भात नीट शिजला नसेल किंवा कच्चा राहिला असेल, तर तो फेकून देण्याची गरज नाही. थोडं पाणी शिंपडून मंद आचेवर झाकून ठेवल्यास अवघ्या पाच मिनिटांत भात मऊ होतो. मायक्रोवेव्हमध्येही तुम्ही हा कच्चा भात सहज शिजवू शकता.

स्वयंपाकघरात काम करताना असा अनुभव अनेकांना येतो. बऱ्याचदा कुकर किंवा पातेल्यात भात नीट शिजत नाही. जेवताना दाताखाली कडक तांदूळ आला की खूप वैताग येतो. अशा वेळी अनेक जण तो कच्चा भात फेकून देतात. पण थोडी शक्कल लढवली, तर अवघ्या पाच मिनिटांत हा कडक भात मऊ करता येतो. भात फेकून देऊन नव्याने बनवण्याची अजिबात गरज नाही. ही समस्या कशी सोडवायची, ते आपण जाणून घेऊया.

भात नीट शिजला नाही तर काय करावं?

कुकरमध्ये भात कच्चा राहिल्यास थोडं पाणी घालून तो पुन्हा शिजवता येतो. पण तुम्ही कोणत्या भांड्यात भात बनवत आहात, यावर बऱ्याच गोष्टी अवलंबून असतात. कुकरमध्ये दोन ग्लास तांदूळ घेतले, तर साधारण साडेतीन ते चार ग्लास पाणी घालावं लागतं. दुसरीकडे, पातेल्यात भात शिजवताना मधूनच एखाद-दोन शीतं दाबून पाहावी लागतात. तांदूळ कडक लागला, तर समजून जा की भात अजून शिजलेला नाही. बऱ्याचदा पातेल्यात वरचा भात शिजतो, पण मधला किंवा खालचा भात कच्चाच राहतो. अशा वेळी सगळा भात फेकून देण्यात काहीच अर्थ नाही. थोडं पाणी शिंपडून पुन्हा थोडा वेळ गॅसवर ठेवल्यास भात छान मऊ होतो.

पातेल्यातलं पाणी आटल्यानंतरही तांदूळ कडक वाटत असेल, तर आधी थोडं पाणी घाला. तांदूळ किती कडक आहे, यावर पाण्याचे प्रमाण ठरवा. पण एकाच वेळी खूप जास्त पाणी ओतू नका. जास्त पाणी घातल्यास भात चिकट होऊन त्याचा लगदा होऊ शकतो. गरजेपुरतं पाणी घातल्यावर भांड्यावर नीट झाकण ठेवा.

मंद आचेवर शिजवा

पाणी घातल्यानंतर गॅस एकदम कमी करा आणि काही मिनिटे भात शिजू द्या. भांड्यावर झाकण असल्यामुळे आत भरपूर वाफ तयार होते. याच वाफेमुळे कडक तांदूळ मऊ व्हायला मदत होते. या वेळी वारंवार झाकण उघडू नका. झाकण काढल्यास आतली वाफ बाहेर जाईल आणि भात शिजायला आणखी जास्त वेळ लागेल. काही मिनिटांनंतर झाकण काढून भात शिजलाय की नाही, ते तुम्ही तपासू शकता.

गॅस बंद केल्यावर थोडा वेळ झाकून ठेवा

भात शिजल्याबरोबर तो लगेच वाढण्याची घाई करू नका. गॅस बंद केल्यानंतर किमान पाच ते दहा मिनिटे भांडं झाकूनच ठेवा. पातेल्यात उरलेल्या वाफेमुळे भात आणखी छान मऊ आणि मोकळा होईल. त्यानंतर तुम्ही पळी किंवा चमच्याने भात वाढू शकता.

मायक्रोवेव्हमध्ये कच्चा भात मऊ करण्याची पद्धत

जर तुम्ही मायक्रोवेव्हमध्ये भात बनवत असाल आणि तो कच्चा राहिला असेल, तर तो एका मायक्रोवेव्ह-सेफ भांड्यात काढा. त्यावर काही चमचे पाणी शिंपडा. त्यानंतर मायक्रोवेव्ह-सेफ झाकणाने भांडं झाकून ठेवा. मधूनमधून बाहेर काढून भात मऊ झालाय की नाही ते तपासा. भात पूर्णपणे शिजेपर्यंत हीच पद्धत वापरा.