- Home
- Utility News
- सावधान! तुमच्या या ५ चुकांमुळे हक्काची जमीन किंवा घर होऊ शकतं जप्त; वेळीच व्हा सावध!
सावधान! तुमच्या या ५ चुकांमुळे हक्काची जमीन किंवा घर होऊ शकतं जप्त; वेळीच व्हा सावध!
Property News : लोकांच्या काही चुकांमुळे त्यांची हक्काची मालमत्ता सरकारजमा होऊ शकते. अतिक्रमण, बनावट कागदपत्रे, कर, कर्ज थकवणे, काळा पैसा वापरणे, कायदेशीर नोटिशीकडे दुर्लक्ष करणे यांसारख्या चुकांमुळे तुमची जमीन, घर जप्त होऊ शकते.

सावधान! तुमच्या या ५ चुकांमुळे हक्काची जमीन किंवा घर होऊ शकतं जप्त
Property News : स्वतःचं घर, शेती किंवा एखादा प्लॉट असणं हे प्रत्येकाचं स्वप्न असतं. रक्ताचं पाणी करून आणि आयुष्यभराची पुंजी लावून आपण ही मालमत्ता उभी करतो. पण तुम्हाला माहीत आहे का? आपल्या काही 'छोट्या' वाटणाऱ्या कायदेशीर चुकांमुळे हीच कष्टाची कमाई एका झटक्यात सरकार जमा होऊ शकते. अनेकदा नियमांची पुरेशी माहिती नसल्यामुळे नागरिक अडचणीत येतात. तुमची मालमत्ता सुरक्षित ठेवण्यासाठी खालील ५ गोष्टींकडे चुकूनही दुर्लक्ष करू नका.
१. 'अतिक्रमण' पडू शकतं महागात!
अनेकांना वाटतं की रिकामी पडलेली सरकारी जमीन, गायरान किंवा वनविभागाची जागा आपल्या ताब्यात घेतली तर कोणाला काय कळणार? पण हा समज अत्यंत चुकीचा आहे. आरक्षित किंवा सरकारी जमिनीवर केलेलं कोणतंही बेकायदेशीर बांधकाम किंवा ताबा कधीही काढला जाऊ शकतो. तक्रार झाल्यास सरकार अशी मालमत्ता जप्त करते आणि त्यावर केलेल्या खर्चाची कोणतीही भरपाई मिळत नाही.
२. कागदपत्रांमधील 'झोल' आणि फसवणूक
स्वस्त मिळतेय म्हणून घाईघाईत जमीन खरेदी करताना आपण कागदपत्रं नीट तपासत नाही. जर जमिनीचा ७/१२, फेरफार किंवा नकाशा बनावट असेल, तर तो व्यवहार शून्य ठरतो. दलालांच्या आमिषाला बळी पडून खोटी कागदपत्रं बनवली असतील, तर चौकशीअंती ती जमीन सरकार आपल्या ताब्यात घेतं. त्यामुळे खरेदीपूर्वी 'टायटल सर्च' रिपोर्ट नक्की तपासा.
३. कर आणि कर्जाचा डोंगर टाळा
मालमत्ता कर (Property Tax), पाणीपट्टी किंवा जमिनीचा महसूल वेळेवर भरणं ही तुमची जबाबदारी आहे. जर तुम्ही वारंवार नोटीस येऊनही थकबाकी भरली नाही, तर सरकारला ती मालमत्ता जप्त करण्याचा अधिकार आहे. तसेच, बँकेचे कर्ज थकल्यास 'सरफेसी' (SARFAESI) कायद्यानुसार बँक तुमची मालमत्ता लिलावात काढू शकते.
४. उत्पन्नाचा स्त्रोत कायदेशीर हवा
मालमत्ता खरेदीसाठी वापरलेला पैसा जर काळा पैसा, भ्रष्टाचार किंवा कोणत्याही गुन्हेगारी कृत्यातून आलेला असेल, तर 'पीएमसीए' (PMLA) कायद्यांतर्गत तपास यंत्रणा (उदा. ED) तुमची मालमत्ता जप्त करू शकतात. बेहिशोबी मालमत्ता सिद्ध झाल्यास ती कायमची सरकार जमा होते.
५. कायदेशीर नोटिशीला हलक्यात घेऊ नका
अनेकदा कोर्टाची किंवा महापालिकेची नोटीस आली की आपण घाबरून ती बाजूला ठेवून देतो. हीच आपली सर्वात मोठी चूक ठरते. नोटिशीला वेळेत उत्तर न दिल्यास किंवा सुनावणीला गैरहजर राहिल्यास न्यायालय एकतर्फी निर्णय देऊ शकतं, ज्यामध्ये तुमची मालमत्ता जप्त करण्याचे आदेश असू शकतात.
मालमत्ता वाचवण्यासाठी या ५ गोष्टी नक्की करा
व्यवहार करण्यापूर्वी वकिलांकडून कागदपत्रांची पडताळणी करा.
सर्व कर (Taxes) आणि बँकेचे हप्ते वेळेवर भरा.
मालमत्तेचे सर्व मूळ दस्तऐवज सुरक्षित ठेवा.
कोणत्याही सरकारी नोटिशीला तज्ज्ञांच्या सल्ल्याने त्वरित उत्तर द्या.
बेकायदेशीर किंवा सरकारी जमिनींच्या व्यवहारांपासून दूर राहा.

