Suryakumar Yadav : भारतीय कर्णधार सूर्यकुमार यादव ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या सामन्यात १५० टी-२० षटकार मारणारा जगातील पाचवा खेळाडू ठरला आहे. ही कामगिरी करणारा तो दुसरा भारतीय आहे.

Suryakumar Yadav : भारतीय कर्णधार सूर्यकुमार यादवने बुधवारी कॅनबेरा येथे ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पहिल्या टी-२० सामन्यात स्फोटक खेळी करत टी-२० आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये १५० षटकार मारणारा पाचवा खेळाडू बनून आणखी एक विक्रम आपल्या नावे केला आहे. भारतीय कर्णधाराने दोन उत्तुंग षटकार मारून १५० टी-२० षटकार पूर्ण केले आणि रोहित शर्मा (२०५), मुहम्मद वसीम (१८७), मार्टिन गप्टिल (१७३) आणि जोस बटलर (१७२) यांच्या विशेष क्लबमध्ये सामील झाला. या अनुभवी फलंदाजाने आपल्या ९१व्या टी-२० सामन्यात ही कामगिरी केली.

मनुका ओव्हल येथे पावसामुळे बाधित झालेल्या सामन्यात, टी-२० चा धूर्त फलंदाज असलेल्या सूर्यकुमारने आपल्या षटकार मारण्याच्या क्षमतेचे प्रदर्शन केले. चौथ्या षटकाच्या शेवटच्या चेंडूवर टी-२० चा नंबर वन फलंदाज अभिषेक शर्मा, नॅथन एलिसच्या गोलंदाजीवर टिम डेव्हिडकडे झेल देऊन बाद झाल्यानंतर तो क्रीजवर आला.

सुरुवातीला त्याला ऑस्ट्रेलियाचा वेगवान गोलंदाज जोश हेझलवूडने जरा डिस्टर्ब केले, पाचव्या षटकात त्याच्या बॅटची बाहेरील कडा लागली आणि तो यष्टीरक्षकाकडे झेलबाद होता होता वाचला. प्रत्युत्तरात, सूर्यकुमारने चेंडू फ्लिक करून सीमारेषेच्या पलीकडे पाठवला आणि रात्रीचा पहिला षटकार ठोकला.

षटक संपल्यानंतर, पावसामुळे भारतीय कर्णधाराच्या फटकेबाजीला ब्रेक लागला. खेळ पुन्हा सुरू झाल्यावर, सूर्यकुमारने एलिसवर हल्ला करण्यापूर्वी थोडा वेळ घेतला. १० व्या षटकात, सूर्यकुमारने चौकारांची बरसात केली, सलग दोन चौकार मारल्यानंतर, त्याने स्लोअर चेंडू स्टँड्समध्ये पाठवून दुसरा षटकार मारला.

पावसाने पुन्हा एकदा व्यत्यय आणला, ज्यामुळे सामना रद्द करावा लागला. सूर्यकुमार आणि त्याच्या संघाने खूप अपेक्षा निर्माण केल्या होत्या, पण अखेरीस हवामानानेच निर्णय दिला. अभिषेक १९(१४) धावांवर लवकर बाद होऊनही भारताने दमदार सुरुवात केली होती. सूर्यकुमारने उपकर्णधार शुभमन गिलसोबत केवळ ३५ चेंडूंमध्ये ६२ धावांची नाबाद भागीदारी केली.

कॅनबेरामध्ये सततच्या पावसामुळे पंचांनी मालिकेतील सलामीचा सामना रद्द करण्याचा निर्णय घेण्यापूर्वी भारत ९.४ षटकांत ९७/१ अशा मजबूत स्थितीत होता. सूर्यकुमार आणि गिल अनुक्रमे ३९(२४) आणि ३७(२०) धावांवर नाबाद परतले.