New Zealand Knocks Out Sri Lanka in T20 World Cup : T20 वर्ल्ड कपच्या सुपर-8 सामन्यात न्यूझीलंडने यजमान श्रीलंकेला ६१ रन्सनी हरवलं आहे. या पराभवासह श्रीलंकेचं स्पर्धेतील आव्हान संपुष्टात आलं आहे. जाणून घ्या मॅचचा संपूर्ण निकाल आणि महत्त्वाचे क्षण.
New Zealand Knocks Out Sri Lanka in T20 World Cup : आयसीसी T20 वर्ल्ड कपचा यजमान असलेला श्रीलंका संघ स्पर्धेतून बाहेर झाला आहे. बुधवारी, २५ फेब्रुवारी रोजी झालेल्या सुपर-8 च्या महत्त्वाच्या सामन्यात न्यूझीलंडने श्रीलंकेला ६१ रन्सच्या मोठ्या फरकाने हरवलं. कोलंबोच्या प्रेमदासा स्टेडियमवर झालेल्या या मॅचमध्ये श्रीलंकेने टॉस जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. न्यूझीलंडने २० ओव्हर्समध्ये ७ विकेट्स गमावून १६८ रन्स केले, पण यजमान संघाला हे लक्ष्य गाठता आलं नाही.
मिचेल सँटनर आणि मॅकॉन्कीची रेकॉर्ड पार्टनरशिप
टॉस हरल्यानंतर बॅटिंगसाठी उतरलेल्या न्यूझीलंडची अवस्था एकवेळेस ८४ रन्सवर ६ विकेट्स अशी झाली होती. संघ मोठ्या अडचणीत सापडला होता, पण कॅप्टन मिचेल सँटनर (४७ रन्स) आणि कोल मॅकॉन्की (३१* रन्स) यांनी ४७ बॉल्समध्ये ८४ रन्सची जबरदस्त पार्टनरशिप केली. ही T20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये न्यूझीलंडकडून सातव्या विकेटसाठीची सर्वात मोठी भागीदारी ठरली. या दोघांशिवाय रचिन रवींद्रनेही ३२ रन्सचं योगदान दिलं.
१६९ रन्सचं आव्हान, श्रीलंकेची खराब सुरुवात
१६९ रन्सच्या टार्गेटचा पाठलाग करताना श्रीलंकेची सुरुवात खूपच खराब झाली. टीमने पहिल्याच बॉलवर मागच्या मॅचचा शतकवीर पथुम निसंका (०) याची विकेट गमावली. त्याला मॅट हेन्रीने बोल्ड केलं. तिसऱ्या ओव्हरच्या पहिल्याच बॉलवर मॅट हेन्रीने चरिथ असलंकाला (५ रन्स) कॅच आऊट करून यजमान संघाला बॅकफूटवर ढकललं.
रचिन रवींद्रची भेदक गोलंदाजी
मधल्या ओव्हर्समध्ये रचिन रवींद्रने श्रीलंकेच्या पुनरागमनाच्या आशा जवळपास संपवून टाकल्या. त्याने दुशन हेमंता (३ रन्स), दसुन शनाका (३ रन्स), कुशल मेंडिस (०) आणि पवन रत्ननायके (१० रन्स) यांच्या विकेट्स घेतल्या. श्रीलंकेकडून कमिंदु मेंडिसने सर्वाधिक ३१ रन्स केले, पण बाकीचे बॅट्समन काही विशेष कामगिरी करू शकले नाहीत. संपूर्ण संघ २० ओव्हर्समध्ये ८ विकेट्सवर १०७ रन्सच करू शकला. रचिन रवींद्रला ३२ रन्स आणि ४ विकेट्स घेतल्याबद्दल 'प्लेअर ऑफ द मॅच' म्हणून गौरवण्यात आलं.
श्रीलंका सेमीफायनलच्या शर्यतीतून बाहेर
या विजयासह न्यूझीलंडने सेमीफायनलमध्ये पोहोचण्याच्या आपल्या आशा जिवंत ठेवल्या आहेत. संघ ३ पॉईंट्ससह सुपर-8 स्टेजमध्ये ग्रुप-२ च्या पॉईंट्स टेबलमध्ये दुसऱ्या क्रमांकावर आहे. दुसरीकडे, श्रीलंका सेमीफायनलच्या शर्यतीतून बाहेर पडला आहे. संघाने सुपर-8 राऊंडमधील आपले सुरुवातीचे दोन्ही सामने गमावले आहेत. आता पाकिस्तानविरुद्ध जिंकूनही त्यांना फक्त २ पॉईंट्स मिळतील, जे टॉप-४ मध्ये जाण्यासाठी पुरेसे नाहीत.


