नारळ फोडल्यावर तुम्ही त्याची शेंडी फेकून देता का? आता असं करू नका. कारण याच शेंडीचा वापर तुम्ही तुमचा किचन आणि गॅस शेगडी स्वच्छ करण्यासाठी करू शकता. हा एक नैसर्गिक आणि पर्यावरणपूरक उपाय आहे.
Gas Burner Cleaning At Home: गॅस शेगडीवर स्वयंपाक झाला की त्यावर तेलकटपणा आणि जळलेले डाग पडतातच. आणि हे डाग काही केल्या पटकन निघत नाहीत. बाजारात मिळणारे अनेक सोल्युशन्स आणि स्क्रबर वापरून तुम्ही थकला असाल, तर आज आम्ही तुम्हाला एक सोपा उपाय सांगणार आहोत. या उपायाने तुम्ही नारळाच्या शेंडीचा वापर करून तुमची गॅस शेगडी आणि बर्नर स्वच्छ करू शकता. नारळाच्या शेंडीमध्ये नैसर्गिक फायबर (रेशे) असतात, जे स्क्रबरसारखं काम करतात. यामुळे स्टील किंवा काचेला कोणताही ओरखडा न येऊ देता गॅसची स्वच्छता अगदी सहज करता येते.
स्वच्छतेसाठी नारळाची शेंडी इतकी प्रभावी का आहे?
नारळाच्या शेंडीमध्ये मजबूत पण मऊ धागे असतात. हे धागे गॅसच्या टॉपवर जमलेला तेलकटपणा आणि जळलेले डाग काढायला मदत करतात. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे, हा उपाय केमिकल-फ्री आणि इको-फ्रेंडली आहे. तुम्ही घरच्या घरी हा स्क्रबर सहज बनवू शकता. म्हणजे एकही पैसा खर्च न करता तुमचा किचन स्क्रबर तयार होईल.
नारळाचा स्क्रबर कसा बनवायचा?
नारळाच्या शेंडीचा स्क्रबर बनवण्यासाठी आधी त्याचे धागे मोकळे करून घ्या. ते पाण्याने चांगले धुवा, म्हणजे त्यातले छोटे कण निघून जातील. आता एका दोरीने हे धागे एकत्र घट्ट बांधा. वरचा भाग कापून एकसारखा करून घ्या. झाला तुमचा स्क्रबर तयार!
नारळाच्या शेंडीने गॅस शेगडी कशी स्वच्छ करायची?
या स्क्रबरने गॅस शेगडी साफ करण्यापूर्वी, गॅस बंद करून ती पूर्ण थंड होऊ द्या. आधी एका सुक्या फडक्याने शेगडीवरची धूळ आणि अन्नाचे कण पुसून घ्या. आता नारळाच्या शेंडीचा स्क्रबर थोडा ओला करा. त्यावर भांड्यांचा साबण किंवा लिक्विड लावा. आता तेलकट किंवा जळलेल्या भागावर गोल-गोल फिरवत हा स्क्रबर घासा. डाग खूप हट्टी असतील, तर साबण लावून ५ मिनिटं तसंच राहू द्या. त्यानंतर पुन्हा घासून ओल्या फडक्याने फेस पुसून घ्या. शेवटी सुक्या फडक्याने पुसल्यावर तुमची गॅस शेगडी नव्यासारखी चमकायला लागेल.
गॅस बर्नर स्वच्छ करण्यासाठी एक्स्ट्रा टीप
जर गॅस बर्नर किंवा शेगडीवर खूपच हट्टी डाग असतील, तर बेकिंग सोडा आणि पाणी एकत्र करून एक मिश्रण तयार करा. हे मिश्रण नारळाच्या शेंडीच्या मदतीने बर्नर आणि गॅस शेगडीवर लावा. १० ते १५ मिनिटं तसंच राहू द्या आणि मग हलक्या हातांनी घासून स्वच्छ करा.


