धकाधकीच्या आयुष्यात आपल्या आरोग्याकडे लक्ष देणेही गरजेचे आहे. पुरेशी झोप झाल्यानंतरही तुम्हाला सतत थकवा किंवा अशक्तपणा जाणवत असेल, तर सावध व्हा, हे एक थायरॉईड असंतुलनाचे एक सामान्य लक्षण असू शकते. त्यामुळे लगेच डॉक्टरचा सल्ला घ्या.
आयुष्य एवढे धावपळीचे बनले आहे की, शरीर स्वास्थ्यासाठी आवश्यक असलेले वेळापत्रक सांभाळणे शक्य होत नाही. अपुरी झोप, अवेळी खाणे, वेळप्रसंगी जंक फूडवर भूक भागवणे. व्यायाम किंवा योग करण्यासाठी वेळ न देणे किंवा वेळ न मिळणे. दैनंदिन रखडत होणारा प्रवास… अशा अनेक आव्हानांना तोंड द्यावे लागते. मग शरीराचे बिघडलेल्या संतुलनाचे संकेत आपल्याला मिळत असतानाही आपण त्याकडे दुर्लक्ष करतो. सध्याची एक कॉमन समस्या आहे ती थायरॉईडची.
ऊर्जा निर्मिती, शरीराचे तापमान, मूड आणि इतर अनेक कार्यांवर नियंत्रण ठेवण्यात थायरॉईड ग्रंथी महत्त्वाची भूमिका बजावते. थायरॉईड ग्रंथीच्या कार्यात कोणताही अडथळा आल्यास, तयार होणाऱ्या हार्मोन्सच्या प्रमाणातही बदल होतो. येथे थायरॉईडच्या काही महत्त्वाच्या लक्षणांबद्दल माहिती दिली आहे.
सतत थकवा जाणवणे
पुरेशी झोप घेतल्यानंतरही तुम्हाला सतत थकवा किंवा अशक्तपणा जाणवत असेल, तर हे थायरॉईड असंतुलनाचे एक सामान्य लक्षण आहे. जेव्हा थायरॉईड कमी सक्रिय असतो (हायपोथायरॉईडिझम), तेव्हा तुमची चयापचय क्रिया मंदावते, ज्यामुळे थकवा येतो.
अनियमित हृदयाचे ठोके
जास्त सक्रिय थायरॉईडमुळे हृदयाचे ठोके जलद किंवा अनियमित होऊ शकतात. तर, कमी सक्रिय थायरॉईडमुळे हृदयाचे ठोके मंदावू शकतात.
मूड आणि स्मरणशक्तीवर परिणाम
थायरॉईडच्या असंतुलनाचा परिणाम मज्जासंस्था आणि मेंदूच्या कार्यावर होऊ शकतो. यामुळे मूड बदलणे तसेच नैराश्य येऊ शकते.
अतिथकवा
दररोज चांगली झोप घेतल्यानंतरही थकवा जाणवत असेल, तर त्याकडे दुर्लक्ष करू नका. थायरॉईड हार्मोन्सची निर्मिती वाढल्यास किंवा कमी झाल्यास थकवा येऊ शकतो.
त्वचा आणि केसांच्या समस्या
त्वचा असामान्यपणे कोरडी होणे, केस गळणे किंवा जास्त थंडी वाजणे (जेव्हा थायरॉईड कमी सक्रिय असतो) किंवा खूप घाम येणे आणि जास्त गरम होणे ही थायरॉईडची लक्षणे असू शकतात, असे आरोग्य तज्ज्ञ सांगतात.
अचानक वजन वाढणे किंवा कमी होणे
आहारात किंवा जीवनशैलीत कोणताही बदल न करता अचानक वजन वाढणे, हे थायरॉईडच्या मंद कार्याचे लक्षण असू शकते. याउलट, चांगली भूक लागूनही अनपेक्षितपणे वजन कमी होणे हे अति-सक्रिय थायरॉईडचे (हायपरथायरॉईडिझम) लक्षण असू शकते.
पचनाच्या विविध समस्या
थायरॉईड असंतुलनामुळे चयापचय क्रिया मंदावते किंवा वेगवान होते. यामुळे बद्धकोष्ठता (हायपोथायरॉईडिझममध्ये) किंवा वारंवार शौचास होणे किंवा जुलाब (हायपरथायरॉईडिझममध्ये) यांसारख्या समस्या उद्भवू शकतात. कोणत्याही स्पष्ट कारणाशिवाय सतत पचनाच्या समस्या येत असल्यास त्याकडे दुर्लक्ष करू नका.
मानेवर सूज किंवा गाठ येणे
मानेवर सूज येणे, टाय बांधताना अस्वस्थ वाटणे, गाठ दिसणे किंवा आवाज बसणे ही थायरॉईडच्या समस्येची लक्षणे आहेत.


