स्किन की स्किनलेस.. कोणतं चिकन बेस्ट? घरी आणण्यापूर्वी हे नक्की जाणून घ्या
अनेक लोकांसाठी रविवार चिकनशिवाय अपूर्ण असतो. चविष्ट चिकनचा आनंद घेताना, त्याच्या त्वचेबद्दल (skin) नेहमीच एक मोठा प्रश्न पडतो. काहीजण म्हणतात की यामुळे चव छान लागते, तर काहीजण म्हणतात की ते आरोग्यासाठी हानिकारक आहे.

चिकनची स्किन काढावी की नाही?
मांसाहारप्रेमींसाठी चिकन म्हणजे जीव की प्राण. रविवार आला की चिकनच्या एका तुकड्यावरून भांडणं सुरू होतात. पण चिकन शिजवण्याआधी अनेकांना एक मोठा प्रश्न पडतो, तो म्हणजे 'चिकनची स्किन (त्वचा) काढावी की नाही?' अनेक लोकांना वाटतं की स्किन आरोग्यासाठी चांगली नाही. म्हणूनच ते बहुतेकदा स्किनलेस चिकन खातात. तर काहींना चवीसाठी स्किन हवी असते. चला तर मग, खरं काय आहे ते पाहूया.
चिकनच्या स्किनमध्ये काय असतं?
पोषणतज्ञांच्या विश्लेषणानुसार, चिकनच्या स्किनमध्ये दोन-तृतीयांश फॅट्स असतात. पण आश्चर्याची गोष्ट म्हणजे, यातील बहुतेक फॅट्स हे अनसॅचुरेटेड (असंपृक्त) असतात. यात ओमेगा-6 सारखे फॅटी ॲसिड असतात, जे हृदयासाठी चांगले मानले जातात. हे रक्तातील कोलेस्ट्रॉलची पातळी संतुलित ठेवण्यास मदत करते.
कॅलरीज कशा मोजायच्या?
जर तुम्हाला वजन वाढवायचं नसेल, तर चिकनच्या स्किनबद्दल काळजी घ्यायला हवी.
स्किनलेस चिकन (170 ग्रॅम): फक्त 280 कॅलरीज असतात.
स्किनसहित चिकन (170 ग्रॅम): सुमारे 380 कॅलरीज असतात.
याचा अर्थ स्किनसहित चिकन शरीरात सुमारे 100 अतिरिक्त कॅलरीज वाढवते.
चव वाढवण्यासाठी असं करा
स्किनसहित चिकन शिजवण्याचे अनेक फायदे आहेत. शिजवताना, स्किनमधील नैसर्गिक तेल मांसामध्ये मुरते. यामुळे चिकन मऊ होते आणि कडक होत नाही. स्किनसहित चिकन शिजवून खाताना स्किन काढून टाकणे हा एक चांगला मार्ग आहे. यामुळे चव वाढते आणि अनावश्यक फॅट्स शरीरात जात नाहीत.
या लोकांनी स्किन खाऊ नये
चिकनची स्किन फायदेशीर असली तरी, काही आरोग्य समस्या असल्यास ती टाळावी.
वजन कमी करणारे: जास्त कॅलरीजमुळे वजन वाढू शकते.
हृदय रुग्ण: रक्ताच्या गुठळ्या होण्याचा धोका असल्याने स्किन टाळावी.
मधुमेह: साखरेची पातळी नियंत्रणात ठेवण्यासाठी कमी फॅट्सचे प्रोटीन खा.
उच्च कोलेस्ट्रॉल: ज्यांना उच्च कोलेस्ट्रॉल आहे, त्यांनी स्किनलेस चिकन खाणे चांगले.
आता तुम्हीच निर्णय घ्या
जे लोक जिमला जातात आणि ज्यांना मसल्स बनवायचे आहेत, ते चिकन खाऊन जास्त प्रोटीन मिळवू शकतात. एकूणच, कोणताही पदार्थ प्रमाणात खाल्ल्यास तो आरोग्यदायी असतो. पण तुमच्या आरोग्याच्या स्थितीनुसार, चिकन स्किनसहित खायचे की नाही, हे तुम्हीच ठरवायला हवं.

