एकीकडे राहुल द्रविड आणि वीरेंद्र सेहवाग यांच्या मुलांना अंडर-19 टीममध्ये संधी मिळाली आहे, तर दुसरीकडे तुफान फॉर्मात असलेल्या १५ वर्षांच्या वैभव सूर्यवंशीला मात्र बाहेर ठेवण्यात आलंय. यामागे बीसीसीआयचा एक खास नियम आहे.
नवी दिल्ली : सध्या क्रिकेट विश्वात ज्याच्या नावाची जोरदार चर्चा आहे, तो १५ वर्षांचा वैभव सूर्यवंशी ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या होम सीरिजसाठी निवडलेल्या १५ सदस्यीय भारतीय अंडर-19 टीममध्ये का नाही? हा प्रश्न सगळ्यांना पडलाय. विशेष म्हणजे, याच टीममध्ये माजी क्रिकेटर वीरेंद्र सेहवागचा मुलगा आर्यवीर सेहवाग आणि भारतीय क्रिकेटची भिंत म्हणून ओळखल्या जाणाऱ्या राहुल द्रविडचा मुलगा अन्वय द्रविड यांना संधी मिळाली आहे.
वैभवने आंतरराष्ट्रीय स्तरावर चांगली कामगिरी केली, इतकंच नाही तर इंग्लंडविरुद्धच्या टी-20 सामन्यांमधून त्याने सिनिअर टीममध्ये पदार्पणही केलं. तरीही त्याला ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या अंडर-19 वनडे आणि रेड-बॉल (चार दिवसीय) सामन्यांसाठी निवडलं नाही. याचं कारण आहे बीसीसीआयचा एक जुना नियम.
बीसीसीआयने २०१६ मध्ये एक महत्त्वाचा नियम आणला होता. यानुसार, कोणताही खेळाडू वयानुसार पात्र असला तरी, तो एकापेक्षा जास्त अंडर-19 वर्ल्ड कप खेळू शकत नाही. याच नियमामुळे वॉशिंग्टन सुंदरला २०१८ सालचा अंडर-19 वर्ल्ड कप खेळता आला नव्हता. अर्थात, या नियमाच्या आधी सरफराज खान, संदीप शर्मा आणि विजय झोलसारखे खेळाडू एकापेक्षा जास्त वर्ल्ड कप खेळले होते. वैभव सूर्यवंशी याआधीच २०२६ चा अंडर-19 वर्ल्ड कप खेळला आहे, त्यामुळे त्याला आता दुसऱ्यांदा संधी मिळणार नाही. याच कारणामुळे बीसीसीआयच्या अंडर-19 टीमच्या प्लॅनमध्ये वैभव आता नाही. खरं तर, हा १५ वर्षांचा खेळाडू आता त्याही पुढे निघून गेला आहे!
ज्यांची मुदत लवकरच संपणार आहे, त्या ज्युनियर पुरुष निवड समितीने नुकतीच ही टीम जाहीर केली. या दौऱ्यात १८, २१ आणि २३ सप्टेंबरला राजकोटमध्ये तीन ५०-ओव्हरचे सामने होतील. त्यानंतर दोन रेड-बॉल मॅचेस (चार दिवसीय) होतील. पहिली मॅच २७ ते ३० सप्टेंबर दरम्यान राजकोटमध्ये आणि दुसरी ५ ते ८ ऑक्टोबर दरम्यान अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमच्या 'बी' ग्राऊंडवर होईल. ५०-ओव्हरच्या टीमचं नेतृत्व उत्तराखंडचा बॅटर लक्ष्य राय चंदाणी करेल, तर मध्य प्रदेशचा यशवर्धन चौहान उपकर्णधार असेल. रेड-बॉल मॅचेसमध्ये मात्र चौहान कॅप्टन आणि चंदाणी व्हाईस-कॅप्टन असेल.
वनडे टीममध्ये लेग-स्पिन ऑलराऊंडर आर्यवीर सेहवाग आणि विकेटकीपर-बॅटर अन्वय द्रविड यांना जागा मिळाली आहे, पण रेड-बॉल सामन्यांसाठीच्या टीममध्ये दोघांनाही निवडलेलं नाही.


