T20 World Cup Super 8 : टी-२० वर्ल्ड कप २०२६ च्या सुपर-८ मॅचमध्ये वेस्ट इंडिजने झिम्बाब्वेचा १०७ रन्सनी धुव्वा उडवला. सोमवारी झालेल्या या मॅचचा निकाल, महत्त्वाचे क्षण आणि हायलाइट्सबद्दल इथे सविस्तर जाणून घ्या.

T20 World Cup Super 8 : वेस्ट इंडिजने टी-२० वर्ल्ड कपच्या चौथ्या सुपर-८ मॅचमध्ये झिम्बाब्वेला तब्बल १०७ रन्सच्या मोठ्या फरकाने हरवून धमाकेदार विजय मिळवला आहे. सोमवारी वानखेडे स्टेडियमवर ही मॅच झाली, जिथे झिम्बाब्वेने टॉस जिंकून पहिल्यांदा बॉलिंग करण्याचा निर्णय घेतला. पण वेस्ट इंडिजने २० ओव्हर्समध्ये ६ विकेट्स गमावून २५४ रन्सचा डोंगर उभा केला. शिमरॉन हेटमायरने फक्त ३४ बॉल्समध्ये ८५ रन्सची तुफानी खेळी केली, ज्यात ७ फोर आणि ७ सिक्स होते. रोव्हमन पॉवेलनेही ३५ बॉल्समध्ये ५९ रन्स काढले. या बॅटिंगने मॅचचं चित्रच पालटून टाकलं.

वेस्ट इंडिजच्या या ३ बॅट्समननी झिम्बाब्वेला धुतलं

शिमरॉन हेटमायर- ८५ रन्स (३४ बॉल्स)

रोव्हमन पॉवेल- ५९ रन्स (३५ बॉल्स)

शरफेन रदरफोर्ड- ३१ रन्स (१३ बॉल्स), नॉट आऊट

झिम्बाब्वेचा प्रयत्न फसला

२५५ रन्सचं टार्गेट चेस करायला उतरलेली झिम्बाब्वेची टीम १४७ रन्सवर ऑलआऊट झाली. डायोन मायर्सने २८ आणि कॅप्टन सिकंदर रझाने २७ रन्स केले. पण बाकीचे बॅट्समन पटापट आऊट झाले आणि टीमच्या विजयाच्या आशा तिथेच संपल्या.

वेस्ट इंडिजच्या बॉलर्सची कमाल

वेस्ट इंडिजने फक्त बॅटिंगमध्येच नाही, तर बॉलिंगमध्येही झिम्बाब्वेला पाणी पाजलं. गुडकेश मोतीने ४ विकेट्स घेतल्या, तर अकिल हुसैनने ३ विकेट्स काढल्या. रिचर्ड नगारवानेही २ विकेट्स घेतल्या. या भेदक बॉलिंगमुळे झिम्बाब्वेची टीम १४७ रन्सवरच रोखली गेली.

वेस्ट इंडिज vs झिम्बाब्वे: प्लेअर ऑफ द मॅच

या मॅचमध्ये आपल्या धमाकेदार बॅटिंगने झिम्बाब्वेच्या बॉलिंगची दाणादाण उडवणाऱ्या वेस्ट इंडिजच्या स्फोटक बॅट्समन शिमरॉन हेटमायरला 'प्लेअर ऑफ द मॅच' म्हणून निवडण्यात आलं. या मोठ्या विजयामुळे सुपर-८ च्या ग्रुप ए मध्ये आता बाकी टीम्ससाठी आव्हान वाढलं आहे. विशेषतः भारतीय टीमचं टेन्शन वेस्ट इंडिजच्या या विजयाने वाढलं आहे.

वेस्ट इंडिजच्या विजयाने पॉइंट्स टेबल बदललं

या विजयाने वेस्ट इंडिज पॉइंट्स टेबलमध्ये टॉपवर पोहोचली आहे. नेट रन रेटनुसार, दक्षिण आफ्रिका दुसऱ्या नंबरवर आहे. भारतीय टीम आता तिसऱ्या आणि झिम्बाब्वे चौथ्या नंबरवर आहे. भारताला सेमीफायनलच्या आशा टिकवण्यासाठी पुढची मॅच मोठ्या फरकाने जिंकावी लागेल.