न्यूझीलंडविरुद्धच्या दुसऱ्या टेस्ट मॅचमध्ये ऋषभ पंतने वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप (WTC) च्या इतिहासात सर्वाधिक सिक्सर मारण्याचा नवा विश्वविक्रम आपल्या नावावर केला आहे. त्याने इंग्लंडच्या बेन स्टोक्सचा ८८ सिक्सरचा जुना रेकॉर्ड मोडला आहे.
क्राईस्टचर्च: क्राईस्टचर्चमध्ये ऋषभ पंतला मोठी खेळी करता आली नसली, तरी भारताच्या या धडाकेबाज विकेटकीपरने रेकॉर्ड बुकमध्ये एक नवा इतिहास रचला आहे. न्यूझीलंडविरुद्धच्या दुसऱ्या टेस्ट मॅचच्या पहिल्या इनिंगमध्ये इंग्लंडच्या बेन स्टोक्सला मागे टाकत पंतने आयसीसी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप (WTC) च्या इतिहासात सर्वाधिक सिक्सर मारण्याचा मान मिळवला आहे.
शनिवारी भारताच्या पहिल्या इनिंगमध्ये न्यूझीलंडचा फास्ट बॉलर जेकब डफीच्या बॉलवर सिक्सर मारत पंतने हा कारनामा केला. या सिक्सरसोबतच WTC मध्ये त्याच्या सिक्सरची संख्या ८९ वर पोहोचली. याआधी ८८ सिक्सरसह बेन स्टोक्स पहिल्या नंबरवर होता. पण आता हा मोठा रेकॉर्ड पंतने स्वतःच्या नावावर केला आहे.
या रेकॉर्डची सर्वात खास गोष्ट म्हणजे पंतने घेतलेल्या इनिंगची संख्या. अवघ्या ४४ WTC मॅचेसमध्ये ७६ इनिंग खेळून पंतने ८९ सिक्सर ठोकले आहेत. दुसरीकडे, इंग्लंडच्या स्टोक्सला ८८ सिक्सरचा रेकॉर्ड करण्यासाठी ६४ मॅचेसमध्ये ११७ इनिंग खेळाव्या लागल्या होत्या.
बेन स्टोक्सचा रेकॉर्ड मोडणारा ऋषभ पंत
भारताच्या इनिंगच्या २५ व्या ओव्हरमध्ये हा ऐतिहासिक क्षण पाहायला मिळाला. डफीच्या बॉलवर पुढे येत पंतने लॉंग-ऑनच्या दिशेने एक भन्नाट सिक्सर मारला. या एका फटक्यामुळे स्टोक्सपेक्षा एक सिक्सर जास्त मारून त्याने WTC मध्ये नवा रेकॉर्ड प्रस्थापित केला. टेस्ट क्रिकेटमध्ये पंतची आक्रमक बॅटिंग कायमच चर्चेत असते. विशेषतः फास्ट बॉलर्सच्या विरोधात तो ज्या सहजतेने सिक्सर मारतो, त्यामुळे मॅचचं चित्र क्षणात बदलतं. WTC मधील त्याचे आकडेही याच आक्रमक अंदाजाची साक्ष देतात.
पण एवढा मोठा रेकॉर्ड करूनही पंतला या मॅचमध्ये मोठी धावसंख्या उभारता आली नाही. ३९ बॉलचा सामना करत तो २३ रन्सवर आऊट झाला. त्याच्या या छोट्या खेळीत एका फोर आणि एका सिक्सरचा समावेश होता. डफीच्या बॉलवर आणखी एक मोठा शॉट मारण्याच्या नादात पंत चुकला आणि काईल जेमिसनने त्याचा कॅच पकडत त्याला पॅव्हेलियनचा रस्ता दाखवला.
WTC च्या इतिहासात सर्वाधिक सिक्सर मारणाऱ्या खेळाडूंच्या यादीत भारतीय बॅटर्सचाच दबदबा पाहायला मिळतोय. टॉप सहामध्ये चार भारतीय खेळाडू आहेत. रोहित शर्मा ५६, शुभमन गिल ४८ आणि यशस्वी जैस्वालने ४५ सिक्सर मारले आहेत.
भारतीय बॅटिंगच्या पडझडीत पंतचा रेकॉर्ड
ज्या दिवशी पंतने हा रेकॉर्ड केला, तो दिवस टीम इंडियासाठी मात्र खूप कठीण ठरला. न्यूझीलंडने पहिल्या इनिंगमध्ये ३५६ रन्सचा डोंगर उभा केला होता. टॉम ब्लंडेलने सर्वाधिक ८९ रन्सची खेळी केली. तर भारताकडून आकाश दीपला पाच विकेट्स मिळाल्या.
न्यूझीलंडच्या फास्ट बॉलर्ससमोर भारताच्या बॅटिंगची पुरती वाट लागली. दिवसाचा खेळ संपेपर्यंत भारताने ६ विकेट्स गमावून फक्त ११६ रन्स केले होते. यामुळे भारत अजूनही न्यूझीलंडपेक्षा २४० रन्सने मागे आहे. पंतने वैयक्तिक रेकॉर्ड जरी केला असला, तरी मॅचमध्ये टिकून राहण्यासाठी भारताला तिसऱ्या दिवशी खूप दमदार बॅटिंग करावी लागणार आहे.










