Wrestler Babita Phogat Welcome Second Child : प्रसिद्ध कुस्तीपटू आणि भाजप नेत्या बबिता फोगाट आणि तिचा पती विवेक सुहाग यांना कन्यारत्न प्राप्त झालं आहे. हे त्यांचं दुसरं अपत्य आहे. बबिताने सोशल मीडियावर ही गोड बातमी शेअर केली आणि आपल्या मुलीला 'देवी पार्वतीचं रूप' म्हटलं आहे.

नवी दिल्ली : प्रसिद्ध कुस्तीपटू आणि भाजप नेत्या बबिता फोगाटच्या घरी पुन्हा एकदा बाळाचं आगमन झालं आहे. मंगळवारी महाशिवरात्रीच्या शुभ मुहूर्तावर तिने एका गोंडस मुलीला जन्म दिला. बबिताने ही आनंदाची बातमी 'X' (पूर्वीचे ट्विटर) वर शेअर केली. आपल्या मुलीला 'देवी पार्वतीचं रूप' म्हणत, तिच्या येण्याने कुटुंबात आनंदाला उधाण आल्याचं तिने म्हटलं आहे. 'हा आनंद शब्दात सांगता येत नाही, हा एक अनमोल आशीर्वाद आहे,' असं म्हणत बबिताने आपल्या लहान परीसाठी सर्वांचे आशीर्वाद मागितले आहेत.

बबिता फोगाटने 'X' वर लिहिलंय - 

महादेव की कृपा देखिए आज शिवरात्रि के इस पवित्र दिन पर मेरे जीवन में एक नन्ही परी पार्वती स्वरूप बेटी का आगमन हुआ है। ❤️🧿 मेरी बेटी के रूप में मिली यह खुशी मेरे और मेरे परिवार के लिए अनमोल आशीर्वाद है। यह अहसास और खुशियाँ शब्द से परे है। आप सभी का आशीर्वाद चाहिए!🙏🏻 pic.twitter.com/Mv5yFd6Dxf — Babita Phogat (@BabitaPhogat) August 11, 2026

Scroll to load tweet…

बबिता फोगाट आणि विवेक सुहाग दुसऱ्यांदा आई-बाबा

बबिता फोगाट आणि तिचा पती विवेक सुहाग यांचं हे दुसरं अपत्य आहे. या जोडप्याला जानेवारी २०२१ मध्ये पहिला मुलगा झाला होता. बबिता आणि विवेक यांनी २०१९ मध्ये लग्न केलं होतं.

कुस्ती ते राजकारण, कसा होता बबिता फोगटचा प्रवास?

बबिता फोगाट ही कॉमनवेल्थ गेम्समधील सुवर्णपदक विजेती कुस्तीपटू आहे. तिच्या आणि तिच्या कुटुंबाच्या आयुष्यावर आधारित असलेल्या 'दंगल' या बॉलिवूड चित्रपटामुळे ती देशभरात घराघरात पोहोचली. त्यानंतर तिने राजकारणात प्रवेश केला. सध्या ती सार्वजनिक जीवनात सक्रिय आहे.

मुलीच्या जन्मानंतर बबिता आणि विवेक यांच्यावर कुटुंब, मित्र आणि चाहत्यांकडून अभिनंदनाचा आणि आशीर्वादांचा वर्षाव होत आहे.