकत घ्यावं लागतंय.'
आपल्या कष्टाच्या कमाईतून दरवर्षी मोठी रक्कम टॅक्स म्हणून देणाऱ्या लोकांना सरकारच्यावतीने किमान काही ठोस सुविधा तरी मिळायला हव्यात, असं त्याचं म्हणणं आहे.
सोशल मीडियावर नेटकऱ्यांची जुंपली:
ही पोस्ट व्हायरल होताच नेटकऱ्यांनी त्यावर वेगवेगळ्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका युजरने आर्यांशला पाठिंबा देत म्हटलं, 'आम्हा करदात्यांना कोणतीही विशेष व्हीआयपी ट्रीटमेंट नकोय, पण आम्ही जो टॅक्स भरतो, त्याच्या बदल्यात किमान मूलभूत सुविधा तरी नीट काम करायला हव्यात.'
तर दुसरीकडे काही जणांनी यावर वेगळं मत मांडलं आहे. एकाने लिहिलं, 'देशात पायाभूत सुविधा सुधारत आहेत. उदाहरणार्थ, मेट्रो रेल्वेमध्ये फक्त ३० रुपयांत ३५ किलोमीटरचा प्रवास करता येतो. हायवे चांगले झाले आहेत. खरी समस्या प्रशासकीय यंत्रणेत आहे, त्यात सुधारणा व्हायला हवी.' इन्कम टॅक्स भरण्याच्या काळातच ही चर्चा सुरू झाल्यामुळे मध्यमवर्गावरील टॅक्सचा बोजा आणि सुविधांची कमतरता हा मुद्दा पुन्हा एकदा चर्चेत आला आहे.


