मंगळ ग्रह एकेकाळी पृथ्वीप्रमाणे निळा ग्रह होता का? संशोधकांना मंगळावर पृथ्वीच्या आर्क्टिक समुद्राएवढ्या विशाल प्राचीन समुद्राचे पुरावे सापडले आहेत.

बर्न: मंगळावर एकेकाळी पृथ्वीच्या आर्क्टिक समुद्राएवढा मोठा समुद्र अस्तित्वात असावा, असे एका नवीन अभ्यासात म्हटले आहे. स्विस शास्त्रज्ञांनी केलेले हे संशोधन मंगळ ग्रह एकेकाळी पृथ्वीप्रमाणेच एक निळा ग्रह होता, या शक्यतेकडे निर्देश करते. या ताज्या अभ्यासात, संशोधकांनी मंगळावर पृथ्वीच्या आर्क्टिक समुद्राच्या आकाराच्या विशाल समुद्राचे पुरावे ओळखले आहेत. या लाल ग्रहावर एकेकाळी मोठ्या नद्या आणि कदाचित समुद्रही होते, असे पूर्वीच्या निरीक्षणांमध्येही दिसून आले आहे.

मंगळावरील समुद्र, या विश्वासाला अधिक बळकटी

स्वित्झर्लंडमधील बर्न विद्यापीठाचे संशोधक इग्नेशियस अर्गाडेस्ट्या आणि फ्रिट्झ श्लुनेगर यांच्या संशोधन पथकाने मंगळाबद्दल हे नवीन संकेत शोधले आहेत. नासाचे मार्स रेकनिसन्स, युरोपियन स्पेस एजन्सीचे मार्स एक्सप्रेस आणि एक्सोमार्स ट्रेस गॅस ऑर्बिटर यांसारख्या मंगळाभोवती फिरणाऱ्या विविध अंतराळयानांकडून मिळालेल्या डेटाचे विश्लेषण करून संशोधक या निष्कर्षापर्यंत पोहोचले आहेत. एक्सोमार्स ट्रेस गॅस ऑर्बिटरवर 'बर्नीस मार्स' नावाचा एक विशेष कॅमेरा बसवण्यात आला होता, जो उच्च-रिझोल्यूशन रंगीत छायाचित्रे घेऊ शकतो. बर्न विद्यापीठाच्या शास्त्रज्ञांच्या नवीन संशोधनात या कॅमेऱ्यांमधून मिळालेल्या चित्रांनी महत्त्वाची भूमिका बजावली. या अभ्यासाचे नेतृत्व करणारे बर्न विद्यापीठाचे संशोधक इग्नेशियस अर्गाडेस्ट्या यांनी Space.com ला सांगितले की, उपग्रहांकडून मिळालेली माहिती आपल्याला मंगळ ग्रहाचा भूतकाळ समजण्यास मदत करते.

कोप्रेट्स कास्मा मंगळाचा इतिहास बदलणार का? 

मंगळ ग्रहावरील कोप्रेट्स कास्मा (Coprates Chasma) नावाच्या ६२० मैल (१,००० किलोमीटर) लांबीच्या दरीच्या आग्नेय भागातून घेतलेल्या उपग्रह चित्रांवर संशोधकांनी अधिक अभ्यास केला. हा भाग मंगळावरील सर्वात मोठ्या दरी प्रणाली, व्हॅलेस मरिनेरिसचा (Valles Marineris) एक भाग आहे. व्हॅलेस मरिनेरिस या लाल ग्रहाच्या विषुववृत्तावर २,४८५ मैलांपेक्षा (४,००० किलोमीटर) जास्त लांबीमध्ये पसरलेली आहे. कोप्रेट्स कास्मामधील उपग्रह चित्रांमध्ये पंख्याच्या आकाराचे साठे स्पष्टपणे दिसतात. संशोधकांच्या मते, हे साठे नदीच्या डेल्टासारखे दिसतात, जे आपल्या ग्रहावर वाहणारे पाणी एखाद्या स्थिर जलाशयाला मिळते, तेव्हा तयार होतात. हे साठे एका प्राचीन किनारपट्टीचा पुरावा आहेत, असेही बर्न विद्यापीठाच्या संशोधकांनी म्हटले आहे. मंगळाच्या उत्तर गोलार्धात एकेकाळी पृथ्वीच्या आर्क्टिक समुद्राएवढा मोठा समुद्र होता, असा दावाही संशोधक करतात.