SportsPro 2026 च्या सर्वात जास्त ब्रँड व्हॅल्यू असलेल्या खेळाडूंच्या यादीत शुभमन गिल १३ व्या क्रमांकावर पोहोचला आहे. त्याने ख्रिस्तियानो रोनाल्डोला मागे टाकले आहे. विराट कोहली ८५ व्या, रोहित शर्मा ९० व्या आणि एमएस धोनी ८३ व्या स्थानावर फेकला गेला आहे.
मुंबई : भारतीय क्रिकेटचा युवा स्टार शुभमन गिल याने जागतिक पातळीवर एक मोठी कामगिरी करून दाखवली आहे. क्रीडा जगतातील खेळाडूंचे ब्रँड व्हॅल्यू आणि मार्केटमधील मागणी ठरवणाऱ्या SportsPro 2026 च्या नव्या यादीत शुभमन गिलने थेट १३ वा क्रमांक पटकावला आहे.
शुभमन गिल्लने ख्रिस्तियानो रोनाल्डोला टाकले मागे! कोहली, रोहित टॉप ५० मधूनही बाहेर!
विशेष म्हणजे फुटबॉल विश्वातील दिग्गज खेळाडू ख्रिस्तियानो रोनाल्डो १४ व्या क्रमांकावर फेकला गेला असून तो गिल्लच्या मागे आहे. तर लिओनेल मेस्सी या यादीत २७ व्या स्थानावर आहे.
टॉप १५ मध्ये एकमेव युवा भारतीय क्रिकेटपटू!
या संपूर्ण यादीत शुभमन गिल हा सर्वात वरच्या स्थानावर असणारा भारतीय क्रिकेटपटू ठरला आहे. गिल्लचे हे यश भारतीय क्रिकेटच्या नव्या पिढीची आंतरराष्ट्रीय मार्केटमधील ताकद दाखवून देते. ही रँकिंग खेळाडूच्या मैदानावरील कामगिरीवर ठरत नाही. तर खेळाडूची ब्रँड व्हॅल्यू, त्याची लोका मधील लोकप्रियता आणि भविष्यात त्याच्याकडून मिळणारा व्यावसायिक फायदा या गोष्टी लक्षात घेऊन हे मानांकन दिले जाते.
विराट कोहली, रोहित शर्मा आणि धोनी कोणत्या नंबरवर आहेत?
एक काळ असा होता की या यादीत विराट कोहली आणि रोहित शर्मा नेहमी आघाडीवर असायचे. पण यावेळी दोघेही पहिल्या ५० खेळाडूंमध्ये स्थान मिळवू शकलेले नाहीत. विराट कोहली या यादीत ८५ व्या तर रोहित शर्मा ९० व्या क्रमांकावर गेला आहे. माजी कर्णधार एमएस धोनी ८३ व्या स्थानावर आहे. गेल्या वर्षीच्या यादीत कोहली आणि रोहित दोघेही पहिल्या ५० मध्ये होते.
मात्र या वर्षी भारताच्या ५ क्रिकेटपटूंनी टॉप ५० मध्ये आपली जागा बनवली आहे. यामध्ये शुभमन गिल १३ व्या, जेमिमा रॉड्रिग्स ३१ व्या, रिषभ पंत ३६ व्या, स्मृती मानधना ३७ व्या आणि जसप्रीत बुमराह ३९ व्या क्रमांकावर आहे.
ही रँकिंग नक्की कशी ठरवली जाते?
SportsPro ही संस्था तीन प्रमुख गोष्टींच्या आधारे ही रँकिंग जाहीर करते. ब्रँडची विश्वासार्हता आणि लोकप्रियेतेला ४५ गुण, ब्रँडच्या वाढीचा वेग याला ४० गुण आणि भविष्यातील व्यावसायिक संधींना १५ गुण दिले जातात.
या वर्षी बेलारुसची टेनिस स्टार अरीना सबालेन्का या यादीत पहिल्या क्रमांकावर आहे. शुभमन गिल १३ व्या नंबरवर पोहोचणे ही भारतीय क्रिकेटसाठी नक्कीच अभिमानाची गोष्ट आहे. पण कोहली आणि रोहितची रँकिंग घसरली म्हणजे त्यांची लोकप्रियता किंवा मैदानावरील खेळ कमी झाला असा याचा अर्थ अजिबात होत नाही. ही रँकिंग पूर्णपणे खेळाडूंच्या ब्रँड व्हॅल्यूवर आधारित असते.






