गोलंदाजाने मला काय म्हटलं हे तुम्हाला माहीत नसेल, तर कृपया त्यावर तुमचं मत देऊ नका. जर कोणी आपली मर्यादा ओलांडत असेल, तर त्याला त्याची जागा दाखवून द्यावीच लागेल.

कोलंबो: श्रीलंकेविरुद्धच्या दुसऱ्या टेस्ट मॅचच्या पहिल्या दिवशी भारताचा ओपनर यशस्वी जैस्वाल आणि श्रीलंकेचा पेसर असिथा फर्नांडो यांच्यात मैदानातच जोरदार राडा झाला. या प्रकरणी आता जैस्वालने आपली बाजू मांडली आहे. 'माझं काहीही चुकलेलं नाही आणि जी कोणी मर्यादा ओलांडेल, त्याला जशास तसं उत्तर द्यावंच लागेल,' असं जैस्वालने स्पष्ट केलं आहे.

या मॅचमध्ये जैस्वाल 45 रन्सवर खेळत असताना फर्नांडोच्या बॉलवर आऊट झाला. विकेट घेतल्यानंतर फर्नांडोने आक्रमकपणे सेलिब्रेशन केलं, ज्यामुळे जैस्वाल चांगलाच चिडला. पॅव्हेलियनमध्ये परत जाण्याऐवजी तो मागे फिरला आणि थेट फर्नांडोला जाऊन भिडला. दोघांमध्ये शाब्दिक चकमक झाली आणि जैस्वालने त्याला डोक्याने टक्कर मारली. यानंतर श्रीलंकेचा कॅप्टन धनंजय डी सिल्वा आणि इतर खेळाडूंनी मध्ये पडून दोघांना वेगळं केलं. या घटनेनंतर, कॉमेंटेटर हर्षा भोगले यांनी जैस्वालला मैदानावरील राग नियंत्रणात ठेवायला शिकायला हवं, असं मत व्यक्त केलं होतं. याच व्हिडिओला उत्तर देताना जैस्वालने आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर एक पोस्ट लिहिली. 'गोलंदाजाने मला काय म्हटलं हे तुम्हाला माहीत नसेल, तर कृपया त्यावर तुमचं मत देऊ नका. जर कोणी मर्यादा ओलांडत असेल, तर त्याला त्याची जागा दाखवून द्यावीच लागेल. हा नवीन भारत आहे, जो जशास तसं आणि सडेतोड उत्तर देईल,' असं जैस्वालने लिहिलं आहे.

Scroll to load tweet…

प्रशिक्षक आणि बोर्डाची भूमिका

या प्रकरणानंतर भारताचे बॅटिंग कोच सितांशू कोटक यांनी जैस्वालची काही प्रमाणात बाजू घेतली. 'गोलंदाजाने नक्कीच काहीतरी म्हटलं असेल आणि हे सगळं खेळाच्या आवेशात घडलं. पण जैस्वालने गोलंदाजाच्या इतक्या जवळ जाऊन प्रतिक्रिया द्यायला नको होती,' असं ते म्हणाले. तर दुसरीकडे, श्रीलंकेचे पेस बॉलिंग कोच रायन वॅन नीकेर्क यांनी मॅच रेफ्री या प्रकरणात लक्ष घालतील आणि शिस्तभंगाची कारवाई होईल, असं स्पष्ट केलं.