विराट कोहलीने २०२१ मधील ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या भारताच्या ऐतिहासिक ब्रिस्बेन कसोटी विजयाला आपला सर्वात खास विजय म्हटले आहे. हॉस्पिटलमधून हा सामना पाहणाऱ्या माजी कर्णधाराने त्या युवा संघाच्या जिद्दीचे खूप कौतुक केले.

मुंबई : भारताचा स्टार फलंदाज विराट कोहलीने २०२१ मध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध ब्रिस्बेनमध्ये मिळवलेला ऐतिहासिक विजय आठवला आहे. पहिल्या मुलाच्या जन्मावेळी तो हॉस्पिटलमध्ये होता आणि तिथूनच त्याने हा सामना पाहिला. या विजयाइतका दुसरा कोणताही कसोटी विजय खास नसल्याचे त्याने म्हटले आहे. भारतात पुढच्या वर्षी जानेवारीत बॉर्डर-गावसकर ट्रॉफीला सुरुवात होणार आहे. गेल्या वर्षी ऑस्ट्रेलियात झालेल्या बीजीटी मालिकेत भारताचा पराभव झाला होता, त्यामुळे आता टीम इंडियाला ही ट्रॉफी परत मिळवायची आहे. कसोटी संघाचा अनुभव वाढत असतानाच, पाच वर्षांपूर्वीच्या गाबा कसोटीतील भारतीय संघाकडून ते खूप प्रेरणा घेऊ शकतात. त्या मालिकेत अनेक प्रमुख खेळाडू दुखापतग्रस्त होते, तरीही भारताने चमकदार कामगिरी केली होती. पहिल्या कसोटीनंतर विराटही त्याच्या पहिल्या मुलाच्या जन्मामुळे मायदेशी परतला होता.

अॅडलेड येथील पहिल्या कसोटीत टीम इंडिया केवळ ३६ धावांवर आटोपली होती आणि मोठा पराभव पत्करावा लागला होता. पण त्यानंतर मेलबर्न कसोटीपासून गाबा कसोटीपर्यंत भारताने जे जोरदार पुनरागमन केले, ते क्रिकेटच्या इतिहासातील सर्वात मोठे पुनरागमन मानले जाते. अॅडलेडच्या पराभवानंतर पुढच्या तीन कसोटी सामन्यांमध्ये ऋषभ पंत, पदार्पण करणारा शुभमन गिल, शार्दुल ठाकूर, वॉशिंग्टन सुंदर, टी नटराजन आणि मोहम्मद सिराज या युवा खेळाडूंनी दुखापती आणि इतर अडचणींना न जुमानता जबरदस्त कामगिरी केली. शेवटच्या कसोटीत पंतच्या नाबाद ८९ आणि गिलच्या ९१ धावांच्या जोरावर भारताने ३२८ धावांचे लक्ष्य गाठले आणि ३२ वर्षांपासून गाबावर अजिंक्य असलेल्या ऑस्ट्रेलियाला धूळ चारली. पहिल्या डावात ऑस्ट्रेलियाच्या ३६९ धावांना प्रत्युत्तर देताना शार्दुल आणि सुंदर यांनी केलेल्या अर्धशतकांमुळे भारताने १८६/६ वरून ३३६ धावांपर्यंत मजल मारली होती. सिराजच्या पाच आणि शार्दुलच्या चार बळींमुळे ऑस्ट्रेलियाचा दुसरा डाव २९४ धावांवर आटोपला आणि भारताला विजयासाठी ३२८ धावांचे लक्ष्य मिळाले.

जिओस्टारशी बोलताना विराटने सांगितले की, "माझ्या मुलाच्या जन्मासाठी मी हॉस्पिटलमध्ये होतो आणि मी माझ्या फोनवर सामना पाहत होतो. ब्रेकसाठी जाण्यापूर्वी पंधरा मिनिटांपर्यंत मी शार्दुल आणि वॉशिंग्टनमधील भागीदारी पाहिली. ती भागीदारी खूप खास होती. संपूर्ण संघाने त्या मालिकेत आणि गाबा कसोटीत जो संयम आणि आत्मविश्वास दाखवला, तो पाहता हा विजय सर्वात खास बनतो. अनेक युवा खेळाडूंनी या मालिकेत पुढे येऊन जबाबदारी घेतली. मला नाही वाटत की याहून दुसरा कोणताही विजय जास्त खास असेल." गेल्या वर्षी कसोटी क्रिकेटमधून निवृत्त झालेल्या विराटने १२३ कसोटीत ९,२३० धावा आणि ३० शतके झळकावली आहेत. भारताचे माजी मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री यांनीही या विजयाचे कौतुक केले. ते म्हणाले, "चहापानाच्या वेळी आम्हाला खात्री होती की ऋषभ पंत धावांचा पाठलाग करणार आहे. वॉशिंग्टन आणि ऋषभ यांनी ज्या प्रकारे फलंदाजी केली आणि शेवटच्या तासात एकमेकांना साथ दिली, ते खरोखरच अविश्वसनीय होते. त्यांच्या खेळात कोणतीही भीती नव्हती आणि ऑस्ट्रेलियन गोलंदाजीचे त्यांना दडपण नव्हते. मला वाटत नाही की क्रिकेटमध्ये असे काही यापूर्वी कोणी पाहिले असेल." (एएनआय)