सलग बँक संप आणि सुट्ट्यांमुळे ग्राहकांची गैरसोय होऊ नये म्हणून आज बँका सुरू राहणार आहेत. संपाच्या काळात एटीएमचा वापर पूर्णपणे मोफत असेल. तसेच, ऑनलाइन व्यवहारांमध्ये कोणताही अडथळा येणार नाही.
नवी दिल्ली : उद्यापासून सलग तीन दिवस बँकांचा संप असल्यामुळे आज देशभरातील बँका सुरू राहणार आहेत. पुढचे तीन दिवस एटीएम वापरण्यासाठी कोणताही अतिरिक्त चार्ज लागणार नाही. तुम्ही कितीही वेळा मोफत एटीएम वापरू शकता. दुसऱ्या बँकेचे एटीएम वापरले तरी पैसे कापले जाणार नाहीत. संपाच्या काळात ऑनलाइन व्यवहार सुरळीत सुरू राहतील. कर्जाचे हप्ते (EMI) वेळेवर ऑनलाइन भरणे आवश्यक आहे. २ ऑक्टोबरला सुट्टी असल्यामुळे या आठवड्यात बँका फक्त दोनच दिवस काम करतील.
बँकांचे कामकाज सलग पाच दिवस ठप्प होऊ नये, यासाठी केंद्र सरकारच्या सूचनेनुसार रविवारी बँका सुरू ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. आज सर्व सार्वजनिक क्षेत्रातील बँका आणि प्रादेशिक ग्रामीण बँका सुरू राहतील. बँकांशी संबंधित इतर सेवाही आज उपलब्ध असतील.
युनायटेड फोरम ऑफ बँक युनियन्सने २८ ते ३० सप्टेंबर दरम्यान संपाची हाक दिली आहे. बँकांना आठवड्यातून पाच दिवस कामाचे असावेत, ही संघटनेची प्रमुख मागणी आहे. याशिवाय पेन्शनमध्ये सुधारणा करणे आणि एनपीएस (NPS) कर्मचाऱ्यांना जुन्या पेन्शन योजनेत जाण्याची संधी देणे, या मागण्याही युनियन्सने केल्या आहेत. यापूर्वी इंडियन बँक्स असोसिएशनने (IBA) या मागण्या मान्य करून सरकारच्या मंजुरीसाठी पाठवल्या होत्या, मात्र त्यावर अद्याप अंतिम निर्णय झालेला नाही.

