- Home
- Utility News
- मेमू आता घाटात धावणार? इगतपुरी–कसारा थेट जोडणीसाठी रेल्वेची हालचाल; प्रवाशांना मोठा दिलासा
मेमू आता घाटात धावणार? इगतपुरी–कसारा थेट जोडणीसाठी रेल्वेची हालचाल; प्रवाशांना मोठा दिलासा
Bhusawal–Igatpuri MEMU Train : भुसावळ-इगतपुरी मेमू सेवेचा विस्तार थेट कसारापर्यंत करण्याची जोरदार मागणी प्रवाशांकडून होत आहे. हा निर्णय झाल्यास उत्तर महाराष्ट्रातील प्रवाशांना मुंबईसाठी थेट, स्वस्त आणि अनारक्षित रेल्वे पर्याय मिळेल.

मेमू आता घाटात धावणार? इगतपुरी–कसारा थेट जोडणीसाठी रेल्वेची हालचाल
कसारा : उत्तर महाराष्ट्रातील प्रवाशांसाठी महत्त्वाची घडामोड समोर येत आहे. भुसावळ ते इगतपुरीदरम्यान धावणाऱ्या मेमू (MEMU) रेल्वे सेवेचा विस्तार थेट कसारापर्यंत करण्यात यावा, अशी जोरदार मागणी प्रवाशांकडून केली जात आहे. हा निर्णय प्रत्यक्षात आला तर भुसावळ आणि जळगाव जिल्ह्यासह नाशिक परिसरातील प्रवाशांना मुंबईसाठी थेट, स्वस्त आणि अनारक्षित रेल्वे पर्याय उपलब्ध होणार आहे.
मुंबईकडे जाताना आजही अनेक टप्पे
सध्या भुसावळहून मुंबईला प्रवास करताना प्रवाशांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागते. भुसावळ–मुंबई दरम्यान लांब पल्ल्याच्या गाड्या उपलब्ध असल्या, तरी जळगाव जिल्ह्यातील प्रवाशांना अनेकदा त्यामध्ये जागा मिळत नाही. परिणामी प्रवासी भुसावळ–इगतपुरी मेमूने इगतपुरीपर्यंत प्रवास करतात. यानंतर कसारा गाठण्यासाठी दुसरी रेल्वे, बस किंवा खासगी वाहन यांचा आधार घ्यावा लागतो. कसाऱ्याहून पुढे मुंबईकडे लोकल रेल्वेने प्रवास केला जातो.
टप्प्याटप्प्याचा प्रवास ठरतो डोकेदुखी
गाड्या बदलण्याच्या या प्रक्रियेमुळे प्रवाशांचा वेळ वाया जातो, वेळापत्रक बिघडते आणि खर्चातही वाढ होते. मात्र, जर भुसावळहून निघणारी मेमू रेल्वे थेट कसारापर्यंत धावली, तर भुसावळ, जळगाव, पाचोरा, चाळीसगाव, मनमाड तसेच नाशिक जिल्ह्यातील हजारो प्रवाशांना मोठा दिलासा मिळू शकतो.
विद्यार्थी आणि नोकरदारांसाठी फायदेशीर ठरणार सेवा
प्रस्तावित मेमू सेवा विशेषतः विद्यार्थी, रोज अप-डाउन करणारे नोकरदार, छोटे व्यापारी, सामान्य प्रवासी यांच्यासाठी अत्यंत उपयुक्त ठरणार आहे. कसाऱ्याहून मुंबईकडे लोकल रेल्वेची उत्तम व्यवस्था आधीपासूनच उपलब्ध असल्याने, पुढील प्रवास अधिक सुलभ होणार आहे.
उत्तर महाराष्ट्र–मुंबई दळणवळणाला नवी गती
प्रवाशांच्या मते, ही सेवा सुरू झाल्यास उत्तर महाराष्ट्र आणि मुंबई यांमधील दळणवळण अधिक वेगवान आणि सोयीचे होईल. वेळ आणि पैशांची बचत होऊन प्रवास अधिक परवडणारा बनेल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. आता या मागणीवर रेल्वे प्रशासन कोणता निर्णय घेते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

