Car market : लोकप्रिय MPV टोयोटा इनोव्हा क्रिस्टाचे उत्पादन कंपनी बंद करू शकते. आगामी कॅफे 3 उत्सर्जन नियम आणि डिझेल वाहनांऐवजी हायब्रीड मॉडेल्सवर लक्ष केंद्रित करण्याचा निर्णय टोयोटाने घेतला असल्याने हे उत्पादन थांबविले जाईल.
Car market : भारतामध्ये एसयूव्ही गाड्यांना मोठी मागणी आहे. त्यामुळे होंडा, मारुची, महिंद्रा, टाटा अशा विविध कार उत्पादक कंपन्यांनी अशाच गाड्यांच्या उत्पादनांवर लक्ष केंद्रीत केले आहे. नवनवीन मॉडेल बाजारात आणण्याबरोबरच चालू मॉडेल्समध्ये अत्याधुनिक सुधारणा करण्यात येत आहेत. अधिकाधिक सुविधा उपलब्ध करून ग्राहकांना आकर्षित करण्याचा प्रयत्न या कंपन्यांचा आहे. अशातच टोयोटाने एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे.
भारतातील प्रीमियम MPV सेगमेंटमधील टोयोटा इनोव्हा हे एक लोकप्रिय मॉडेल आहे. फॅमिली कार असो किंवा प्रीमियम टॅक्सी, टोयोटा इनोव्हा नेहमीच अनेकांची पहिली पसंती राहिली आहे. दोन दशकांपूर्वी टोयोटा क्वालिसची जागा घेण्यासाठी भारतीय रस्त्यांवर आलेल्या टोयोटा इनोव्हाने अनेक वर्षांपासून भारतीय लोकांच्या मनात स्थान निर्माण केले आहे. भारतात आतापर्यंत इनोव्हाच्या तीन जेन विक्रीसाठी आल्या आहेत. पहिली जेन इनोव्हा, दुसरी जेन इनोव्हा क्रिस्टा आणि आता हायब्रीड तंत्रज्ञानासह येणारी नवीनतम इनोव्हा हायक्रॉस ही ती मॉडेल्स आहेत. आता ताज्या वृत्तांनुसार, कंपनी इनोव्हा क्रिस्टाचे उत्पादन बंद करत आहे. मार्च 2027 पर्यंतच तिचे उत्पादन सुरू राहील, अशी माहिती आहे.
विक्री थांबवण्याचे मुख्य कारण
कंपनी वेळोवेळी इनोव्हाला अपडेट करत आहे. मात्र, आगामी कॅफे 3 नियम आता त्यांच्यासाठी सर्वात मोठे आव्हान बनले आहे. कॅफे अर्थात कॉर्पोरेट ॲव्हरेज फ्युएल इकॉनॉमीनुसार, वाहन उत्पादक कंपन्यांना त्यांच्या संपूर्ण वाहन श्रेणीमध्ये कार्बन डायऑक्साइड उत्सर्जन मर्यादित ठेवावे लागते. या परिस्थितीत, हेवी बॉडी, लॅडर-फ्रेम आणि डिझेल इंजिन असलेली इनोव्हा क्रिस्टा या कठोर नियमांनुसार कंपनीसाठी तोट्याचा सौदा ठरू शकते आणि म्हणूनच कंपनी तिचे उत्पादन बंद करेल, असे म्हटले जात आहे.
टोयोटा हळूहळू डिझेलकडून पेट्रोल आणि हायब्रीड वाहनांकडे वळत आहे. नवीन इनोव्हा हायक्रॉस हा याच धोरणाचा एक भाग आहे. ही कार पेट्रोल इंजिनसह येते आणि सेल्फ-चार्जिंग हायब्रीड सिस्टीमचा पर्यायही देते. हे हायब्रीड तंत्रज्ञान टोयोटाला आगामी कॅफे 3 नियमांनुसार चांगले सुपर क्रेडिट मिळविण्यात मदत करेल. त्याच वेळी, एक हेवी डिझेल MPV असल्याने, इनोव्हा क्रिस्टा हे नियम पाळत नाही. म्हणूनच कंपनी तिचे उत्पादन थांबवण्याचा विचार करत आहे.
2027 पर्यंत विक्री सुरू राहील
उत्तराधिकारी बाजारात आले असले तरी, टोयोटा इनोव्हा क्रिस्टाला अजूनही मोठी मागणी आहे, हे विशेष. 2.4-लिटर टर्बोडिझेल इंजिन आणि 5-स्पीड मॅन्युअल गिअरबॉक्समुळे टोयोटा इनोव्हा क्रिस्टा अजूनही एक लोकप्रिय पर्याय आहे. सध्याच्या वृत्तांनुसार, टोयोटा इनोव्हा क्रिस्टाची विक्री मार्च 2027 पर्यंत सुरू राहील. त्यानंतर ती पूर्णपणे बंद केली जाईल.


