अफगाणिस्तानविरुद्धच्या पहिल्या टी-२० सामन्यात भारतासाठी ओपनिंग कोण करणार, यावरून मोठी चर्चा सुरू आहे. कर्णधार श्रेयस अय्यर आणि मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर यांच्यासमोर अनुभवी संजू सॅमसन, फॉर्मात असलेला अभिषेक शर्मा आणि युवा खेळाडू वैभव सूर्यवंशी यांच्यापैकी एकाची निवड करण्याचं मोठं आव्हान आहे.
मुंबई : अफगाणिस्तानविरुद्धच्या पहिल्या टी-२० सामन्यात भारताकडून ओपनिंग कोण करणार, या प्रश्नावर कर्णधार श्रेयस अय्यरने हे उत्तर दिलं. शर्यतीत आहेत - अभिषेक शर्मा, संजू सॅमसन आणि वैभव सूर्यवंशी. अभिषेक हा २०२४ नंतर भारताचा सर्वात यशस्वी टी-२० फलंदाज आहे. तर संजू सॅमसनच्या दमदार खेळीमुळेच भारताने २०२६ चा टी-२० वर्ल्ड कप जिंकला होता. दुसरीकडे, वैभवच्या रूपात क्रिकेट जग भारतीय क्रिकेटचं भविष्य पाहत आहे.
"हा निर्णय घेणं खरंच खूप अवघड असणार आहे. हे तिन्ही खेळाडू संघात असणं ही एक मोठी गोष्ट आहे. तिघेही सातत्याने चांगली कामगिरी करत आहेत, त्यामुळे निवड करणं कठीण झालं आहे. ज्याला संधी मिळेल, तो संघासाठी नक्कीच फायदेशीर ठरेल. सर्वात महत्त्वाचं म्हणजे, जो खेळाडू बाहेर बसेल, त्याच्याशी व्यवस्थित संवाद साधून त्याचा आत्मविश्वास कायम ठेवणं गरजेचं आहे."
एकीकडे भारताच्या टी-२० वर्चस्वाला कारणीभूत ठरलेले दोन खेळाडू आहेत, तर दुसरीकडे भविष्यात संघाचं नेतृत्व करणारा एक युवा खेळाडू. त्यामुळे कर्णधार श्रेयस अय्यर आणि मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर हा तिढा कसा सोडवणार, हा मोठा प्रश्न आहे.
अभिषेकची गेल्या दोन वर्षांतील कामगिरी आणि संजू वर्ल्ड कपचा हिरो ठरल्याचं विसरता येणार नाही. वैभवबद्दल बोलायचं झालं, तर सचिन तेंडुलकरनंतर कदाचित भारतीय क्रिकेट चाहते इतक्या उत्सुकतेने दुसऱ्या कोणत्याही खेळाडूकडे पाहत नसतील. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील सध्याच्या फॉर्मचा विचार केल्यास, वैभव हा अभिषेक आणि संजूच्या पुढे आहे, यात शंका नाही.
अभिषेकला शेवटच्या पाच सामन्यांपैकी चार सामन्यांमध्ये दुहेरी धावसंख्या गाठता आलेली नाही. टी-२० वर्ल्ड कपपासूनच या डावखुऱ्या फलंदाजाचा फॉर्म हरवला आहे, फक्त फायनलमधील अर्धशतक त्याला दिलासा देणारं ठरलं. मात्र, 'शेर-ए-पंजाब टी-२० लीग'मध्ये अमृतसर सूरमाससाठी खेळताना ५ सामन्यांत २६८ च्या स्ट्राईक रेटने २४२ धावा करत त्याने फॉर्ममध्ये परतण्याचे संकेत दिले आहेत. आता हीच कामगिरी त्याला आंतरराष्ट्रीय स्तरावरही करावी लागेल.
टी-२० वर्ल्ड कपनंतर आयपीएलमध्ये चेन्नई सुपर किंग्ससाठी चांगली कामगिरी केली असली, तरी भारतीय संघात परतल्यानंतर संजूची कामगिरीही निराशाजनक राहिली आहे. त्याच्या शेवटच्या चार आंतरराष्ट्रीय सामन्यांमधील स्कोअर २७, १, ० आणि ५ असा आहे, आणि हे चारही सामने परदेशातील खेळपट्ट्यांवर झाले आहेत. अफगाणिस्तानविरुद्धची मालिका संजूच्या करिअरसाठी अत्यंत महत्त्वाची ठरू शकते. पण त्याला संधी मिळणार का, हीच मोठी चिंता आहे.
इंग्लंड दौऱ्यावर अपयशी ठरला असला तरी, दुलीप ट्रॉफी आणि झिम्बाब्वे दौऱ्यात वैभवने चमकदार कामगिरी केली आहे. झिम्बाब्वेविरुद्ध तीन टी-२० सामन्यांमध्ये १९६ च्या स्ट्राईक रेटने १५१ धावा करत तो 'प्लेअर ऑफ द सिरीज' ठरला होता. याच मालिकेतून संजूला वगळण्यात आलं होतं, तर अभिषेक पूर्णपणे अपयशी ठरला होता.
इथे काही गोष्टी विचारात घेणं गरजेचं आहे, विशेषतः संजूच्या बाबतीत. वर्ल्ड कप जिंकण्यापेक्षा मोठं काहीही नसतं. असं असतानाही निवड समितीने केवळ चार सामन्यांवरून संजूला बाहेर बसवलं. संजूला संघात टिकून राहण्यासाठी एक मोठी संधी मिळायलाच हवी, यात दुमत नाही. भारतीय संघातील सध्याची परिस्थिती पाहता, सातत्यपूर्ण कामगिरी केल्याशिवाय संघात स्थान टिकवणं अवघड आहे, पण ते सातत्य दाखवण्यासाठी संधी मिळणंही तितकंच महत्त्वाचं आहे.
संजूपेक्षा खराब फॉर्ममध्ये असूनही बीसीसीआयने अभिषेकला संघातून वगळलं नाही. याचं कारण म्हणजे त्याची गेल्या दोन वर्षांतील कामगिरी. पण हीच कामगिरी अभिषेकला वर्ल्ड कपसारख्या महत्त्वाच्या स्पर्धेत करता आली नाही. तिथे संजू भारतासाठी 'एक्स-फॅक्टर' ठरला होता, तरीही त्याला वगळण्यात आलं.
अजिंक्य रहाणेने म्हटल्याप्रमाणे, वैभवसमोर अजून खूप वेळ आहे. तो फक्त १५ वर्षांचा आहे आणि त्याच्यावर आतापासूनच जास्त दडपण टाकण्याची गरज नाही. कारण भारताकडे अभिषेक, संजू आणि इशान किशन यांच्या रूपात एक स्थिर टॉप-थ्री आहे. त्यामुळे अफगाणिस्तानविरुद्धच्या मालिकेत संजू आणि अभिषेकला प्राधान्य द्यायला हवं आणि त्यांच्या कामगिरीच्या आधारावर वैभवला संघात आणण्याचा विचार करायला हवा.

