ख्रिस्तियानो ज्युनियरने याआधी पोर्तुगालच्या अंडर-१५ आणि अंडर-१६ टीमसाठी खेळलं आहे. मे २०२५ मध्ये त्याने आपलं पदार्पण केलं होतं.

नवी दिल्ली : फुटबॉल लेजेंड ख्रिस्तियानो रोनाल्डोचा मुलगा ख्रिस्तियानो ज्युनियर आता पोर्तुगालच्या टीममध्ये दिसणार आहे. त्याची पोर्तुगालच्या अंडर-१७ टीममध्ये निवड झाली आहे.

ज्युनियरने याआधी पोर्तुगालच्या अंडर-१५ आणि अंडर-१६ टीमसाठीही खेळलं आहे. मे २०२५ मध्ये नॅशनल टीममध्ये पदार्पण करणाऱ्या या खेळाडूने या दोन्ही गटांमध्ये आतापर्यंत १३ मॅचेस खेळल्या आहेत. यात त्याने ५ गोलही केलेत. सध्या तो सौदी अरेबियातील 'अल नासर' या क्लबच्या युथ टीमकडून खेळतोय. याच क्लबकडून त्याचे वडील रोनाल्डोही खेळतात.

युरोपियन अंडर-१७ चॅम्पियनशिपच्या क्वालिफायिंग राऊंडमध्ये पोर्तुगालची पहिली मॅच ११ नोव्हेंबरला अँडोराविरुद्ध होणार आहे. त्यानंतर १४ नोव्हेंबरला बल्गेरिया आणि १७ नोव्हेंबरला सर्बियाशी त्यांचा सामना होईल. ग्रुपमध्ये पहिल्या दोन स्थानांवर राहणाऱ्या टीम्सना पुढच्या फेरीत जाता येईल.

रोनाल्डोने मुलाच्या फुटबॉलमधील भविष्याबद्दल याआधीच आपलं मत स्पष्ट केलंय. तो एका मुलाखतीत म्हणाला होता की, चांगला खेळाडू होण्यासाठी फक्त टॅलेंट असून चालत नाही, तर त्यासाठी मेहनत आणि समर्पणाचीही गरज असते. यावेळी रोनाल्डोने मुलाच्या काही सवयींबद्दल नाराजीही व्यक्त केली होती.

"तो एक उत्तम खेळाडू बनेल की नाही, हे आपल्याला येणारा काळच सांगेल. सध्या तरी तो त्या लेव्हलपर्यंत पोहोचलेला नाही," असं रोनाल्डोने मुलाखतीत सांगितलं होतं. "त्याच्याकडे वेग आहे, तो उत्तम ड्रिबलिंगही करतो. पण एवढंच पुरेसं नाही. त्यासाठी खूप मेहनत घ्यावी लागते. मी त्याला फुटबॉलपटू होण्यासाठी कधीच जबरदस्ती करणार नाही. पण त्याने सर्वोत्तम पातळीवर पोहोचावं, अशी माझी नक्कीच इच्छा आहे," असंही रोनाल्डो म्हणाला.