Car Buying Tips : नवीन कार घेताय? फक्त EMI बघू नका, या 5 चुका नक्की टाळा
नवीन कार घेण्याचा विचार करताय? मग फक्त दर महिन्याच्या EMI चा विचार करून निर्णय घेऊ नका. कार घेताना लोक सहसा कोणत्या ५ मोठ्या चुका करतात आणि त्या कशा टाळायच्या?

नवीन कार घेणाऱ्यांसाठी महत्त्वाची माहिती
शोरूममधून आपली स्वप्नातली कार बाहेर काढताना मिळणारा आनंद काही औरच असतो. आजकाल अनेक कार डीलर्स सहज लोन उपलब्ध करून देतात. पण, लोनवर कार घेतल्यानंतर पुढे किती खर्च येऊ शकतो, याचा आधीच विचार करणं खूप गरजेचं आहे. कारण, कार खरेदी केली म्हणजे खर्च संपला असं होत नाही.
डाऊन पेमेंट, दर महिन्याचा EMI, पेट्रोल-डिझेलचा खर्च, इन्शुरन्स आणि सर्व्हिसिंग असे अनेक खर्च मागे लागतात. या सगळ्याचं योग्य प्लॅनिंग करणं आवश्यक आहे. यात थोडी जरी चूक झाली, तरी मेंटेनन्सचा खर्च वाढतो आणि आपण कर्जाच्या ओझ्याखाली दबून जातो. म्हणूनच, नवीन कार घेताना कोणत्या ५ गोष्टी टाळल्या पाहिजेत, ते आपण सविस्तर जाणून घेऊया.

बजेटबाहेरची महागडी कार निवडणे
कार शोरूममध्ये जाईपर्यंत आपल्या डोक्यात एक ठराविक कार असते. पण तिथे गेल्यावर इतर गाड्या बघून मन भुरळतं. अशा वेळी कोणताही विचार न करता निर्णय घेऊ नका. बजेटपेक्षा जास्त पैसे देऊन कार घेतल्यास तुमची सगळी सेव्हिंग संपू शकते. शिवाय, महिन्याचं बजेटही कोलमडतं.
कार घेताना भावनेच्या भरात निर्णय घेऊ नका. आपली गरज काय आहे, हे ओळखूनच कार निवडा. कारचा EMI किती असेल, ती चालवण्याचा खर्च किती येईल, मायलेज किती मिळेल आणि इतर कर्ज फेडून हा EMI भरणं शक्य होईल का, या सगळ्याचा विचार करा. फक्त हौस म्हणून कार घेतली, तर भविष्यात आर्थिक अडचण येऊ शकते.
वेळेवर सर्व्हिसिंग न करणे
कार घेतल्यानंतर पैसे वाचवण्याच्या नादात अनेक जण कंपनीने सांगितलेल्या तारखेला सर्व्हिसिंग करत नाहीत. ही सवय नवीन कारच्या इंजिनसाठी खूप घातक ठरू शकते. इंजिनमध्ये बिघाड झाल्यास मायलेज तर कमी होतंच, पण भविष्यात मोठा खर्चही उद्भवतो. साध्या सर्व्हिसिंगपेक्षा हा दुरुस्तीचा खर्च कित्येक पटींनी जास्त असतो. त्यामुळे, कंपनीने दिलेल्या वेळापत्रकानुसार कारची नियमित सर्व्हिसिंग करणं मस्ट आहे.
इन्शुरन्स रिन्यू न करणे
नवीन कार घेताना इन्शुरन्स मिळतोच. पण पुढच्या वर्षी तो न चुकता रिन्यू करणं गरजेचं असतं. भविष्यात अचानक उद्भवणाऱ्या खर्चाचा विचार करूनच योग्य इन्शुरन्स पॉलिसी निवडली पाहिजे. थोडे पैसे वाचवण्यासाठी इन्शुरन्स कव्हरेज कमी घेणं किंवा तो रिन्यू न करणं, तुम्हाला मोठ्या संकटात टाकू शकतं.
पेट्रोल-डिझेलच्या खर्चाचा विचार न करणे
आपण EMI भरत कार वापरत राहतो. पण कार निवडताना ती पेट्रोल किंवा डिझेलवर किती मायलेज देते, हे पाहणं खूप महत्त्वाचं आहे. काही लक्झरी गाड्या खूप कमी मायलेज देतात. त्यामुळे कार फक्त दिसायला छान आहे म्हणून घेऊ नका, तर भविष्यातील इंधनाच्या खर्चाचाही अंदाज घ्या. जागतिक घडामोडी किंवा युद्धासारख्या परिस्थितीमुळे पेट्रोल-डिझेलचे दर अचानक वाढू शकतात, हे नेहमी लक्षात ठेवा.
छुप्या खर्चांकडे दुर्लक्ष करणे
कार घेतल्यानंतर EMI सोबतच इतर छोट्या-मोठ्या गोष्टींवरही खर्च करावा लागतो. उदाहरणार्थ, बाहेर गेल्यावर पार्किंगचा खर्च, कार वॉशिंग, आवश्यक ॲक्सेसरीज आणि अचानक येणारा दुरुस्तीचा खर्च. या सगळ्या छुप्या खर्चांचा बजेटमध्ये समावेश असायला हवा.
भविष्यातील अडचणी टाळण्यासाठी थोडी रक्कम बाजूला काढून ठेवणं कधीही चांगलं. अनेक जण कार घेण्याच्या उत्साहात या अतिरिक्त खर्चांकडे लक्षच देत नाहीत. फक्त EMI ची रक्कम न बघता, एकूण किती खर्च येईल याचा हिशोब करा. जी कार तुम्हाला सहज मेंटेन करता येईल, तीच तुमच्यासाठी योग्य ठरेल. यामुळे तुमची सेव्हिंगही सुरक्षित राहील आणि लोन फेडताना कोणतीही अडचण येणार नाही.








