सणासुदीच्या मुहूर्तावर किआ इंडियाने आपला 'अश्युअर्ड बायबॅक प्रोग्राम' वाढवला आहे. या योजनेत पेट्रोल, डिझेल आणि इलेक्ट्रिक कार्सवर ३ वर्षांनंतर ७० ते ७५ टक्क्यांपर्यंत फिक्स रिसेल व्हॅल्यू मिळणार आहे.

बंगळुरू: सणासुदीच्या काळात (Festive Season) नवीन कार घेण्याचा विचार करत असाल, तर 'किआ इंडिया'ने (Kia India) ग्राहकांसाठी एक भारी बातमी आणली आहे. नवीन कार घेतानाच तिच्या भविष्यातील 'रिसेल व्हॅल्यू'ची (पुन्हा विकताना मिळणारी किंमत) गॅरंटी देण्यासाठी कंपनीने आपला 'अश्युअर्ड बायबॅक प्रोग्राम' (Assured Buyback Program) वाढवला आहे. या ऑफरनुसार, पेट्रोल आणि डिझेल (ICE) कार घेणाऱ्या ग्राहकांना ३ वर्षांनंतर ७५ टक्के, तर इलेक्ट्रिक (EV) कार्सवर ७० टक्के फिक्स रिसेल व्हॅल्यू (Fixed Resale Value) मिळणार आहे.

जुनी कार विकताना किंवा नवीन कारमध्ये अपग्रेड करताना ग्राहकांना किमतीची जी चिंता असते, ती दूर करणं आणि त्यांना पूर्ण खात्री देणं हा या योजनेचा मुख्य उद्देश आहे.

कोणत्या मॉडेल्सवर मिळणार ऑफर?

किआ इंडियाच्या या 'अश्युअर्ड बायबॅक' योजनेत कंपनीच्या लोकप्रिय कार्सचा समावेश आहे. यामध्ये किआ सोनेट (Kia Sonet), सायरॉस (Syros), न्यू सेल्टॉस (New Seltos), कॅरेन्स (Carens), कॅरेन्स क्लॅव्हिस (Carens Clavis) आणि सोरेंटो (Sorento) या मॉडेल्सचा समावेश आहे. नवीन कार घेतानाच ग्राहक किआच्या अधिकृत डीलरशिप्सवर जाऊन अटी आणि शर्ती पूर्ण करून या योजनेचा फायदा घेऊ शकतात.

३, ४ आणि ५ वर्षांच्या कालावधीचा पर्याय

या योजनेअंतर्गत ग्राहकांना वेगवेगळ्या कालावधीचे प्लॅन्स निवडण्याची सोय दिली आहे:

पेट्रोल आणि डिझेल कार्स: या कार्स घेणारे ग्राहक ३, ४ किंवा ५ वर्षांचा 'बायबॅक' प्लॅन निवडू शकतात.

इलेक्ट्रिक कार्स (EV): ईव्ही ग्राहकांसाठी ३ किंवा ४ वर्षांचा प्लॅन उपलब्ध असेल.

यासोबतच, वर्षाला १०,००० किमी, १५,००० किमी किंवा २०,००० किमी गाडी चालवण्याचे पर्याय आहेत. निवडलेल्या एकूण कालावधीत जास्तीत जास्त १ लाख किलोमीटरपर्यंत ही योजना लागू राहील. कारची रिसेल व्हॅल्यू ही ग्राहकांनी निवडलेला प्लॅन आणि ठरलेल्या अटींवर अवलंबून असेल.

बायबॅक योजनेचा ग्राहकांना काय फायदा?

या योजनेबद्दल माहिती देताना किआ इंडियाचे वरिष्ठ उपाध्यक्ष (सेल्स आणि मार्केटिंग) अतुल सूद म्हणाले, "कारच्या भविष्यातील किमतीबद्दल ग्राहकांच्या मनात विश्वास निर्माण करणं आणि पुढच्या काळात नवीन कारमध्ये सहज अपग्रेड करण्यासाठी मदत करणं, हे या योजनेचं मुख्य उद्दिष्ट आहे. कार घेतानाच तिची भविष्यातील किंमत माहीत असल्यामुळे ग्राहकांना त्यांचं आर्थिक नियोजन अधिक चांगल्या प्रकारे करता येईल."

सध्याच्या भारतीय ऑटो मार्केटमध्ये ग्राहक कारचं मायलेज, तंत्रज्ञान आणि परफॉर्मन्ससोबतच 'रिसेल व्हॅल्यू'लाही खूप महत्त्व देतात. या पार्श्वभूमीवर किआ इंडियाची ही बायबॅक ऑफर कार मालकीचा अनुभव आणखी सोपा आणि फायदेशीर बनवणार आहे.