Sanjog Gupta ICC CEO : स्टार इंडिया आणि स्पोर्ट्स ब्रॉडकास्टिंग क्षेत्रातील दिग्गज संजोग गुप्ता यांची आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेच्या (ICC) मुख्य कार्यकारी अधिकारी (CEO) पदावर नियुक्ती झाली आहे.
Sanjog Gupta ICC CEO : भारतीय क्रिकेटच्या आंतरराष्ट्रीय प्रभावात आणखी एक मानाचा तुरा रोवला गेला आहे. स्टार इंडिया आणि स्पोर्ट्स ब्रॉडकास्टिंग क्षेत्रात दीर्घ अनुभव असलेले संजोग गुप्ता यांची आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेच्या (ICC) मुख्य कार्यकारी अधिकारी (CEO) पदावर नियुक्ती करण्यात आली आहे. ७ जुलै २०२५ पासून त्यांनी अधिकृतपणे ही जबाबदारी स्वीकारली.
संजोग गुप्ता यांनी ऑस्ट्रेलियाचे ज्योफ अॅलार्डिस यांची जागा घेतली आहे, जे २०२१ पासून CEO पदावर कार्यरत होते. विशेष म्हणजे संजोग गुप्ता हे ICCचे सातवे CEO ठरले असून, मनु साहनी यांच्या नंतर या पदावर नियुक्त होणारे फक्त दुसरे भारतीय आहेत.
संजोग गुप्ता यांचा प्रेरणादायी प्रवास, पत्रकार ते ICC CEO
संजोग गुप्ता यांचा कारकीर्दीचा प्रवास हा तरुणांसाठी प्रेरणादायी ठरावा असा आहे. त्यांनी आपल्या व्यावसायिक जीवनाची सुरुवात पत्रकारितेतून केली आणि २०१० मध्ये स्टार इंडिया मध्ये सामील झाले. त्यानंतर डिस्ने-स्टारचे क्रीडा प्रमुख म्हणून त्यांनी भारतीय क्रीडा क्षेत्रात मोठा बदल घडवून आणला. IPL, ISL, PKL आणि ICC स्पर्धा यांसारख्या विविध स्पर्धांमध्ये प्रेक्षकसंख्या आणि लोकप्रियता वाढवण्यामध्ये संजोग गुप्ता यांनी मोलाचा वाटा उचलला. जिओ सिनेमा (JioCinema) अंतर्गत त्यांनी थेट प्रसारणात नव्या तंत्रज्ञानाचा वापर करून खेळ पाहण्याचा अनुभवच बदलून टाकला.
ICC अध्यक्ष जय शाह यांची प्रतिक्रिया
ICC चे अध्यक्ष जय शाह यांनी संजोग गुप्ता यांचे स्वागत करताना म्हटले की, “संजोग यांना क्रीडा नियोजन आणि व्यापारीकरणाचा सखोल अनुभव आहे. क्रिकेटबद्दलची त्यांची नाळ आणि तंत्रज्ञानाशी असलेली ओळख ही खेळाच्या जागतिक विस्ताराला निश्चितच चालना देईल. आम्ही अनेक उमेदवारांचा विचार केला, पण नामांकन समितीने एकमताने संजोग यांची निवड केली. ICC संचालक मंडळ त्यांच्यासोबत काम करण्यासाठी उत्सुक आहे.”
ICC चे आतापर्यंतचे CEO जाणून घेऊयात
नाव देश कार्यकाळ
डेव्हिड रिचर्ड्स ऑस्ट्रेलिया 1993 – 2001
मॅल्कम स्पीड ऑस्ट्रेलिया 2001 – 2008
हारून लॉर्गट दक्षिण आफ्रिका 2008 – 2012
डेव्हिड रिचर्डसन दक्षिण आफ्रिका 2012 – 2019
मनु साहनी भारत 2019 – 2021
ज्योफ अॅलार्डिस ऑस्ट्रेलिया 2021 – 2025
संजोग गुप्ता भारत 2025 – सुरू
भारतीय नेतृत्वाची जागतिक क्रिकेटवर ठसठशीत छाप
जय शाह यांचं ICC चेअरमन पदावर असणं आणि आता संजोग गुप्ता यांची CEO म्हणून नियुक्ती हे दाखवून देतं की, भारतीय क्रिकेट आता केवळ खेळातच नव्हे तर प्रशासनातही आघाडीवर आहे. ICCसारख्या जागतिक संस्थेच्या नेतृत्वात भारतीयांची उपस्थिती ही भारताच्या वाढत्या क्रीडा सामर्थ्याची साक्ष आहे.


