दुखापतग्रस्त वॉशिंग्टन सुंदरच्या जागी टीममध्ये आलेल्या सारांश जैनला दुसऱ्या टेस्टमध्ये संधी मिळण्याची शक्यता आहे. देशांतर्गत क्रिकेटमधल्या दमदार कामगिरीमुळे या ३३ वर्षीय खेळाडूसाठी टीम इंडियाचे दरवाजे उघडले आहेत.
कोलंबो : श्रीलंकेविरुद्धची पहिली टेस्ट जिंकून टीम इंडियाने मालिकेत आघाडी घेतली आहे. पण तरीही कोलंबोमध्ये होणाऱ्या दुसऱ्या टेस्टसाठी प्लेईंग इलेव्हनमध्ये बदल होण्याची दाट शक्यता आहे. पहिल्या टेस्टमध्ये फिका पडलेला स्पिनर कुलदीप यादवला बाहेर बसवून त्याच्या जागी मध्यप्रदेशचा ३३ वर्षीय ऑफ स्पिन ऑलराऊंडर सारांश जैनला संधी मिळू शकते. रिपोर्ट्सनुसार, सारांश या मॅचमधून आपलं आंतरराष्ट्रीय पदार्पण करू शकतो.
सारांशला संधी देण्याचा विचार
पहिल्या टेस्टमध्ये कुलदीपने २५ ओव्हर्स टाकल्या, पण १०३ रन्स देऊन त्याला फक्त एकच विकेट मिळाली. दुसरीकडे, आपला दुसराच टेस्ट सामना खेळणाऱ्या मानव सुतारने तब्बल १० विकेट्स घेत भारताच्या विजयात मोठा वाटा उचलला. रवींद्र जडेजानेही चार विकेट्स घेतल्या होत्या. पहिल्या टेस्टमध्ये टीम इंडिया तीन लेफ्ट-आर्म स्पिनर्स घेऊन उतरली होती. आता कुलदीपच्या खराब कामगिरीमुळे एका ऑफ स्पिनरला, म्हणजेच सारांशला संधी देण्याचा विचार टीम मॅनेजमेंट करत आहे.
वॉशिंग्टन सुंदरच्या जागी सारांशची निवड, यातूनच आंतरराष्ट्रीय पदार्पण होऊ शकतं
सारांश जैनची टीम इंडियात निवड दुखापतग्रस्त वॉशिंग्टन सुंदरच्या जागी झाली आहे. देशांतर्गत क्रिकेटमधील त्याच्या सातत्यपूर्ण कामगिरीमुळे त्याला ही संधी मिळाली. २०१४ मध्ये पदार्पण करणाऱ्या सारांशने आतापर्यंत ५४ फर्स्ट क्लास मॅचेस खेळल्या आहेत. यात त्याने २७.३० च्या सरासरीने १८८ विकेट्स घेतल्या आहेत. इतकंच नाही, तर बॅटिंगमध्येही त्याने दोन शतकं आणि १४ अर्धशतकांसह २,२२३ रन्स केल्या आहेत. नुकत्याच झालेल्या २०२५-२६ रणजी ट्रॉफी सिझनमध्ये त्याने मध्यप्रदेशसाठी ३० विकेट्स घेत जबरदस्त कामगिरी केली होती.


