भारतीय ऑटोमोबाईल मार्केटमध्ये रेनॉल्ट, किआ आणि ह्युंदाई या कंपन्या लवकरच आपल्या नवीन 7 सीटर हायब्रिड कार्स लाँच करणार आहेत. उत्तम मायलेज आणि जबरदस्त स्पेस असलेल्या या गाड्यांमुळे एसयूव्ही सेगमेंटमध्ये मोठी स्पर्धा पाहायला मिळेल.

मुंबई : भारतीय ऑटोमोबाईल मार्केटमध्ये लवकरच 7 सीटर हायब्रिड कार्सची मोठी रेंज पाहायला मिळणार आहे. रेनॉल्ट, किआ आणि ह्युंदाई यांसारख्या बड्या कंपन्या येत्या काही महिन्यांत आणि वर्षांत आपले नवीन मॉडेल्स बाजारात आणणार आहेत. मोठ्या कुटुंबांसाठी या गाड्या खूप फायदेशीर ठरतील, कारण यात जास्त जागा आणि उत्तम मायलेज मिळेल. सध्या भारतात 7 सीटर हायब्रिड गाड्यांचे खूप कमी पर्याय उपलब्ध आहेत. यात टोयोटा इनोव्हा हायक्रॉस (Toyota Innova Hycross) सारख्या गाड्यांना ग्राहकांची चांगली पसंती मिळत आहे. पण आता नवीन मॉडेल्स आल्यावर ग्राहकांना आणखी चांगले पर्याय मिळतील.

रेनॉल्ट डस्टर 7 सीटर

रेनॉल्टची नवीन 7 सीटर एसयूव्ही 2027 मध्ये बाजारात येण्याची शक्यता आहे. भारतात या गाडीला 'रेनॉल्ट बोरेल' (Renault Boreal) हे नाव दिले जाऊ शकते. डॅशिया बिगस्टरच्या (Dacia Bigster) डिझाईनवर आधारित ही गाडी सध्याच्या 5 सीटर डस्टरपेक्षा जास्त लांब आणि प्रशस्त असेल. आरजीएमपी (RGMP) प्लॅटफॉर्मवर ही गाडी तयार केली जाण्याची शक्यता आहे. यात 1.3 लिटर टर्बो पेट्रोल इंजिन आणि 1.8 लिटर स्ट्रॉंग हायब्रिड पॉवरट्रेन असे दोन पर्याय मिळू शकतात. या नवीन मॉडेलमुळे 7 सीटर एसयूव्ही सेगमेंटमध्ये रेनॉल्टची पकड आणखी मजबूत होईल.

किआ कार्निव्हल हायब्रिड

किआने भारतात आपली कार्निव्हल हायब्रिड लाँच करणार असल्याचे कन्फर्म केले आहे. कंपनीने अजून अधिकृत तारीख सांगितली नसली, तरी पुढच्या वर्षाच्या सुरुवातीला ही गाडी बाजारात येऊ शकते. या गाडीत 1.6 लिटर टर्बो पेट्रोल इंजिन आणि इलेक्ट्रिक मोटर असे हायब्रिड कॉम्बिनेशन मिळेल. यातील पेट्रोल इंजिन 180 bhp पॉवर आणि 265 Nm टॉर्क जनरेट करेल. तर इलेक्ट्रिक मोटर 73.4 bhp पॉवर आणि 304 Nm टॉर्क देईल. या गाडीत 6 स्पीड टॉर्क कन्व्हर्टर ऑटोमॅटिक गिअरबॉक्स मिळण्याची शक्यता आहे. प्रीमियम फीचर्स आणि भरपूर स्पेस असलेली ही गाडी लांबच्या प्रवासासाठी आणि मोठ्या कुटुंबांसाठी एकदम परफेक्ट असेल.

ह्युंदाई Ni1i

ह्युंदाई मोटर इंडिया सध्या एका नवीन प्रीमियम 7 सीटर एसयूव्हीवर काम करत आहे. ही गाडी अल्काझार (Alcazar) आणि टक्सन (Tucson) च्या मध्ये पोझिशन केली जाईल. सध्या या गाडीला Ni1i असा कोडनेम देण्यात आला आहे. बाजारात आल्यावर या गाडीची थेट टक्कर महिंद्रा एक्सयूव्ही 7एक्सओ (Mahindra XUV 7XO) आणि टाटा सफारी (Tata Safari) यांसारख्या गाड्यांशी होईल. चीनमध्ये विकल्या जाणाऱ्या ह्युंदाई टक्सन एलडब्ल्यूबी (Tucson LWB) वर ही गाडी आधारित असू शकते. कंपनीने इंजिनबद्दल अजून कोणतीही माहिती दिलेली नाही. पण यात 1.6 लिटर पेट्रोल हायब्रिड सिस्टीम किंवा इलेक्ट्रिफाईड 1.5 लिटर नॅचरली अस्पिरेटेड पेट्रोल इंजिन मिळण्याची शक्यता आहे.

हायब्रिड गाड्यांची वाढती मागणी

पेट्रोल-डिझेलच्या वाढत्या किमतींमुळे सध्या हायब्रिड गाड्यांना मोठी मागणी आहे. पेट्रोल इंजिन आणि इलेक्ट्रिक मोटर एकत्र काम करत असल्याने या गाड्या खूप चांगले मायलेज देतात. नवीन 7 सीटर मॉडेल्स बाजारात आल्यावर मोठ्या कुटुंबांना हायब्रिड गाड्यांमध्ये अनेक चांगले पर्याय मिळतील. मात्र, या गाड्यांची नेमकी किंमत, व्हेरियंट्स आणि लाँचिंगच्या तारखांसाठी आपल्याला कंपनीच्या अधिकृत घोषणेची वाट पाहावी लागेल.