T20 वर्ल्डकप दरम्यान संजू सॅमसनला संघातून वगळण्याचा निर्णय आपल्यासाठी सर्वात कठीण होता, असं सूर्यकुमार यादवने उघड केलं आहे. तसेच, अभिषेक शर्मा आपल्याला वर्ल्डकप जिंकून देईल हा विश्वास कसा होता, हेही त्याने सांगितलं.

भारताला T20 वर्ल्डकप जिंकून देणारा कॅप्टन सूर्यकुमार यादवने स्पर्धेदरम्यानचे काही पडद्यामागचे किस्से सांगितले आहेत. स्पर्धेच्या सुरुवातीला खराब फॉर्ममुळे संजू सॅमसनला संघाबाहेर बसावं लागलं होतं, तेव्हा त्याच्याशी काय बोलणं झालं आणि सलामीवीर अभिषेक शर्मावर त्याचा इतका विश्वास का होता, याबद्दल सूर्याने आकाश चोप्राच्या यूट्यूब चॅनलवर मनमोकळ्या गप्पा मारल्या.

'सर्वात कठीण निर्णय': संजूला वगळण्यावर सूर्या म्हणाला

संजू सॅमसनबद्दल बोलताना सूर्यकुमार म्हणाला, "न्यूझीलंडविरुद्धच्या मालिकेत ५ डावात फक्त ४६ धावा केल्यामुळे त्याला संघातून वगळावं लागलं होतं. त्याची जागा ईशान किशनने घेतली होती. हा निर्णय घेणं खूप कठीण होतं. मी त्याला बसमध्ये सांगितलं की, सध्या जसं चाललंय ते पाहता तुला संघात ठेवणं अवघड आहे. त्यावर तो फक्त एकच गोष्ट म्हणाला, 'वर्ल्डकप जिंकण्यासाठी तुम्हाला जे योग्य वाटेल ते करा.' तो पुढे म्हणाला की, 'जेव्हाही माझी गरज लागेल, तेव्हा मी तयार असेन. मी खेळणार आहे, असंच समजून सराव करत राहीन'."

"त्याचं हे बोलणं ऐकून माझा आत्मविश्वास खूप वाढला. आयुष्यात असेही लोक असतात, हे तेव्हा कळलं," असं सूर्याने सांगितलं. संजूला वगळण्याचा निर्णय हा त्याच्यासाठी 'सर्वात कठीण निर्णय' होता. सूर्याने आठवण करून दिली की, २०२४ मध्ये श्रीलंकेत संजूने धावा केल्या नव्हत्या, तरीही त्याला संघात कायम ठेवलं होतं. त्याच वर्षी संजूने ५ डावांमध्ये ३ शतकं झळकावली होती. पण पुढच्या वर्षी १५ डावांमध्ये तो फक्त २२२ धावा करू शकला, ज्यामुळे सलामीवीर म्हणून त्याच्या जागेवर प्रश्नचिन्ह निर्माण झालं होतं.

सूर्याने जुनी आठवण सांगताना म्हटलं, "तो माझ्यासाठी सर्वात कठीण निर्णय होता, कारण तो एक चांगला माणूस आहे हे मला माहीत होतं. २०२४ मध्ये आम्ही श्रीलंका दौऱ्यावर गेलो होतो, तेव्हा त्याने जास्त धावा केल्या नव्हत्या. त्याने मला विचारलं की मी काय करू? मी त्याला म्हणालो की माझा तुझ्यावर विश्वास आहे आणि प्रशिक्षकांचाही आहे. मी त्याला आश्वासन दिलं की तो पुढचे सात सामने खेळेल आणि जरी तो सात वेळा शून्यावर बाद झाला तरी आठवा सामना खेळेल."

पण वर्ल्डकपमध्ये दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या पराभवानंतर झिम्बाब्वेविरुद्धच्या 'करो या मरो' सामन्यात संजूने २४ धावांची छोटी पण महत्त्वाची खेळी करून पुनरागमन केलं. त्यानंतर त्याने वेस्ट इंडिजविरुद्धच्या व्हर्च्युअल क्वार्टर फायनलपासून ते न्यूझीलंडविरुद्धच्या फायनलपर्यंत धुमाकूळ घातला. त्याने अनुक्रमे ९७*, ८९ (इंग्लंडविरुद्ध सेमीफायनल) आणि ८९ (फायनल) धावा केल्या. स्पर्धेत ३२१ धावा करून तो भारताचा टॉप रन-गेटर ठरला आणि 'प्लेअर ऑफ द टूर्नामेंट'चा किताबही पटकावला.

'हाच मला वर्ल्डकप जिंकून देणार': अभिषेक शर्माबद्दल सूर्या

अभिषेक शर्माबद्दल बोलताना सूर्या म्हणाला की, २०२४ मध्ये जेव्हा तो T20I कॅप्टन झाला, तेव्हा अभिषेकच्या फलंदाजीने तो पूर्णपणे प्रभावित झाला होता. "जेव्हा मी २०२४ मध्ये कॅप्टन झालो, तेव्हा त्याला पहिल्यांदा पाहिल्यावरच मला समजलं की हाच तो खेळाडू आहे जो मला वर्ल्डकप जिंकून देईल. तो पॉवरप्लेमध्येच अर्धा सामना संपवून टाकायचा. मला असाच खेळाडू हवा होता," असं सूर्या म्हणाला.

पण वर्ल्डकपमध्ये अभिषेकचा फॉर्म हरवला होता. झिम्बाब्वेविरुद्ध एक अर्धशतक वगळता, तो तीन वेळा शून्यावर बाद झाला आणि बाकी सामन्यातही २० च्या आतच बाद झाला. पण फायनलमध्ये अभिषेकने कर्णधाराचा विश्वास सार्थ ठरवला. त्याने २१ चेंडूत ५२ धावांची तुफानी खेळी केली. या स्पर्धेत त्याने एकूण १४१ धावा केल्या. सूर्याने अभिषेकच्या खराब काळात त्याला पूर्ण पाठिंबा दिला आणि त्याचा नैसर्गिक खेळ खेळण्यास प्रोत्साहन दिलं.

"मी त्याला सांगितलं होतं की काहीही झालं तरी वर्ल्डकपपर्यंत तू तुझ्याच शैलीत खेळ, कारण हीच तुझी ओळख आहे. फायनलच्या आधी तो म्हणाला, 'पाजी, मैं आपके लिए करूँगा (मी तुमच्यासाठी करून दाखवेन).' मी त्याला म्हणालो की, तुझ्यावर कोणतंही दडपण नाहीये, फक्त तुझा खेळ दाखव. पहिल्याच चेंडूवर षटकार मारताना बाद झालास तरी काही हरकत नाही," असं सूर्याने सांगितलं.

तो ठरला टर्निंग पॉईंट

सुपर-८ मध्ये दक्षिण आफ्रिकेकडून झालेला ७६ धावांनी पराभव हा संघासाठी टर्निंग पॉईंट होता, असं सूर्याने सांगितलं. तो गंमतीने म्हणाला, "अहमदाबादमधील त्या मॅचनंतर 'सबका स्क्रू अचानक से टाईट हो गया'. सगळ्यांना कळून चुकलं की आता काहीतरी विशेष करावं लागेल. एखादी गोष्ट 'होऊन जाईल' आणि 'ती घडवून आणावी लागेल' यात खूप बारीक फरक असतो. तेव्हा सगळे मिळून जोर लावतात," असं म्हcrणत त्याने विषय संपवला. (ANI)