Bubble Wrap DIY ऑनलाइन शॉपिंगमधून आलेल्या पार्सलसोबतचा बबल रॅप फेकून देण्याऐवजी तुम्ही तो घरच्या अनेक कामांसाठी वापरू शकता. नाजूक वस्तू सुरक्षित ठेवण्यापासून ते झाडांना थंडीपासून वाचवण्यासाठी आणि DIY क्राफ्टसाठी बबल रॅप वापरण्याचे ५ सोपे मार्ग जाणून घ्या.
आपण जेव्हा टीव्ही, फ्रीज, वॉशिंग मशीन किंवा एसीसारखी मोठी उपकरणं विकत घेतो, तेव्हा ती सुरक्षित राहावीत म्हणून बबल रॅपमध्ये गुंडाळून येतात. अनेकदा आपण वस्तू बाहेर काढल्यावर तो बबल रॅप सरळ कचऱ्यात फेकून देतो. पण तुम्हाला माहित आहे का, की हाच बबल रॅप घरातल्या अनेक कामांसाठी पुन्हा वापरता येतो? त्यामुळे पुढच्या वेळी पार्सलसोबत बबल रॅप घरी आला, तर त्याला फेकून देण्याऐवजी या वेगवेगळ्या पद्धतींनी पुन्हा वापरा.

बबल रॅपपासून बॅग बनवा

तुम्ही बबल रॅपचा वापर करून लहान किंवा मोठ्या आकाराच्या बॅग्स बनवू शकता. या बॅग्स खूप मजबूत असतात आणि त्यात छोट्या-मोठ्या वस्तू सहज नेता येतात. बॅग बनवण्यासाठी आधी बबल रॅपला हव्या त्या आकारात कापून घ्या. त्यानंतर तुम्ही पांढऱ्या धाग्याने ती शिवू शकता किंवा थेट स्टेपलरने जोडू शकता. काळ्या रंगाच्या धाग्याने बॅगला हँडल बनवा. झाली तुमची सुंदर बबल रॅप बॅग तयार! ही झटपट तयार होणारी बॅग दिसायलाही खूप छान वाटते.
खिडक्यांसाठी बबल रॅपचं इन्सुलेशन
जर तुमच्या घराच्या खिडक्यांमधून आतल्या गोष्टी बाहेर स्पष्ट दिसत असतील, तर तुम्ही काचेवर बबल रॅप लावू शकता. चिकटपट्टीच्या (tape) मदतीने तुम्ही तो खिडक्यांवर सहज चिकटवू शकता. विशेषतः थंडीच्या दिवसात खिडकीच्या काचेवर बबल रॅप लावल्यास खोलीतील उबदारपणा जास्त वेळ टिकून राहतो.
पेंटिंगमध्ये बबल रॅपचा वापर

पेंटिंग, टेक्स्चर कार्ड बनवण्यासाठी, सजावटीसाठी किंवा पेन स्टँडसारख्या छोट्या प्रोजेक्टमध्ये तुम्ही बबल रॅपचा वापर करू शकता. बबल रॅपवर रंग लावून तुम्ही एक वेगळ्या प्रकारची सुंदर डिझाइन तयार करू शकता.
झाडांना सुरक्षित ठेवण्यासाठी बबल रॅप
थंडीच्या दिवसात जर तुम्ही कुंड्यांच्या चारही बाजूंनी बबल रॅप गुंडाळला, तर झाडांना थंड हवा आणि दंवापासून वाचवता येतं. तुम्ही इनडोअर प्लांट्ससाठीही हा उपाय सहज करू शकता.
किंमती वस्तू रॅप करा
घरातील काचेची भांडी, फोटो फ्रेम, मोबाईल किंवा लॅपटॉप कुठे घेऊन जायचा असेल, तर त्यांना बबल रॅपमध्ये गुंडाळून तुम्ही सुरक्षित ठेवू शकता. बबल रॅप अशाप्रकारे एका नाही, तर अनेक कामांसाठी उपयोगी पडतो.

