कुलदीप यादव आणि वरुण चक्रवर्ती हे भारतीय टीमच्या पुढील प्लॅन्सचा महत्त्वाचा भाग आहेत, असं स्पिन बॉलिंग कोच साईराज बहुतुले यांनी स्पष्ट केलंय. केवळ टीम कॉम्बिनेशनमुळेच या दोघांना प्लेईंग इलेव्हनमध्ये जागा मिळालेली नाही, असंही त्यांनी सांगितलं.
ऑकलंड: न्यूझीलंडविरुद्धच्या शेवटच्या टी-20 मॅचमध्ये कुलदीप यादव आणि वरुण चक्रवर्तीला खेळण्याची संधी मिळणार की नाही, हे अजून निश्चित नाही. पण हे दोघेही टीमच्या भविष्यातील योजनांचा महत्त्वाचा भाग आहेत, असं स्पिन बॉलिंग कोच साईराज बहुतुले यांनी स्पष्टपणे सांगितलंय. या मालिकेतल्या पहिल्या चारही मॅचेसमध्ये या दोन्ही दिग्गज स्पिनर्सना बेंचवरच बसावं लागलंय. टीम कॉम्बिनेशन जुळवून आणण्यासाठीच त्यांना आपल्या संधीची वाट पाहावी लागतेय.
ऑकलंडमध्ये झालेल्या चौथ्या टी-20 मॅचमध्ये भारतीय बॉलिंग लाईनअपची पुरती वाट लागली होती आणि टीमने २५९ रन्स देऊन मोठा पराभव स्वीकारला. या पराभवानंतरच कोच बहुतुले यांनी हे वक्तव्य केलंय. भारताने ५ मॅचेसची ही मालिका ३-१ अशी आधीच जिंकली आहे. त्यामुळे हॅमिलटनमध्ये होणाऱ्या शेवटच्या मॅचमध्ये भारतीय टीम काही प्रयोग करण्याची शक्यता नक्कीच आहे. पण परिस्थिती काय आहे, हे खेळाडूंना व्यवस्थित ठाऊक आहे, असं बहुतुले म्हणाले. "दोघेही खेळण्यासाठी पूर्णपणे तयार आहेत. पण टीम कॉम्बिनेशन आणि गरजेनुसार त्यांना प्रत्येक मॅचमध्ये संधी मिळेलच असं नाही. ही गोष्ट त्यांनाही नीट माहीत आहे. तरीही ते नेटने सराव करत मेहनत घेत आहेत. जेव्हा केव्हा संधी मिळेल, तेव्हा ते सर्वोत्तम परफॉर्मन्स देतील," असं मॅच संपल्यानंतर झालेल्या पत्रकार परिषदेत बहुतुले यांनी स्पष्ट केलं.
शेवटच्या टी-20 मध्ये किंवा आगामी वन-डे सीरिजमध्ये या दोघांना खेळण्याची संधी मिळेल, अशी आशाही त्यांनी व्यक्त केली. कुलदीप यादवचा भारतीय वन-डे टीममध्ये समावेश आहे. स्पिनर्सनी नेहमीच आक्रमक बॉलिंग करावी, असा टीमचा प्रयत्न असतो, असं बहुतुले यांनी सांगितलं. तसेच परिस्थितीनुसार रन रोखणं हासुद्धा आक्रमक खेळाचाच एक भाग असतो, याकडे त्यांनी लक्ष वेधलं. पॉवरप्लेमध्ये उत्तम बॉलिंग करणाऱ्या अक्षर पटेलच्या कामगिरीचंही त्यांनी कौतुक केलं.
तसेच, बॅटिंगसोबतच लेफ्ट आर्म स्पिनर असलेला अभिषेक शर्मा सध्या नेट्समध्ये बॉलिंगचा सराव करतोय. पण मॅचमध्ये त्याला बॉलिंग द्यायची की नाही, हा संपूर्णपणे कॅप्टनचा निर्णय असेल, असंही बहुतुले यांनी शेवटी स्पष्ट केलं.




