Women World Cup 2025 : महिला एकदिवसीय विश्वचषकात भारताने दिलेले ३३१ धावांचे लक्ष्य ऑस्ट्रेलियाने यशस्वीपणे पार केले. कर्णधार एलिसा हिलीच्या शतकाच्या जोरावर ऑस्ट्रेलियाने तीन गडी राखून विजय मिळवला. 

Women World Cup 2025 : महिला एकदिवसीय विश्वचषकात ऑस्ट्रेलियाने विक्रमी विजय नोंदवला आहे. विशाखापट्टणम येथे झालेल्या सामन्यात ऑस्ट्रेलियाने भारताचा तीन गडी राखून पराभव केला. भारताने दिलेले ३३१ धावांचे लक्ष्य ऑस्ट्रेलियाने ४९ षटकांत सात गडी गमावून पार केले. कर्णधार एलिसा हिलीने १०७ चेंडूत १४२ धावांची खेळी करून ऑस्ट्रेलियाला विजयाकडे नेले. एलिस पेरी (नाबाद ४७), ॲशले गार्डनर (४६ चेंडूत ४५) आणि फोब लिचफिल्ड (३९ चेंडूत ४०) यांच्या खेळी निर्णायक ठरल्या.

महिला एकदिवसीय क्रिकेटमध्ये कोणत्याही संघाने यशस्वीपणे पाठलाग केलेली ही सर्वोच्च धावसंख्या आहे. गेल्या वर्षी दक्षिण आफ्रिकेविरुद्ध श्रीलंकेने ३०१ धावांचा पाठलाग करून मिळवलेला विजय आता दुसऱ्या स्थानावर आहे. २०१२ मध्ये न्यूझीलंडविरुद्ध ऑस्ट्रेलियाने २८८ धावांचा यशस्वी पाठलाग केला होता. २०२३ मध्ये वानखेडेवर भारताविरुद्ध ऑस्ट्रेलियाने २८२ धावांचे लक्ष्य पार केले होते. यावर्षी चंदीगडमध्ये भारताविरुद्ध ऑस्ट्रेलियाने २८१ धावांचे लक्ष्य गाठले होते, जो या यादीत पाचव्या स्थानावर आहे.

भारताची धावसंख्या

तत्पूर्वी, नाणेफेक गमावून प्रथम फलंदाजी करताना भारताकडून स्मृती मानधना (६६ चेंडूत ८०) आणि प्रतिका रावळ (९६ चेंडूत ७५) यांच्या खेळीमुळे भारताने मोठी धावसंख्या उभारली. भारताचा संपूर्ण संघ ४८.५ षटकांत सर्वबाद झाला. ऑस्ट्रेलियाकडून ॲनाबेल सदरलँडने पाच बळी घेतले, तर सोफी मॉलिनिक्सने तीन बळी मिळवले.

ऑस्ट्रेलियाचा पाठलाग

प्रत्युत्तरादाखल फलंदाजी करताना ऑस्ट्रेलियाला चांगली सुरुवात मिळाली. पहिल्या गड्यासाठी हिली-लिचफिल्ड जोडीने ८५ धावांची भागीदारी केली. १२व्या षटकात भारताने ही भागीदारी तोडली. लिचफिल्डला श्री चरणीने बाद केले. त्यानंतर आलेल्या पेरीने हिलीला चांगली साथ दिली. मात्र, दुखापतीमुळे पेरी रिटायर्ड हर्ट झाली. त्यानंतर आलेले बेथ मुनी (४) आणि ॲनाबेल सदरलँड (०) यांना फारशी चमक दाखवता आली नाही. दरम्यान, हिलीही बाद झाली. हिलीच्या खेळीत तीन षटकार आणि २१ चौकारांचा समावेश होता. हिली बाद झाल्यानंतरही गार्डनर आणि पेरी (नाबाद ४७) यांनी ऑस्ट्रेलियाला विजयापर्यंत पोहोचवले. ताहलिया मॅकग्रा (१२) आणि सोफी मॉलिनिक्स (१८) हे बाद झालेले इतर खेळाडू होते. किम गार्थ (१४) पेरीसोबत नाबाद राहिली.