आफ्रिका खंड हळूहळू दोन भागांमध्ये विभागला जाईल आणि यामुळे एका नवीन महासागराची निर्मिती होईल, असा इशारा शास्त्रज्ञांनी दिला आहे.
पृथ्वीच्या रचनेत मोठे बदल होणार असल्याचे शास्त्रज्ञांनी म्हटले आहे. आफ्रिका खंड हळूहळू दुभंगेल, असा इशारा शास्त्रज्ञांनी दिला आहे. त्याचबरोबर, एका नवीन महासागराची निर्मिती होण्याची शक्यताही अभ्यासात वर्तवण्यात आली आहे. मॅग्माच्या वर असलेल्या टेक्टोनिक प्लेट्स हळूहळू एकमेकांपासून दूर जात आहेत आणि त्यामुळे आफ्रिका खंड दोन भागांत विभागला जाईल, असा इशारा देण्यात आला आहे. हे संशोधन व्हर्जिनिया युनिव्हर्सिटीच्या शास्त्रज्ञांच्या टीमने केले आहे.
अफार प्रदेशातील पृथ्वीचा पृष्ठभाग आधीच खूप पातळ झाला आहे. काही भाग समुद्रसपाटीच्या खाली आहेत. या भेगेच्या दोन शाखा आधीच लाल समुद्र आणि एडनच्या आखातात बुडाल्या आहेत. या प्रदेशांमधील जमीन आणखी खाली गेल्यावर, समुद्राचे पाणी त्यात भरू लागेल आणि हळूहळू एकमेकांपासून दूर जाणाऱ्या प्लेट्समधील भेगेत एक नवीन महासागर तयार होईल.
भेगेच्या उत्तरेकडील भागात प्लेट्स वेगळे होण्याचा वेग तुलनेने जास्त असल्याचे शास्त्रज्ञांच्या निदर्शनास आले आहे. व्हर्जिनिया टेकमधील भूभौतिकशास्त्रज्ञ डी. सारा स्टॅम्प्स यांच्या मते, ज्या उत्तरेकडील प्रदेशात विस्ताराचा दर सर्वाधिक आहे, तिथेच नवीन महासागर तयार होण्याची प्रक्रिया प्रथम सुरू होण्याची शक्यता आहे.
सरासरी, टेक्टोनिक प्लेट्स दरवर्षी सुमारे 0.28 इंच दराने एकमेकांपासून दूर जात आहेत. तथापि, हा बदल होण्यासाठी, म्हणजेच संपूर्ण महासागर तयार होण्यासाठी लाखो वर्षे लागतील. शास्त्रज्ञांनी असा इशारा दिला आहे की, जरी या प्रक्रियेला लाखो वर्षे लागतील, तरीही हा मंद बदल मानवी जीवनावर वेगाने परिणाम करू शकतो आणि भूकंप व ज्वालामुखीच्या क्रियांची शक्यता वाढवू शकतो.
पृथ्वीच्या कवचामध्ये सुमारे 15 ते 20 टेक्टोनिक प्लेट्स आहेत, ज्या पृथ्वीच्या खाली असलेल्या वितळलेल्या मॅग्मावर तरंगत आहेत. भूगर्भशास्त्रज्ञांचा असा विश्वास आहे की, अफार प्रदेशाखाली 'मँटल प्लूम' आहे, जो पृथ्वीच्या आतून येणाऱ्या गरम पदार्थांचा एक स्तंभ आहे. ही उष्णता वरच्या कवचाला कमकुवत करते आणि त्याला वेगळे करण्यास कारणीभूत ठरते. यामुळे आफ्रिकेची भौगोलिक रचना हळूहळू बदलत आहे, असेही म्हटले जाते.
